विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मक्सुदनगड- हें छोटेखानी संस्थान भोपाळ एजन्सींत (मध्य हिंदुस्थानांत) आहे. हें पूर्वी रधूगड संस्थानाची पाती होतें. १९ व्या शतकाच्या आरंभीं शिंद्यांनीं हें जिंकून घेतलें; पण याचा कांहीं भाग त्याच्या फिलोज नामक फ्रेंच सरदारानें या घराण्यांतील बेरीसाल खीची या पुरुषास दिला. हाच या भागाचा संस्थानिक झाला. येथील संस्थानिक शिंदे महाराजांचा मांडलिक असूनहि त्यास कर देत नसे. यास ब्रिटिश सरकारांतूनहि आश्वासन मिळालें नाहीं. येथील संस्थानिक राजा पदवी धारण करतात. संस्थानची लोकसंख्या (१९०१) १४२८४. खेडीं ८० असून क्षेत्रफळ ८१ चौरस मैल आहे. जमीन सुपीक असल्यामुळें पिकें चांगलीं होतात. मुख्य पीक अफूचें आहे. येथें चांगले रस्ते नाहींत. संस्थानचें उत्पन्न ३७००० रुपये आहे. मुख्य गांव मक्सुदनगड असून तें १७०० फूट उंचीवर आहे. येथें नैआकिल नांवाचा किल्ला आहे.