विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मका- हें दरवर्षास उत्पन्न होणारें उंच असें तृण आहे. याची लागवड सर्व जगांत होते. याच्या ब-याच जाती असून ज्या जमिनींत याची लागवड केली असेल त्याप्रमाणें याचे गुणधर्म लवकर बदलत जातात. मका मूळ अमेरिकेंत होत असून बहुतेककरून पोर्तुगीज लोकांनीं हा हिंदुस्थानांत आणला असावा. परंतु हिंदुस्थानच्या निरनिराळ्या भागांच्या हवामानाला योग्य अशा मक्याच्या जाती बनवावयाला एक शतक लागलें असावें. त्यानंतर मात्र त्याची लागवड सर्वत्र फैलावली.
१९१९-२० सालीं ब्रिटिश हिंदुस्थानांत ६६५८६९६ एकर जमिनींत मक्याची लागवड झाली होती. बिहार-ओरिसा प्रांतांत सर्वांत जास्त म्हणजे १७७३००० एकर, आग्रा प्रांतांत १५२७८७१, पंजाब ११५५५१५, अयोध्या ९०५६९३, वायव्य प्रांतांत ४५३८७८, व मुंबई इलाख्यांत सिंध सोडून २२४२८० एकर जमिनींत मक्याचें पिक होतें.
मक्याचा मुख्य उपयोग अन्न व चारा म्हणून करतात. उत्तर हिंदुस्थानांत मक्याच्या पिठाच्या भाकरी करतात. याचीं हिरवीं कणसें भाजून अथवा उकडून खातात. भाजलेल्या मक्याच पिठाला बंगालमध्यें सातू म्हणतात. इतर भागांत मका व जव यांच्या पिठाला हें नांव आहे. मक्याचा ओला चारा गुरेंढोरें खातात. वाळलेला फक्त हत्ती खातात. यूरोप व अमेरिकेंत मक्याचे कांहीं खाण्याचे प्रकार करतात. हे प्रकार हिंदुस्थानांतील जुन्या सातूहून विशेष भिन्न नाहींत. अमेरिकंतील संस्थानांत मक्याचें पीक कापसाच्या खालोखाल महत्त्वाचें असून ह्याच्या आडउत्पन्नापासून निरनिराळे पदार्थ बनविण्याचे कारखाने भरभराटींत आहेत. तेथें मक्यापासून पिष्टसत्व व पिष्टशर्करापाक अथवा फलशर्करा तयार होते. याच्यापासून व्हिस्की व मद्यार्क तयार करतात. फलशर्करा केल्यावर राहिलेल्या पदार्थापासून अलीकडे रबर तयार करतात. बियाच्या कोंबापासून एक प्रकारचें तेल होतें. याचा जाळणें, ओंगण, साबण करणें या कामाकरितां व स्केल्ड तेल म्हणून करण्याकडे होतो. लढाऊ जहाजाच्या चिलखतांच्या दोन पत्र्यांमध्यें मक्याचा गाभा (बुरखुंड) घालतात. स्फोटक द्रव्यें तयार करण्याकरितां कापसाच्या ऐवजीं मक्याच्या बुरखुंड्याचाहि उपयोग करतां येतो व पुष्कळ वेळां कापसापेक्षा हा मक्याचा भुगा सरस ठरतो. मधला दांडा व पानं यांच्यापासून बँकनोटानां योग्य असा कागद निघतो. पिष्टसत्व, फलशर्करा, व्हिस्की व मद्यार्क तयार केल्यावर अवशेष पदार्थांपासून गुरांसाठीं अन्न तयार करतात.