विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मक्रान- बलुचिस्तान. हा कलात संस्थानाचा एक नैर्ॠत्येकडील भाग होय. याचें क्षेत्रफळ २६००० चौरस मैल आहे. किना-याची लांबीं २०० मैल आहे. सर्व किना-याचा भाग रूक्ष आहे. मुलूख डोंगराळ आहे. दश्तान व रक्षान या मुख्य नद्या आहेत. त्या बरेच महिने कोरड्याच असतात. या भागांत केव्हां केव्हां पांच पांच वर्षें अगदीं पाऊस पडत नाहीं.
इ ति हा स.- या भागास केखमक्रान असेंहि म्हणतात. मक्रान या नांवाच्या उत्पत्तीविषयीं तज्ज्ञांमध्यें बराच मतभेद आहे. लॉर्ड कर्झनच्या मतें ''मकर'' या शब्दापासून मक्रान शब्दाची उत्पत्ति झाली असावी. बृहत्संहितेंत मकर या जातीचा उल्लेख केलेला आहे. ग्रीक लोक या मुलुखास ''गेड्रोसिया'' असें म्हणत असत. सायरस व सेमीरामिस हे या भागांतून गेले हाते अशा दंतकथा लोकांत प्रसिद्ध आहेत. अलेक्झांडर परत जातांना या मुलुखांतून गेला. शहानाम्यांत कैखुस्त्रु नांवाच्या इराणच्या बादशहानें हा मुलुख जिंकला होता असें लिहिलें होतें हा मुलुख कांहीं काळ इराणच्या ताब्यांत तर कांहीं काळ हिंदु राजांच्या मुलुखांत मांडत असे. हा भाग कांहीं वर्षें हिंदुस्थानांतील मिकी जातीच्या ताब्यांत होता पुढें म्हणजे अठराव्या शतकाच्या मध्यकालीं हे गिकी लोक कलातच्या खानाच्या आधीन झाले. इंग्रज सरकारास यूरोप व हिंदुस्थान या दोन खंडांतील दळणवळण तारायंत्राच्या द्वारें करावयाचें होतें, म्हणून त्याचें लक्ष या देशाकडे लागलें. या देशांत शांतता राखण्यासाठीं कलातच्या खानास इंग्रज सरकारनें मदत केली. १९०० सालापासून येथें एक असिस्टंट पोलिटिकल एजंट हिंदुस्थान सरकारनें नेमिला आहे.
मक्रानची लोकसंख्या सुमारें ७८००० असून या भागांत खेडीं १२५ आहेत. येथील लोकांच्या पांच जाती आहेत. यांचा एकमेकांशीं कांहीं संबंध नसतो. प्रत्येक जातीचे लोक अगदीं स्वतंत्र रीतीनें राहतात. किल्ल्याभोंवतीं लोक वस्ती करून राहातात. यातील वरिष्ट जातींच्या ताब्यांत जमीन आहे. कनिष्ठ जातीचे लोक काबाडकष्ट करून आपलें पोट भरतात. अर्धे लोक मुसुलमानांतील सुनी पंथाचे आहेत. या भागांतील लोक बलुची भाषा बोलतात. बहुतेकजण शेतीवर उपजीविका करतात.
शे ती.- येथील जमीन रेताड आहे. पाऊस थोडा पडतो व केख व इतर दुस-या थोड्या भागांत पाटाच्या पाण्याचा शेतीकडे उपयोग करतात. गहूं व यव हीं धान्यें पिकतात. पण सर्व भिस्त खारकेच्या पिकावर असते. या भागांत खारकांचीं तीन लाखांवर झाडें आहेत. येथील चांगल्या खारकासारखा माल अरबस्तानांतहि होत नाहीं.
व्या पा र द ळ ण व ळ ण.- सुमारें ७ लाखांचा व्यापार हिंदुस्थानदेशाशीं चालतो. इराण, आफ्रिका व अरबस्तान यांशीं याचा किती व्यापार आहे याची नक्की माहिती समजत नाहीं. हा व्यापार सिंधप्रांतांतील हिंदु व कच्छ व मांडवींतील खोजे या लोकांच्या हातीं आहे. आयात कापड व धान्यें असून निर्गत लोंकर, कापूस, खारका व खारवलेले मासे आहे. येथील दळवणवळणाचें मार्ग फार खराब आहेत. सामानाची नेआण उंटावरून होते. पसनी व ग्वाडर येथें ब्रिटिश इंडिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनीच्या बोटी लागतात.
रा ज्य का र भा र.- या मुलुखावर कलातच्या खानाचा ताबा आहे. राज्यकारभार चालविण्यासाठीं त्यानें एका वरिष्ठ अधिका-यांची नेमणूक केलेली असते. त्यास नझीम असें म्हणतात. याच्या मदतीस आणखी दुसरे ४ अधिकारी असतात. घोडदळ व पायदळ मिळून एकंदर १६० शिपाई मुलुखाच्या बंदोबस्तासाठीं ठेविले आहेत. यांखेरीज प्रसंग पडल्यास प्रत्येक माणसास नाझीमच्या मदतीस यावें लागतें. येथील असिस्टंट पोलिटिकल एजंटाच्या हाताखालीं ३०० शिपायांची तुकडी आहे. न्याय करण्याचें काम काजीकडे सोपविलेलें असतें. महत्वाचें फैसले असिस्टंट पोलिटिकल एजंटाच्या संमतीनें कायम होतात. राज्यांत गुन्हे मुळींच होत नाहींत म्हटलें तरी चालेल.
खारकावरील कर पैशाच्या रूपानें व इतर पिकांवरील कर धान्याच्या रूपानें वसूल करतात. पिकाचा दहावा हिस्सा कर म्हणून घेण्याची चाल आहे. कराचें उत्पन्न ४५५०० रूपये असून राज्यकारभाराचा खर्च ८०००० रू. आहे. सुमारें ३६ हजार रूपये खानास आपल्या खजिन्यांतून द्यावे लागतात. इंग्रज सरकाराकडून ५२५० रूपये खानास तारायंत्राच्या संरक्षणादाखल येतात. येथील लोकांच्या धर्मसमजुती वेडगळपणाच्या आहेत. सर्व रोग भूपिशाच्चामुळें होतात अशी यांची समजूत आहे.