विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मंगल (मँगेनीज)- ज्यांतून मँगॅनीज काढतां येईल अशा हिंदुस्थांनांत सामान्यपणें सांपडणाऱ्या अशुद्ध धातु म्हटल्या म्हणजे 'सायलोमेलांनी', 'ब्रोनाईट' व 'पायरोलुसाईट' अथवा 'कृष्णपरिप्राणिद' ह्या होत. परिप्राणिदाला, कोलसाका पत्थर, इंगानी, निजनी, 'इद्दाली काल' इत्यादि निरनिराळीं नावें आहेत.
उ त्प न्न.- १९०६ सालीं हिंदुस्थानचें मँगेनीजचें उत्पन्न जगांतील इतर कोणत्याहि देशांपेक्षां जास्त होतें; मँगनीजचे अत्यन्त महत्वाचे असे थर मध्यप्रांत, मद्रास, मध्यहिंदुस्थान, व म्हैसूरमध्यें सांपडतात. मध्यप्रांतांत सर्वांत जास्त मँगेनीज निघतें व तें इतकें उत्कृष्ट असतें कीं, ५०० मैल रेल्वेचा खर्च व यूरोप-अमेरिकेचें बोटीचें भाडें सोसूनहि तें परदेशांत पाठविलें जातें. १९२३ सालीं एकंदर निपज ६९५०५५ टन असून त्याची हिंदी बंदरावरची किंमत २२१५९८४ पौंड होती.
मँ गे नी ज अ स ले लीं ठि का णें.- पंच महाल (मुंबई), झाबुआ (मध्यहिंदुस्थान), बालाघाट, भंडारा, छिंदवाडा, नागपूर, विझगापट्टम व सोंडूर टेंकडया (मद्रास), आणि शिमोगा जिल्हा (म्हैसूर) इत्यादि ठिकाणीं आर्थिकदृष्टया महत्त्वाचे थर सांपडतात.
उ प यो ग.- कांच तयार करण्याच्या कामीं 'परिप्राणिदाचा' फार उपयोग होतो. या प्राणिदांतून उत्तम प्रकारचा तपकिरी रंग निघत असल्यामुळें, चिनी मातीचीं भांडीं रंगविण्याकडे किंवा त्यांनां चकाकी आणण्याकरितांहि या प्राणिदाचा उपयोग करतात. सध्यां मँगनीजचा अशुद्ध धातु 'फेरोमँगनीज' तयार करण्याच्या कामी विशेषेंकरून खर्च करतात. कारण, फेरोमँगनीजचा पोलाद तयार करण्याच्या कामीं फार उपयोग होतो. शेंकडा ०.२५ स्फुर व शेंकडा १० पेक्षां जास्त सिलीका असलेले अशुद्ध धातू पोलाद तयार करण्याच्या कामीं फारसे उपयोगी पडत नाहींत. मँगेनीजच्या अशुद्ध धातूंच्या वाढत्या निर्गत व्यापारामुळें हिंदुस्थानचें फारच नुकसान होत आहे. ३० रुपये किंमतीच्या एका टनामागें, भाडेंखर्च वगैरे वजा जातां, हिंदुस्थानच्या पदरांत १५ रुपयांहून जास्त रक्कम पडत नाहीं. हिंदुस्थानांत पोलाद तयार करण्याचे बरेचसे कारखाने काढतां आले, तर बरेचसें मँगनीज देशांतल्या देशांत राहून वरील नुकसान बऱ्याच अंशीं टळण्याचा संभव आहे. परंतु हें जोंपर्यंत घडून येत नाहीं तोंपर्यंत इंग्लंड, अमेरिका व जर्मनी या देशांत मँगेनीजच्या अशुद्ध धातूची जी निर्गत होत असते ती थांबणें शक्य नाहीं.
व्या पा र.- अलीकडील मँगेनीजचा निर्गत व्यापार झपाटयानें वाढत आहे. १९००-०१ या सालीं २६१३३९४ हंड्रेडवेटांचीं, व १९०६-०७ सालीं ९८५९८५५ हंड्रेडवेटांची निर्गत झाली पण १९२३ सालीं एकंदर निर्गत ७७५८७० टन असून त्याची किंमत १७५३०७३२ रुपये होती. सर्वांत जास्त माल युनायटैड किंगडममध्यें जातो. याच्या खालोखाल खरेदी करणारे दुसरे देश म्हटले म्हणजे फ्रान्स, बेल्जम व युनायटेडस्टेटस (अमेरिका) हे देश येतात.
