विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मॅकीव्हेली, निकोलोडि बर्नार्डो (१४६९-१५२७)- एक इटालियन ग्रंथकार व मुत्सद्दी. याचा जन्म फ्लारेन्स येथें एका मध्यमस्थितींतल्या कुळांत झाला. व्यवहारज्ञ म्हणून लॉरेन्झोच्या दरबारीं मॅकीव्हेली प्रसिद्धीस आला. स. १४९८ त प्रजासत्ताक राज्य स्थापन झाल्यापासून मेडिसी घराणें परत येईपर्यंत (१५१२) फ्लारेन्समधील दुस-या चॅन्सेरीचा तो सेक्रेटरी होता. या काळांत त्याची सार्वजनिक चळवळींत पडणा-या लोकांशीं घसट पडली, पोपज्यूलिस (दुसरा) मॅक्सिमिलन बादशहा, १२ वा लुई व अनेक इटालियन संस्थानिक यांच्याशीं त्याचें एकसारखें दळणवळण पडलें. पण मेडिसी घराण्याचा पुन्हां अंमल सुरू झाल्यापासून त्याचें सार्वजनिक आयुष्य संपल्यासारखेंच झालें. तथापि त्याच्यावर राजकृपा होती. १५२१ त दरबारनें त्याला फ्लारेन्सचा इतिहास लिहिण्याची कामगिरी सांगितली. पण स. १५२७ त पुन्हा या मेडिसी घराण्याची हकालपट्टी झाल्याकारणानें मॅकीव्हेली निराश होऊन त्याच सालीं मरण पावला.
आपल्याकडील कौटिल्य किंवा कणिक यांच्याप्रमाणेंच मॅकीव्हेली वामनीतिशास्त्रविषयीं यूरोपांत प्रसिद्ध आहे. त्याचे राजकीय ग्रंथच त्याच्या अखंड कीर्तीस कारणीभूत झाले. ''डेल लार्टे डेला ग्वेरा'' (सन १९२०) या ग्रंथांत मध्ययुगांतील भाडोत्री सैन्य ठेवण्याच्या परिपाठाबद्दल नापसंति व्यक्त करून सध्यांच्या खड्या सैन्यपद्धतीची तरफदारी यानें केली आहे. त्याचा 'डिकोर्सी' हा ग्रंथ लोकसत्ताक राज्यपद्धतीसंबंधीं त्याचे विचार दिग्दर्शित करतो. पण त्याचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे 'प्रिन्सिपे' हो होय. यांत अनियंत्रित राजसत्तेचें मॅकीव्हेलीनें विवेचन केल्यावरून 'मॅकीव्हेलिझम् ही संज्ञा वाईट कृत्य या अर्थी रूढ झाली आहे. हा ग्रंथ लिहिण्यांत त्याचा सद्धैतु होता कीं औपरोधिक किंवा निंदाव्यंजक दृष्टीनें हा लिहिला गेला याविषयीं वाद आहे. अनियंत्रित राजाला प्रसंगोपात कराव्या लागणा-या कृती व विचार (कीं ज्यांचा अवलंब केल्याखेरीज त्याला यशस्वी रीतीनें राज्यशकट हांकणें शक्य नाहीं असें उघड दिसतें) यांची अगदीं बेधडक व शास्त्रीय पद्धतीनें यांत छाननी केली आहे. नीति व सद्गुण यांनांहि या विवेचनांत अजीबात फांटा दिला आहे. तत्कालीन इतिहासांतील उदाहरणें घेऊन प्रत्येक मुद्दा सिद्ध केला आहे. अशा स्पष्टोक्तीमुळेंच त्याची कुप्रसिद्धि झाली. एरवीं त्याचें व्यवहारशास्त्र चुकीचें नव्हतें.