विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मग्न (परमाणुभारांक २४.३२)- या धातूचा सन १६९५ त एन. ग्रू यानें शोध लाविला. पृथ्वीवर मग्न धातूचीं शैलितें, कर्बितें व हरिदें हीं सर्वत्र पसरलेलीं आढळतात. याचे अशुद्ध दगड, ओलिव्हीन, हॉर्नब्लेंड, टाल्क, असबेस्टस, मीरशाम, आजीत, डोलोमाइट, मग्नेसाइट, कार्नलाइट, कीसराइट व केनाइट, इतक्या जातीचे आढळतात. या धातूचें हरिद, पालाश किंवा सिंधु यांचें मिश्रण वितळवून व नंतर ऊर्ध्वपातनक्रियेनें हा धातु मोठया प्रमाणावर काढतां येतो. मग्नेसाइट, लोहप्राणिद व कोळसा यांस खूप तापवून ही धातु काढतां येतो. यास विद्युत्प्रवाहपद्धत सर्वांत उत्तम होय. प्रथम बनसेन यानें स. १८५२ त मग्नहरिद चिनी मातीच्या भांडयात वितळून मग्न धातू विद्युत्सहाय्यानें काढिली. परंतु सध्यां कार्नलाइट (मग्न व पालाश यांचें मिश्र हरिद) पासून हा धातु काढण्याचा प्रचार आहे. एका धातूच्या भांडयांत कार्नलाइट वितळवितात. याचे ॠणध्रुव व धनध्रुव कोळशाचे असतात. हा कोळसा एका चिनी मातीच्या नळींत बसविलेला असतो व या नळीस वर एक छिद्र असतें, यांतून हरवायु निघून बाहेर जातो. उष्णमान ७६०˚ अंशावर ठेवितात. हा धातु ७३०˚ अंशावर वितळतो. तो वितळलेला धातु जमवून एका लोखंडी भांडयांत धन करतात व पुन्हां वितळवून लोखंडाच्या जाळयात दाबून शुद्ध करतात.
गु ण ध र्म.- मग्न हा चांदीसारखा पांढरा व फार तेजस्वी धातु आहे. हा धनवर्धनीय व तन्य आहे. याचें वि. गु. १.७५ आहे. निर्द्रव हवें याचें तेज कायम रहातें. परंतु ओल्या हवेंत हा धातु प्राणवायूशीं संयोग पावून याचें तेज नष्ट होतें. हा ६३२.७˚ अंशावर वितळतो. व ११००˚ अंशावर उकळला जातो. हवा, प्राणवायु व कर्ब-द्विप्राणिद या वायूंत हा जळतो व मग्नप्राणिद बनतो. याच्या प्रकाशांत अस्मानी व अत्सस्मानी रंगाचे किरण फार असतात. म्हणून छायाचित्रकलेंत याचा उपयोग करतात. रात्रीच्या वेळेस फोटो काढणें झाल्यास मग्न धातूच्या उजेडांत काढितात. या धातूचा दारूकामांतहि उपयोग करतात. हा वाफेच्या प्रवाहांत तापविला असतां पेट घेतो तेव्हां उज्जवायु बाहेर निघतो व मग्नचा मग्न-प्राणिद बनतो. याला तापवून नत्रवायूंत घातलें असतां त्या वायूशीं हा संयोग पावतो. क्षीणाम्लांत हा विरघळतो व उज्ज वायु बाहेर निघतो. मग्नक्षार तयार होतात. कित्येक धातूंच्या क्षारांत मग्न घातला असतां त्या धातूंचा सांका खालीं बसतो.
सं यु क्त प दा र्थ (कांपाउंड्स):- (१) मग्नप्राणिद (मप्र) - पेरिक्लास नांवाचा जो खनिज सांपडतो तो हाच होय. मग्न धातु हवेंत जाळला असतां हा तयार होतो. उज्जप्राणिद किंवा कर्बित जाळलें असतांहि हा तयार होतो. हा उडून जात नाहीं किंवा याचें द्रवरूपहि होत नाहीं. म्हणून भट्टयांच्या आंतून लेप लावण्याकरितां व मुशी करण्याकरितां हा उपयोगांत आणितात.