रा सा य नि क.- मंगल हें धातुरूपीं मूलद्रव्य असून त्याचें प्राणिद फार प्राचीन काळपासून माहीत होतें. हें प्राणिद लोहाचें असावें अशी कल्पना बरेच दिवस प्रचलित होती. पण पुढें शील यानें हें एका विवक्षित धातूचें प्राणिद आहे असें सिद्ध केलें. मंगलाचे बरेच कच्चे दगड सांपडत असून ते बहुधां लोखंड, मग्न वगैरे धातूंच्या सिकित किंवा कर्बितांनीं युक्त असतात. ह्या धातूचें अस्तित्व सूर्यबिंबाभावेंतालच्या वातावरणांत, खनिज पाण्यांत व समुद्राच्या पाण्यांतहि थोडयाफार प्रमाणानें असतें.
हा धातु १७७४ सालीं प्रथमतः त्याचें कर्बित कोळशासह तत्प करून तयार केला गेला. पुढें बुन्सेन यानें हा धातु उज्जहराम्ल असलेल्या एका भांडयांत दुसरें एक सरंध्र भांडें ठेवून त्यामध्यें हरिदाचें विद्युद्विच्छेदन करून तयार केला. पुढें पुढें ह्या धातूच्या कच्या धातूंचें उज्जीकरण करून धातु वेगळा करण्याच्या बऱ्याच रीती प्रचारांत आल्या. ग्रीन व वाल यांनीं पायरोल्युसाइट नांवाच्या मंगलाच्या कच्च्या धातूचें उज्जीकरण करून धातु वेगळा केला. ह्यामध्यें जवळ जवळ शें. ९७ इतकें मंगल असतें. मंगलभेलदाचें उज्जीकरण करून मिळालेला धातु बऱ्याच शुद्ध स्वरूपांत असतो.
मं ग ला चे सं यु क्त प दा र्थः- मंगलाचीं बरींच प्राणिदें असून त्यांमध्यें मंगलाद्वि प्राणिद महत्त्वाचें आहे. मंगलकर्बित तापवून मिळालेला पदार्थ कमजोर उज्जहराम्लानें धुतला असतां जो पदार्थ रहातो तो मंगल-द्वि-प्राणिद होय. हें एक तीव्र प्राणदीकारक द्रव्य असून त्यामध्यें गंधकाम्ल टाकलें असतां प्राणवायु वेगळा होतो. मंगलाच्या संयुक्त पदार्थामध्यें दुसरा महत्त्वाचा पदार्थ पालाशपरिमंगलित हा आहे. पालाशमंगलितामधून कर्ब-द्वि-प्राणिद जाऊं दिल्यास किंवा त्याचें विद्युद्विच्छेदन केल्यास पालाशपरिमंगलित मिळतें. हेंहि प्राणिदीकारक असून त्याचा आम्लिक किंवा अनाम्लिक द्रावणामध्यें उपयोग करतां येतो. पहिल्या कृतीनें प्राणाचे ५ अणू व दुसऱ्या कृतीनें ३ अणू मिळतात.
ओळखण्याची रीत व उपयोगः- मंगलाच्या योगानें बुन्शेन दिव्याच्या ज्योतीस निळसर रंग येतो व त्याचे क्षार पालाश-नत्रित व सिंधु-कर्बितासह तापवून नंतर त्यांत पाणी टाकलें असतां आपणांस हिरवा सांका दृष्टोत्पत्तीस येतो. वरील दोन कृतींच्या योगानें मंगलाचें अस्तित्व ओळखलें जातें. ह्या धातूचा परमाणुभारांक मंगलगंधकिताचें गंधकिदांत रूपांतर करून अगर त्याचें किंवा दजत-परिमंगलिताचें पृथक्करण करून ठरविला गेला. ह्या धातूचा मुख्य उपयोग मंगलपोलाद करण्याकडे करतात.
मंगल- निरनिराळ्या मानवजातींतून निरनिराळया वस्तू मंगलदायक मानितात. वस्तूविषयीं जशी भावना असेल किंवा समजूत बनली असेल तशी ती वस्तु मंगल किंवा अमंगल भासणार. विवाह, चौल व उपनयन हे आपल्यांत मंगलविधी मानितात. शिवाय 'अष्टमंगल' पहा.