विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मंडेश्वर- ग्वाल्हेर संस्थान, मंडेश्वर जिल्ह्याचें मुख्य ठिकाण. येथील लोकसंख्या (१९११) १६७८५. हें गांव अफूच्या व्यापाराचें केन्द्र आहे. येथें बायकांच्या चुनडया उत्तम होतात. मंडेश्वर हें फार जुनें, व इतिहासाच्या व प्राचीन वस्तुसंशोधनाच्या दृष्टीनें फार महत्त्वाचें ठिकाण आहे. याचें पूर्वीचें नांव दशपूर (दहा गांवें) असून नाशीकजवळ सांपडलेल्या शिलालेखांत याचा उल्लेख आलेला आहे. मंडेश्वरजवळच्या शिलालेखांत येथील सूर्याचें मंदिर इ. स. ४३७ मध्यें पहिल्या कुमारगुप्ताच्या कारकीर्दीत बांधलें गेलें व पुढें ३६ वर्षांनीं त्याची डागडुजी करण्यांत आली असा उल्लेख आहे. या गांवाच्या पूर्वेस जो किल्ला आहे. तो अलजउद्दीन खिजलीनें १४ व्या शतकांत बांधला. या किल्ल्यामुळें मंडेश्वरगांवाचें नांव इतिहासांत महशूर झालें आहे. इ. स. १५६२ मध्यें माळवा जेव्हां अकबर बादशहाच्या ताब्यांत आला तेव्हां हें गांव माहवा सुभ्यांतील मंडेश्वर सरकारचें मुख्य ठिकाण झालें. १८ व्या शतकांत हें शिंद्यांच्या ताब्यांत आलें.
मंडेश्वराच्या आग्नेयीस ३ मैलांवर सोंदनी अथवा सोंगनी नांवाचें खेडें आहे. तेथें दोन दगडी स्तंभ आहेत. ते एकेका दगडाचे असून त्यांवर जे लेख आहेत त्यांत माळव्याच्या यशोधर्मन् नामक राजानें इ. स. ५२८ त मिहिरकुल हूणाचा त्या ठिकाणीं पराजय केला, असा उल्लेख आहे. या स्तंभाचा गुप्तशतकाचा आरंभकाल ठरविण्याचया वेळीं बराच उपयोग झाला.