विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मज्जातंतुदाह (न्यूरिटिस)- या रोगामध्यें मज्जातंतूंच्या समूहापैकीं कांहीं समूहांत दाहक्रिया सुरू होऊन अशा रोगाचे (१) एखाद्या स्थानीं दिसून येणारा व (२) अनेक स्थानीं दिसून येणारा असे दोन मुख्य भेद आहेत. पहिल्या प्रकारचें कारण बहुधां थंडी व ओल हें असतें; व त्यामुळें एखादाच मज्जातंतु विकृत होतो. उदाहरणार्थ, मुखमज्जातंतुदाह झाल्यामुळें मुखाचे स्नायू शिथिल पडून अर्दितवायुनामक रोग होत असतो तो पुष्कळता पहाण्यांत येतो. मज्जातंतूवर जखम होऊन किंवा मार बसून अगर ताण किंवा दाब पडून (कोपराचा सांधा निघाला असतां); किंवा शेजारच्या भागांत अगोदर दाहक्रिया सुरू होऊन ती पसरल्यामुळें तींत एखादा मज्जातंतु सांपडल्यामुळें हा रोग होतो.
ल क्ष णें.- (१) एखाद्याच स्थानीं दिसून येणाऱ्या भेदांत विकृति झालेल्या ठिकाणीं जितक्या लांबपर्यंत मज्जातंतु असतो त्या ठिकाणीं कुरतडत असल्याप्रमाणें वेदना सुरू होऊन ती जवळील इतर भागांतहि असते; व त्या भागावर अंमल दाबल्यानेंहि वेदना सुरू होते. त्या मज्जातंतूच्या मार्गावरील त्वचा लाल दिसून तिजवर सूजहि असते. तेथील स्नायु हलवितांना त्रास होतो; तो अवयव अगर भाग बधिर झाल्याप्रमाणें वाटतो. नंतर तेथील स्पर्शज्ञानहि कमी होऊन त्यांतील स्नायूंत कृशता येते व मज्जातंतूत व त्याच्या वेष्टणांत विनाशक्रिया होण्यास प्रारंभ होतो. सौम्य प्रकारचा रोग इजा किंवा सर्दीपासून झाला असल्यास थोडया दिवसांत बरा होतो. परंतु सांधा निखळला असून तो नीट बसविला नाहीं तर त्यामुळें होणारा अगर अन्य प्रकारचा तीव्र स्वरूपाचा रोग कित्येक महिने असतो.
(२) अनेकस्थानीं होणाऱ्या भेदाचा विशेष हा आहे कीं तो दूरस्थ ठिकाणच्या म्हणजे हातापायांतील तंतूंत प्रगट होऊन उजव्या व डाव्या अवयवांत एकाच वेळीं होतो. रोगकारणपरत्वें मज्जातंतूंत निरनिराळया प्रकारची विनाशक्रिया सुरू होते. या भेदाच्या कारणांचें पुढीलप्रमाणें वर्गीकरण केलें आहेः- (अ) इन्ल्फुएंझाच्या विषमज्वरादि साथींच्या दुखण्याच्या विषबाधेपासून, (आ) शिसें, सोमल, पारा, तांबें, फास्फरस यांपासून सावकाश परंतु दीर्घकालपर्यंत होणारा विषार, (इ) संधिवात, क्षय, क्यान्सर यांसारखे सर्व शरीर बिघडविणारें रोग, (ई) महारोग व फिरंगोपदंश रोग, (उ) परदेशांतून आलेले बेरिबेरीसारखे रोग, (ऊ) शिवाय मोठें व नेहमींचें कारण दारूबाजी.
सा मा न्य ल क्ष णें:- प्रथम पायांत व नंतर हातांत बधिरपणा वाटून नंतर पायांत पेटके येतात नंतर पायांत निर्जीवपणा, मुंग्या येणें, दाह व आगवाटणें व ते अवयव हलविले असतां, आणि दाबिले असतां वेदना हीं लक्षणें होतात. कांहीं रोग्यांनां पायांमध्यें फक्त अशक्तपणा व किंचित् श्रम केल्यानेंहि ग्लानि येऊन त्याची चालण्याची ढब बदलून त्यांत कंप व अस्थिरता येते. किंवा पायांचे स्नायु त्यांस अगदीं नेमक्या इच्छेप्रमाणें हलवितां येत नाहींत तर ते अनियमितपणें व अनियंत्रितपणें हलतात. त्या भागाचें पोषण बिघडल्यामुळें त्या विकृत अवयवाचे स्नायू बारीक होतात, त्वचेंत रुक्षता येते किंवा तीवर सुजेप्रमाणें रोगट तकाकी येते. नखें ठिसूळ होतात व तेथील केश गळण्यास सुरवात होते. कांहीं दिवसांनंतर स्नायू कायमचे आंखडल्यामुळें पाऊल लुलें पडणें, सांधे आंखडणें अशा तऱ्हेचीं व्यंगें उत्पन्न होतात. यानंतर ज्यांच्या रोगाची प्रगति थांबत नाहीं ते रोगी अंथरुणास खिळून राहतात व त्यांचा पूर्ण शक्तिपात होऊन विस्मृति, चिडखोरपणा, मनाचा फाजील कोंवळेपणा इत्यादि मन व डोकें बिघडल्याचीं चिन्हें दिसून येतात. यानंतर जुनाट खोकला, हृदयस्नायूंत मेदोवृद्धि, लघवींतून अलब्यूमिन जाणें, कफक्षय यांपैकीं एखाद दुसऱ्या कारणामुळें हा रोगी मृत्युवश होतो. हा रोग पूर्वस्वरूपांत असतांनाच चांगल्या देखरेखीखालीं रोग्यास ठेवल्यास रोग बरा होण्याचा संभव असतो. पण ज्यांनां हा रोग पूर्वी सौम्य स्वरूपांत एकदोनदां झाला आहे असे रोगी किंवा ज्यांचा मेंदु बराच बिघडला आहे अशांचा रोग बरा होण्याचा संभव असतो. पण ज्यांनां हा रोग पूर्वी सौम्य स्वरूपांत एकदोनदां झाला आहे असे रोगी किंवा ज्यांचा मेंदु बराच बिघडला आहे अशांचा रोग बरा होण्याचा संभव कमी असतो त्यातून रोगी दारूबाज असल्यास रोग बरा होण्याचा संभव नसतो म्हटलें तरी चालेल.