(२) मग्नोज्जप्राणिद (म (उप्र)२):- ब्रूसित आणि नेमलित नांवाचें खनिज म्हणजे हा उज्ज-प्राणिद होय. कोणत्याहि मग्नक्षाराच्या द्रावणांत पालाश किवां सिंधुदाहक घातला असतां याचा सांका खालीं बसतो. ए. डी. स्कुल्टन यानें मग्न-हरिद व दाहक पालाश यांचें मिश्रण उकळून व तें मिश्रण थंड करून हा उज्ज-प्राणिद इ. स. १८८५ मध्यें तयार केला होता. हा पांढरा व अस्फटिक घनपदार्थ आहे. हा पाण्यांत क्वचित विरघळतो. परंतु अमोनियाचे क्षार त्यांत घातल्यास त्याची द्रवक्रिया वाढते. याचा सिमेंट करण्याकडे उपयोग करतात.
(३) नैलसंयोगः- मग्न धातु फ्लूरिन किंवा हर या वायूंत किंवा स्तम्भ किंवा अद यांच्या वाफेंत तापविला असतां त्यांशीं संयोग पावून नैलिदें बनतात. फ्लुरिदाखेरीज सर्व नैलिदें पाण्यांत विरघळतात व द्रवग्राहक असतात. याचीं हरिद व अदिद हीं समुद्राच्या व झऱ्यांच्या पाण्यांत आढळतात. याचें हरिद फार महत्त्वाचें आहे. याचें सूत्र मह२.६उ२ अ असें आहे. प्राणिद, उज्दप्राणिद किंवा कर्बित हें उज्जहराम्लांत घालून हें तयार होतें. किंवा मग्नगंधकित व सिंधुहरिद (मीठ) यांचें मित्र द्रावण करून तें तापवून एकदम थंड केल्यास सिंधुगंधकित कमी द्राव्य असल्यामुळें बाहेर पडतें व मग्न-हरिद पाण्यांत राहतें. कार्नलिटपासून पालाश-हरिद तयार करतांना हे आड पदार्थ म्हणून उत्पन्न होतें. मॅग्नेशिया (मग्नप्राणिद) व हरिद यांचें मिश्रण पाण्यांत मिसळून ठेविल्यास थोडया वेळानें त्यांचा एक दगडासारखा कठिण गोळा बनतो. त्यांत निरनिराळी आम्लहरिदें असतात. मग्नाम्लहरिद हवेच्या प्रवाहांत तापविल्यास उज्जहराम्ल व हरवायु तयार होतो व मॅग्नेशिया शिल्लक राहतो. या कृतीचा वेल्डम पोचिनी व माँड यांच्या हरवायु तयार करण्याच्या कृतींत फार उपयोग होतो.
(४) मगनकर्बितः- मग्नीसाइत खनिज द्रव्याच्या रूपानें व खटकर्बिताबरोबर डोलोमाइ या खनिजांत हें आढळतें. मग्नहरिदारावर खटकर्बिताचा प्रयोग करून हें तयार करतां येतें. हें पातळ अम्लांत विद्राव्य नाहीं परंतु ज्या पाण्यांत कर्बद्विप्राणिद घातलेला असतो त्यांत हें द्रवतें. सिंधुकर्बित इप्सम क्षारांत घालून जो पांढरा व घट्ट सांका बनतो त्याला मॅग्नेशिया-अल्बा म्हणतात.
