विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मंगोल- मंगोलियन उर्फ मोंगल. आशियांतील एक महावंश. मोंग म्हणजे शूर यावरून हा शब्द बनला असें मानतात. या मानववंशाचे बुरियत, पश्चिममंगोल (कालमक) आणि पूर्वमंगोल असे तीन पोटभेद आहेत. पश्चिमंगोल लोक होआंगहो नदीपासून डॉन नदीला मिळणाऱ्या मॅनिच नांवाच्या नदीपर्यंतच्या प्रदेशांत पसरलेले असून त्यांची विशेष वस्ती काकेशसपर्वत, झुंगारिया, उत्तर तिबेट वगैरे भागांत आहे. ('कालमक' पहा). पूर्वमंगोल लोक मुख्यतः मंगोलियन प्रांतांत राहातात. बुरिल लोक सैबीरियांतल्या इर्कुतरक व ट्रान्स-बैकल या दोन विभागांत आहेत. कालमक खल्क किपचाक, इलखानी, तैमूरनें हतप्रभ केलेले तोक्तमीश, क्रीम, उझबेग या जाती मंगोल वंशाचे उत्तम नमुने आहेत. या लोकांची उंची मध्यम, केंस काळे व सरळ, वर्ण फिकट पिंवळा किंवा पिंगट, गालाची हाडें उंच, नाक सरळ व चपटें असतें. शिवाय या लोकांचें विशेष चिन्ह म्हणजे जन्मतः माकडहाडांजवळच्या शरीरभागावर लहान काळे डाग (मंगोलियन स्पॉट) असतात व ते लहानपणीं लवकरच नाहीसे होतात. असले डाग मेक्सिकोंतल्या इंडियन लोकांतहि आढळतात. मंगोल लोकांचें स्थलांतर दूरवर झालें असून चिनी, जपानी वगैरे लोकांवर त्यांचा विशेष परिणाम झाला आहे. हिंदुस्थानांतल्या द्रविड लोकांशीं शरीरसंबंध होऊन बनलेली 'मंगोलाइड' अशी मिश्र जात हिमालयाच्या प्रदेशांत आढळते. एका प्रॉटेस्टंट मिशनऱ्यानें १८७५ सालीं मंगोल लोकासंबंधीं बरची माहिती प्रसिद्ध केली आहे. तीवरून असें दिसतें की स्थावर मिळकत ही कल्पना, तसेंच वैयक्तिक मालकी आणि हक्क या कल्पना त्यांच्यांत फार क्वचित् आहेत. मात्र घोडा, वस्त्रप्रावरण आणि हत्यारें यांच्यावरील खाजगी मालकीची कल्पना पूर्वपार चालू आहे. लग्नाच्या बायकांवर इतर जंगम मिळकतीप्रमाणें तहाहयात सत्ता असून मरणोत्तर वारसाहक्कानें मयताचे मुलगे, भाऊ, पुतणे किंवा चुलते याप्रमाणें वारसांनां मिळतात. हे लोक मुख्यतः घोडे, उंट, गुरें व शेळयामेंढया पाळून स्थलांतर करीत हिंडतात. आणि त्यामुळेंच मोठमोठया टोळयांनीं छुटीकरितां परदेशांत स्वाऱ्या करणें हा धंदाहि कित्येक शतकें त्यांच्यांत चालू आहे.
इ ति हा स.- १२ व्या शतकापूर्वीचा ह्या लोकांचा इतिहास उपलब्ध नाहीं. एका निळया लांडग्यापासून ही लोकजात निर्माण झाली, ही दंतकथा मंगोल इतिहासकार सनंग सेटझेन यानेंहि नमूद केली आहे. बुदनत्सर हा त्यांचा पहिला ज्ञात पुढारी एका मंगोल विधवेला दैवी चमत्कारानें झाला असा उलेख आहे. यानें भोंवतालच्या लोकांचें पुढारीपण युक्तीनें मिळविलें. त्यांचा आठवा वंशज युझुनाई (येसुकै) हा सुप्रसिद्ध चेंगीजखान याचा बाप होय. यानें बऱ्याच प्रदेशांत स्वत:ची सत्ता प्रस्थापिली. नंतर चेंगीझखानानें (पहा) हें राज्य वाढवून चिनी समुद्रावरून नीपर नदीपर्यंत-इतकें विस्तृत साम्राज्य स्थापलें. त्यानें मरणसमयीं (१२२७) आपलें राज्य ओत्तईखान, तुलुईखान, जूजीखान व झगताईखान ह्या चार मुलांस वाटून दिलें. ओत्तईखान (१२२७-४१) हा बापासारखाच पराक्रमी होता.