विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मंडोर- राजपुताना, जोधपूर संस्थानांतील एक गांव. हें जोधपूर शहराच्या उत्तरेस सरासरी पांच मैलांवर आहे. ऐतिहासिक दृष्टया हें फार महत्त्वाचें ठिकाण आहे. इ. स. १३८१ पर्यंत परिहार रजपुतांची, नंतर इ. स. १४५१ पर्यंत राठोड रजपुतांची ही राजधानी होती. येथें एक किल्ला आहे. त्यांत परिहार घराण्यांतल्या नाहरराव राज्याचा दगडी पुतळा आहे. या किल्ल्यापासून कांही अंतरावर पांच कुंडें आहेत, ती राठोड घरण्यांतील ४ प्रसिद्ध राजांचीं स्मारकें आहेत. तेथेंच एक देऊळहि आहे, त्यावर इ. स. १२१० मधील एक शिलालेख आहे. दुसऱ्या बाजूस मारवाडाच्या वैभवकालाची साक्ष देणारीं कांही स्मारकें आहेत. त्यांत अजितसिंहाचें स्मारक फार भव्य आहे. हें स्मारक त्याच्या मरणानंतर इ. स. १७२४ त ज्या ठिकाणीं त्याच्या ६४ राण्या सती गेल्या त्या ठिकाणीं उभारलें आहे. याच्या शिवाय दुसरें प्रेक्षणीय व महत्त्वाचें ठिकाण म्हणजे तेहेतीस कोटरेवतांक स्थान हें होय.