(५) मग्नस्फुरितः- मग्नगंधकितांत सिंधुस्फुरित घालून तें मिश्रण थोडा वेळ ठेविल्यास बारीक षट्कोणी स्फटिक बनतात. यांचें सूत्र मउस्फुप्र ४.७ उ२प्र असें असते. म३ स्फु२ प्र८ हें स्फुरित नगतरिट नांवाच्या खनिजांत असतें. सिंधुस्फुरित व कोणताहि मग्नक्षांर एकत्र करून जो सांका पडतो तो मग्नंधकितांत उकळल्यास हें स्फुरित तयार होतें. अमेनिमग्नस्फुरित (मन उ४ स्फप्र४. ६उ२प्र) हें खनिजहि आहे व मूत्रपेशींतहि सांपडतें. शिवाय मूत्र कुजल्यावर हें तयार होतें.
(६) मग्न धातु किंवा कर्बित हें नत्राम्लांत घातल्यास रंगरहित, द्रवशोषक, व स्फटिकाकृति मग्ननत्रिक बनतें. त्याचा द्रवबिंदु ९०˚ आहे.
(७) मग्न धातु तापवून त्यावरून नत्रवायु किंवा अमोनियाचा प्रवाह सोडल्यास मग्ननत्रिद तयार होतें. निकेल, कोबल्ट, क्रुम, लोह व पारद यांचीं हरिदें यांत मिसळून तापविल्यास त्या धातूंचीं नत्रिदें तयार होतात. व ताम्र व फ्लातिन यांची हरिदें तापविल्यास ती धातुरूप होतात.
(८) मग्नगंधकिदः- मॅग्नेशिया गंधकाच्या वाफेंत तापविल्यास पिंगट रंगाचा गंधकिद तयार होतो. ओल्या हवेंत ठेविल्यास उज्जगंधकिद तयार होऊं लागतें.
(९) ए. काहूर यानें मिथिल व एथिल अदिदाशीं मग्न खंडाचें मिश्रण करून त्यांपासून रंगहरिद, सणसणीत वासाची पातळ, ज्वालाग्राही व पाण्यानें पृथक्करण होणारी अशीं मग्न मिथिल व मग्न-एथिल या नांवाचीं दोन द्रव्यें तयार केलीं.
ओ ळ ख ण्या ची रा त- मग्न-क्षारांच्या द्रावणांत अमोनिया व अमोनिहरिद घालून त्यांत सिंधुस्फुरित घालून पांढरा सांका मिळतो. परिणाममापनांत देखील याच कृतीचा उपयोग करतात.
औ ष धो प यो ग.- मग्न-क्षार हें विवक्षित प्रकारचे क्षार रेचकें समजलीं जातात. हीं रेचकें सौम्य असतात, याचें कारण आंतडयांत आग कमी होते. व रक्तांतील पाणी शोषून घेऊन त्या पाण्याबरोबर हे क्षार आंतडयांतून जातात. उदरासारख्या रोगांत जेव्हां रक्तांतून जास्त पाणी शोषून काढावयाचें असतें तेव्हां हें लक्षांत ठेवावें कीं ज्यामानानें क्षाराचें प्रमाण कमीजास्त असेल त्यामानानें कमीजास्त पाणी शोषलें जातें. आक्झेलिक अम्ल, पारदक्षार, सोमल व ताम्रक्षार यांशीं मग्न अद्राव्य क्षार तयार करतो म्हणून यांच्या विषावर मग्नक्षार उत्तम औषध आहे. मग्नधातु रक्तांत शोषिली जात नाहीं, म्हणून औषधानंतर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम कांहीं होत नाही. नाहींतर मग्नधातूची रक्तांत पिचकारी मारल्यास ती फार विषारी आहे. मधुमेहाच्या रोगांत जेव्हा रक्ताची अल्कयुत्तच्ता वाढवावयाची असते तेव्हां मग्नक्षार देऊं नयेत. नेहमीं मग्न-प्राणिद किंवा कर्बित अर्ध्या द्रामापासून एक द्रामापर्यंत एका वेळेस देतात.