त्यानें बापाच्या आत्म्याला ४० कुमारिका व पुष्कळ घोडे बळी दिले. चीनवर स्वारी करून त्यानें तेथील किन उर्फ सोनेरी राजघराण्याची सत्ता नष्ट केली. नंतर यूरोपवर स्वारी करून तीन वर्षांत (१२३८-१२४१) अर्धे यूरोपखंड जमीनदोस्त केलें. या स्वारींत मुख्य सरदार बानू होता. ओत्तईखानानंतर त्याचा मुलगा कुयुक यानें १२४१ ते १२४८ पर्यंत राज्य केलें. त्यानें ख्रिस्ती धर्मप्रचारकांनां सहानुभूतीनें वागवून दोन ख्रिस्ती झालेले इसम आपले दिवाण नेमिले. त्याच्या मृत्यूनंतर गादीबद्दल वारसांत तंटे होऊन अखेर इ. सं. १२५१ मध्यें तुलईखानाचा मुलगा मंगुखान राज्यावर आला. त्या वेळीं रुबुक्विस व इतर कांही ख्रिस्ती मंक (मठवासी) त्याच्या दरबारीं गेले होते. मंगुखानाच्या एका भावानें (हुलुनुखान) इराण वगैरे पश्चिम आशियांतील देशांवर आणि दुसऱ्या भावानें (कुब्लाईखानानें) दक्षिण चीनवर स्वारी केली. मंगुखानानंतर कुब्लाईखानानें स. १२५७ ते १२९४ पर्यंत राज्य केलें व कंवबळू शहर (हल्लीचें पेकिन)आपली राजधानी केली. याच्या वंशास चीनच्या इतिहासांत 'युएनवंश' म्हणतात. व्हेनीसचा प्रसिद्ध प्रवासी मार्कोपोलो कुब्लाईखानाच्या दरबारीं पुष्कळ वर्षे होता. कुब्लाईखानानंतर १३६८ पर्यंत या वंशानें चीनवर राज्य केलें. पण ते मोंगल बादशहा विशेष महत्त्वाचे नाहींत. नंतर मिंग नांवाच्या बौद्धधर्मीय घराण्यानें मोंगलांनां चीनांतून हांकलून देऊन आपली सत्ता स्थापिली. मंगुखानापर्यंत या लोकांत काबीज केलेल्या प्रांतांत तरुण व लढवय्या माणसांची आणि कैद्यांची कत्तल करण्याची चाल होती. व्यवस्थित राज्यस्थापनेचा त्यांच्यांत अभाव असे. मिंग घराण्यानें पुढें या लोकांचा इतका निःपात केला कीं, त्यावेळेपासून आतांपर्यंत पूर्वमंगोलियांत हे लोक पुन्हां साम्राज्यसत्ताधारी झाले नाहींत. मात्र चीनच्या साम्राज्यावर त्यांच्या अजूनपर्यंत मधून मधून स्वाऱ्या (मोहिमा) चालू असतात. मिंगानंतर मांचू या चिनी राजघराण्यानें, मध्यंतरी मोंगलांनीं वर डोकें उचललें असतां, त्यांनां दडपून टाकलें (१६४४). या सुमारास त्यांच्यांत बौद्ध धर्माचा प्रसार हळू हळू होऊं लागला. परंतु त्यांच्या आडदांडपणा अद्यापि कायमचा नष्ट झाला नव्हता. दक्षिणेकडील खल्ख लोकांचें व पश्चिमेकडील तोरगोड लोकांचें राज्य १७ व्या शतकापर्यंत स्वतंत्र होतें. त्यांचा व रशियाचा स्नेह त्या शतकांत जमला होता. चखर, तोरगोड, कालमक वगैरे पोटजातींची सत्ता अद्यापि मंगोलियामध्यें तार्तरींत कांहीं ठिकाणीं स्वतंत्रपणें तर, कोठें मांडलिकाप्रमाणें नांदत आहे. समरकंद, बुखारा, ताश्कंद, इकडील राज्यकर्त्यांच्या रक्तांत या जातींचें रक्त खेळत आहे.
प्रसिद्ध तैमुरलंग हा या जातींतील झगताई पोटशाखेंत जन्मला होता. मुसुलमानी धर्माचा जास्त प्रसार या लोकांत तेराव्या शतकांत झाला. कझान व आस्त्राखानाकडील या लोकांच्या व ख्रिस्त्यांच्या धार्मिक चकमकी होत (१३ वें शतक), पण पुढें यांच्या राजांचे यूरोपकडील ख्रिस्ती राजांशीं शरीरसंबंध होऊं लागले. तुर्कस्तान, ईजिप्त व आस्त्राखानाकडील हे मोंगल यांची एकधर्मामुळें १४ व्या शताकंत एकी होऊन मुसुलमानांचें महत्त्व यूरोपांत वाढलें. बाबरचा वंश हा उझबेग मोंगलच होता.