उ प चा र.- रोग्यास निजवून ठेवून त्यास स्ट्रिनिया हें औषध टोंचून घालावें. हातपाय भलत्या स्थितींत पडून राहिल्यानें ते आंखडूं नयेत म्हणून वाळूच्या लांबट पिशव्यांचा आधार देऊन ते नीट स्थितींत ठेवावेत. हातापायांस तज्ज्ञ परिचारकाकडून चोळणें, रगडणें असावें; परंतु तें बेताचें व सौम्य तऱ्हेचें असावें व तें लवकरच (रोगाच्या आरंभापासून) सुरू ठेवावें स्नायु आंखडण्यास आरंभ झाला असल्यास तो स्नायु कृत्रिम उपायांनीं योग्य ताण देऊन ठेवतां येईल अशीं अवयवास बांधण्याचीं साधनें तज्ज्ञाकडून आणावींत क्लोरोफार्म हुंगवून गुंगी आणून कधीं कधीं शस्त्रानें हे आंखडलेले पाय बळें वांकवून नंतर ते पुन्हां हालवितां येतील असे करतात. या शस्त्रक्रियेनंतर कांहीं दिवस तो स्नायु ताणलेल्या स्थितींत राहील अशा कृत्रिम साधनांचा उपयोग करतात. इतपत अवयव सुधारल्यावर विजेच्या पेटीचा उपयोग व सौम्य चोळणें, रगडणें सुरू ठेवल्यानें कृश अवयव पुष्ट होऊं लागतो व शेकणें, वाफारा इत्यादि इलाजहि याबरोबर केल्यानें ते रोग्यास सुखावह होतात. सोमलापासून व विशेषतः शिशापासून होणाऱ्या रोगाचा विशेष हा कीं पहिल्या कारणामुळें पायांत रोग झालेला पाहण्यांत येतो व दुसऱ्यामुळें हातांचीं बोटं व मनगट यांसच विशेष रोग होतो. शिशाच्या विषारांत बोटास कंप लवकर सुरू होतो व स्पर्शज्ञानविकृति हें लक्षण नसतें. शिशाचा विषार पोटयाशियम व एप्समसॉल्ट या औषधांनीं लवकर बरा होतो; पण सोमलामुळें हा रोग झाल्यास तो लवकर बरा होत नाहीं. ज्या कारणामुळें सोमल चुकून पोटांत जात असेल तें कारण नाहींसें करावें व इतर उपचार वर दिले आहेत त्याप्रमाणें चालवावेत. मधुमेहरोगामुळेंहि हा रोग विशेषतः पायास होतो. अशक्तपणा व चालण्याच्या ढबीत कंप व अस्थिरता येते. मज्जातंतुविकृतीमुळें पावलांचें पोषण नीट न होऊन त्यामुळें त्यांवर व्रण पडतात त्यास मुख्य जो मधुमेह रोग तो हटविण्याचे इलाज करावेत. इन्फ्लुएंझा तापानंतर अवयवास बधिरता, चलनशक्ति मंद होणें, स्नायु कृश होण्यास आरंभ होणें ही लक्षणें होतात. त्यांत सुरू झालेली विनाशक्रिया विजेच्या यंत्रानें समजते. कांहीं दिवसांनंतर विकृत अवयवाच्या शेवटाकडील भागांत स्पर्शज्ञान कमी झाल्याचें अनुभवास येतें, व छाती, पोट, पाठ, चेहरा इत्यादि ठिकाणच्या स्नायूंमध्येहि चलक्रियेंत जडत्व वाटतें. हे रोगी पूर्णपणें बरे होण्यासारखे असतात. त्यांनां पूर्ण विश्रांति, पौष्टिक, भरपूर व चांगलें अन्न पोटांत स्ट्रिकनिया (कुचल्याचें सत्व) अति अल्प प्रमाणांत देतात.