विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मटकी (मठ)- मठाची लागवड हिमालयापासून तों थेट सिंव्हलद्वीपापर्यंत सर्व उष्ण प्रदेशांत आढळते. हें पीक हलक्या जमिनींत चांगलें येतें. ह्या पिकाचे ताणे जमिनीवर पसरतात. त्याला मुगासारख्या शेंगा येऊन आंतील दाणा रंगाला तांबूस असतो. मठ, बाजरी, जोंधळा, तूर, तिळ, कोदु वगैरे पिकांत मिसळून किंवा मोगण म्हणून वेगळें पेरतात. बीं दरएकरीं सुमारें १॥ ते २ पौंड लागतें. मठ नोव्हेंबर डिसेंबरात तयार होतो. सरासरी दर एकरीं १००-१२५ पौंडांचें उत्पन्न होतें. मठाचा उपयोग गरीब लोकांस फार होतो. गुरांना हें धान्य शिजवून घालतात. कित्येक वेळीं ओले वेल शेंगासहित उपटून बैलांस व घोडयांस चारतात. वाळलेला भुसा व वेल गुरांनां खावयास घालतात.