भा षा व वा ङ्म य.- वर सांगितलेल्या मंगोलियाच्या तीन प्रमुख जातींप्रमाणें त्यांच्या भाषांमध्येंहि, पूर्वमंगोलीभाषा, पश्चिममंगोलीभाषा व बुरियटीभाषा असे तीन भाषाभेद दृग्गोचर होतात. या तीन भाषा हल्लीं जरी बाह्यतः निरनिराळया भासत असल्या तरी त्या बऱ्याच सारख्या आहेत व कोणत्याहि एका भाषेचें ज्ञान झाल्यास इतर दोन्हीहि भाषा आपल्याला सहज कळतात. मंगोली लिपि ही मँचू लिपीसारखीच आहे, हिची लिहिण्याची पद्धत आडवी नसून उभी आहे म्हणजे एका अक्षराखालीं दुसरें अक्षर काढण्याची वहिवाट आहे. व्यंजन व स्वर मिळून एकेक अक्षर बनतें. मंगोली लिपि ही मूळ सीरियन लिपीपासून जी उइथुरिन लिपि प्रचारांत आली तिचें अपत्य होय. या लिपीवर आर्यन व तिबेटी लिपीचाहि संस्कार झाल्यानें आढळतें. या लिपीमध्यें लेखनाला तेराव्या शतकांत, सस्कय पंडित, फग्सप, त्सोइतशि ओडसर या तीन लामांनीं सुरवात केली. या लिपींतील कांही अक्षरांचे एकाच शब्दांतील त्यांच्या निरनिराळया ठिकाणच्या वापराप्रमाणें निरनिराळे उच्चार होतात. अद (राग), एंदे (येथें); तसेंच नड (मला), अल्डन (खोली) हे शब्द सारख्याच तऱ्हेनें लिहिले जातात व त्यामुळें संदर्भावरून तो कोणत्या अर्थानें शब्द वापरला आहे हें ताडावें लागतें. अशा प्रकारची दुर्बोधता काढून टाकून एक प्रकारची नवीन लिपि प्रचारांत आणण्याची कामगिरी १८४८ सालीं सयपंडितानें केली. ही नवीन लिपि काल्मुक या नांवानें प्रसिद्ध आहे. यांत प्रत्येक अक्षराला स्वतंत्र उच्चार आहे त्यामुळें ही लिपी बरीच साधी झालेली आहे. बुरियट भाषा ही पूर्वमंगोली भाषेशीं सदृश आहे.
वाङ्मयामध्येंहि सुशिक्षित लोकांच्याकडून लिहिण्यांत येणारी श्रेष्ठ उर्फ संस्कृत भाषा व सर्वसाधारण लोकांच्याकडून लिहिली जाणारी भेसळ उर्फ प्राकृत भाषा असे दोन भेद आहेत. या भेसळ भाषेसंबंधीचें व्याकरणग्रंथ आपल्याला पहावयास सांपडत नाहींत. परंतु शुद्ध भाषेच्या व्याकरणासंबंधीं मात्र बरेच ग्रंथ झालेले आढळतात. मंगोली भाषेंतील बरेंचसें वाङ्मय तिबेटी ग्रंथाचे भाषांतरवजा आहे. उदाहरणार्थ सिध्दीकूर हें पुस्तक मूळ संस्कृत ग्रंथाच्या तिबेटीभाषांतराचें प्रतिभाषांतर आहे. चिनी भाषेंतील बऱ्याच ग्रंथांचीं मंगोलियन भाषेंत भाषांतरें झालीं आहेत. धार्मिक वाङ्मयांत उलीगेर उनदलाइ (उपमासागर), बोधिमोर (धर्ममार्ग), अल्तन गेरेल (सुवर्णप्रकाश), मणिगंबो आणि यर्टुं टचू यिन तोली (विश्र्वदर्पण) हे महत्त्वाचे ग्रंथ होत. पोझडनेव्ह हें एकच काव्य असून तें बऱ्यापैकीं आहे. पण गद्यामध्यें कांहीं कांहीं ठिकाणीं काव्यमय वर्णनें आढळतात. ऐतिहासिक ग्रंथांत सनंग सेट्झेनचे 'गेश्रीक्टे दर ओस्ट मोंगोलेन उंड इर्हेस फूर्स्टेन हौसेस, व अल्टन टोबशी हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. कथावाङ्मयामध्यें गेसरखान व अर्दशी बोर्दशी या वीरासंबंधीं कथ प्रसिद्ध आहेत. जनगरियड हें प्रसिद्ध ऐतिहासिक काव्य आहे. याशिवाय उबश खुंतैदशी, व त्याचे ओइराडशीं झालेलें युद्ध यासंबंधीचें आणखी एक ऐतिहासिक काव्य आहे. शिवाय, रशियन व इंग्लिश बायबल संस्थांनीं बायबलचीं निरनिराळया मंगोली लिपींत भाषांतरें केली आहेत. याशिवाय यूरोपीयन लोकांनीं मंगोली भाषेचीं व्याकरणे व कोश लिहिले आहेत.