विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मंडनमिश्र- एक वेदांती पंडित. याच्याबद्दलची खात्रीलायक माहिती उपलब्ध नाही. शंकरद्विग्विजयावरून असें दिसतें की मंडन हा पंचगौडापैकीं कान्यकुब्ज जातींचा ब्राह्मण असून तो माहिष्मती उर्फ महेश्र्वर येथें राहात असे. हा कर्ममीमांसामार्गी व कुमारिलभट्टाचा अनुयायी होता. कुमारिलभट्टाच्या मीमांसापद्धतीवर यानें बरेच ग्रंथ लिहिले. कुमारीलभट्टाचा हा समकालीन होता असें आनंदगिरीच्या शंकरदिग्विजयावरून दिसतें. कदाचित तो मागाहूनहि झाला असेल. हा त्या काळीं कर्ममीमांसा मार्गांचा प्रवर्तक होता व त्यामुळें शंकराचार्यांनां आपल्या संन्यासमार्गाचा प्रसार करण्यापूर्वी याच्याशीं वादविवाद करावा लागला. या वादविवादाची हकीकत अत्यंत मनोरंजक असून ती शंकरदिग्विजयादि ग्रंथांत आढळते. शेवटी शंकराचार्यांनीं मंडनमिश्राचा पराभव केला व मंडनमिश्र हा संन्यासमार्गाचा अनुयायी बनला. यालाच सुरेश्र्वराचार्य असें दुसरें नांव आहे. याची शृंगरेच्या पाठीवर शंकराचार्यांनीं स्थापना केली. यानें शंकराचार्यांच्या सांगण्यावरून बृहदारण्यकावरील व छादोग्यावरील शांकरभाष्यावर टीकाग्रंथ लिहिले. याचा विधिविवेक हा मीमांसेवरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. याशिवाय सुरेश्र्वराचा नैर्ष्कम्यासिद्धि हाहि ग्रंथ प्रसिद्ध आहे.