विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मॅक्सवेल, जेम्स क्लार्क (१८३१-१८७१)- क्लार्क नांवाच्या स्कॉटिश कुटुंबात याचा जन्म झाला. त्याचें शिक्षण एडिंबरो अक्याडेमींत (विश्र्वविद्यालयांत) झालें. १८५४ सालीं त्याला केंब्रिजची दुसरा रँगलर ही पदवी मिळाली. अँबरडीन येथील मारिशल कॉलेजांत त्याला निसर्गशास्त्राचा अध्यापक नेमण्यांत आलें; तेथें तो १८५६ सालापासून तों १८६० सालापर्यंत होता. यानंतरचीं पुढील ८ वर्षें तो लंडन येथील किंग्ज कॉलेजांत खगोलशास्त्र आणि पदार्थविज्ञानशास्त्र या दोन विषयांचा अध्यापक होता. १८७१ सालीं केंब्रिज येथें प्रायोगिक पदार्थविज्ञानशास्त्रांच्या प्रोफेसरच्या जागेवर त्याला नेमण्यांत आलें.
त्याचे शोध- उत्कृष्ट प्रतीचा शास्त्रीय संशोधक म्हणून याची प्रसिद्धि होती. आपल्या वयाच्या पंधराव्या वर्षापासून यानें शास्त्रीय विषयावर लिहिण्यास सुरवात केली; 'कार्टेसियन' अंडाकृति यांत्रिक पद्धतीनें काढावयाची पद्धत या पहिल्या लेखांत होती.
चिकट प्रवाही द्रव्यावर दाब आणला म्हणजे द्वि-वक्रीभवन होतें असें म्याक्सवेल यानें पुढें दाखवून दिलें. ''फॅराडेच्या शक्तिरेषा'' नांवाच्या निबंधांत त्यानें जी शोधकबुद्धि दाखविली तिचा परिणाम एक महत्त्वाचा शोध लावण्याकडे झाला. ''शनीच्या कडयाची स्थिरता'' नांवाचा त्यानें एक निबंध लिहिला. या निबंधाबद्दल त्याला केंब्रिजमधील ''ॲडयाम्स प्राइझ'' नांवाचें पारितोषिक मिळालें. स. १८५५ ते १८७२ या दोन सालांच्या दरम्यान त्यानें कित्येक निबंध प्रसिद्ध केले. त्यांत ''रंग पाहून होणारें ज्ञान'' आणि ''वर्णान्धता'' हे महत्त्वाचे निबंध आहेत. यांतील पहिल्याबद्दल त्याला ''रंम्फोर्ड प्राइझ'' नांवाचें पारितोषिक १८६० सालीं मिळालें. परंतु त्याचें आयुष्यांतील महत्त्वाचें कार्य विद्युद्विषयावरील होतें. १८७३ सालीं त्यानें ''विद्युत आणि चुंबकत्व' या नांवाचें एक अत्यंत महत्त्वाचें पुस्तक प्रसिद्ध केलें. यांत त्यानें असें दाखवून दिलें कीं, विद्युत् आणि चुंबकत्व यांचीं कार्यें आकाशतत्त्वा (ईथर) सारख्या साधनाशिवाय घडत नाहींत. हीं कार्यें घडण्यास त्या साधनावर दाब व ताण बसणें अवश्य आहे. ''आनरेबल हेनरी क्याव्हेन्डिश यांचे वैद्युतिक शोध'' या नांवाचा त्यानें एक ग्रंथ प्रसिद्ध केला. या ग्रंथावरून त्यानें क्याव्हेन्डिश याचे अनेक गुण लोकांपुढें आणले.