विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मगवे, जिल्हा.- उत्तर ब्रह्मदेश, मगवे भागांतील एक जिल्हा. क्षेत्रफळ ३३१३ चौरस मैल जिल्ह्याच्या पश्र्चिम भागातून इरावती नदी वहाते. तिच्यांतून नावा चालतात. यिन नांवाची नदी उत्तरेकडून वहात येऊन बेंतगं गांवाजवळ इरावतीस मिळते. जंगली हत्ती, वाघ, रानरेडे, चित्ते व जंगली कुत्रे योमा भागांत विपुल आढळतात. जिल्ह्याची हवा उष्ण व कोरडी असते. पावसाचें वार्षिक मन सरासरी २९ इंच.
इतिहासः- या जिल्ह्याचा इतिहास फार थोडा उपलब्ध आहे. दंतकथेवरून मगवे शहर ११५९ सालीं बसविलें असून मिंगम हें त्यापूर्वी शंभर वर्षे वसलेलें आहे. सन १८६६ मध्यें मिंगम राजपुत्रानें मिंदरमिनविरुद्ध बंड केलें. पण लागलीच मिंदरमिनच्या अनुयायांनीं त्याचा मोड केला. १८८५ (डिसेंबर १२) मध्यें कांहीं अडथळा न होतां टंगडिंगें सर होऊन त्या ठिकाणीं अ. कमिशनर नेमला गेला. पुढें मिन तालुका त्याला जोडण्यांत येऊन टंगडिंगवी जिल्हा केला. १८८८ सालीं मिनवूपासून येनंगगंग तालुका जोडून जिल्ह्याचें ठाणें मगवेस आणिलें. मगवें जिल्ह्यांत ७ प्रसिद्ध देवालयें आहेत. त्या प्रत्येकाचे वार्षिक उत्सव पूर्वी होत असत अलीकडे फक्त मिथलून देवालयाचाच उत्सव आक्टोबर महिन्यांत होतो. सतवा तालुक्यांत कोकोगावा येथें जुन्या राजधानीचे अवशेष आढळून येतात.
जिल्ह्याची लोकसंख्या १९२१ सालीं ४२६२५२ होती. एकंदर लोकसंख्येंत शेंकडा ९९ बौद्ध धर्माचे लोक असून ब्रह्मी भाषा सोडून बाकीच्या भाषा बोलणारे शें. १॥ येतील. शेंकडा ८० लोक शेतकी करतात. टंगडिंगवी भागांत तांदुळाचें पीक उत्तम असतें. मुख्य पीक तीळ, ज्वारी, तांदूळ व तंबाखू आहे. जंगलाचें क्षेत्रफळ ३९९ चौरस मैल असून साग बहुधा सर्वत्र आढळतो. बाबू फारसा नाहीं. यवीन नदीवर तुती पुष्कळ उगवते. तीवर रेशमाचे किडे असतात. खनिज पदार्थांत पेट्रोलियम मुख्य असून तें जिल्ह्याच्या वायव्य भागांत येनंगगंग तालुक्यांत पुष्कळ प्रमाणावर निघतें. बर्मा ऑईल कंपनी सन १८८८ पासून हें काम करीत आहे.
मगवे, येनंगगंग, मिंगन, मिनव, हीं व्यापराचीं मुख्य ठिकाणें असून हीं सगळीं गावें इरावती नदीच्या कांठीं आहेत. निर्गत मालांत पेट्रोलियम, तिळाचें तेल, साग, कातडें, चामडीं हीं येतात. गुराचा व्यापार चांगला चालतो. जिल्हा शिक्षणाच्या बाबतींत मागासलेला नाहीं.
ता लु का.- याचें क्षेत्रफळ ६३७ चौरस मैल आहे. तालुक्याची जमीन रेताड असून तींत ज्वारी व नीळ हीं दोन मुख्य पिकें होतात. लोकसंख्या १९११ सालीं ७१५९४ असून तालुक्यांत खुद्द मगवे शहर (लोकसंख्या सुमारें पांच हजार) व ८५ खेंडीं आहेत.