विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मणिपूर संस्थान- आसाम. उत्तर अ. २३०५०' ते २५०४१' आणि पू. रे. ९३०२' ते ९४०४७' यांच्या दरम्यान हें वसलेलें आहे. क्षेत्रफळ ८४५६ चौरस मैल. उत्तरेस नागा टेंकडया जिल्हा व स्वतंत्र नाग लोकांचे डोंगराळ वसतिस्थान; पूर्वेस ब्रह्मदेश; दक्षिणेस ब्रह्मदेश व लुशी टेंकडया, आणि पश्र्चिमेस कांचर जिल्हा. यांत बराच मोठा डोंगराळ प्रदेश आहे. एका डोंगरावर लोकटक नांवाचें सरोवर आहे. जंगलांत इमारती लांकडांचीं व कळकांचीं झाडें असून हत्ती, बाघ, चित्ता, अस्वल, रानडुक्कर, हरिण, गेंडा व गवा हे प्राणी आढळतात. यांतून इम्फल, इरिल, थोबल, नंबल व नंबोल या नद्या वहात असून येथील खिंडींतील जमीन या नद्यांच्या गाळानें तयार झाली आहे. येथील हवा थंड व आल्हादजनक आहे. यांतील इम्फल गांवीं सरासरी ७० इंच व डोंगरावर सरासरी १०० इंच पाऊस पडतो. येथें कधीं कधीं भूकंप होतो. इ. स. १८९७ त येथें भूकंप झाला होता.
इ ति हा स. - मणिपूरचें राज्य जेव्हां पाँगच्या राजाचें दोस्त राज्य बनलें तेव्हांपासून मणिपूरच्या इतिहासास सुरवात होत. येथील राजघराण्याला पाँगच्या कोम्ब नामक राजानें राजचिन्हें दिलीं. स. १७१४ पर्यंत मणिपूरच्या इतिहासांत म्हणण्यासारखें कांहीच नाहीं. इ. स. १७१४ पर्यंत मणिपूरच्या इतिहासांत म्हणण्यासारखें कांहीच नाहीं. इ. स. १७१४ त नाग नामक राष्ट्रजातींतील पानहिबा नांवाचा गृहस्थ मणिपूरचा राजा झाला व नंतर त्यानें हिंदु धर्म स्वीकारून घरीब नवाझ हें नांव धारण केलें. पुढें येथील सर्व लोक कट्टे हिंदु बनले. या घरीब नवाझानें ब्रह्मदेशावर कित्येक स्वाऱ्या केल्या. व याच्या मरणानंतर ब्रह्मी लोकांनीं मणिपूरवर परत स्वारी केली. तेव्हां येथील जयसिंग राजानें इंग्रजांची मदत घेतली व स. १७६२ मध्यें ब्रह्म लोकांशीं दोस्तीचा तह केला. पुढें पहिल्या ब्रह्मी युद्ध (१८२४) नंतर स. १८२६ त मणिपूर स्वतंत्र आहे असें जाहीर करण्यांत आलें. स. १८३५ त येथें स्वतंत्र आहे असें जाहीर करण्यांत आलें. स. १८३५ त येथें एक पोलिटिकल एजंट नेमला. पुढें गादीसंबंधानें येथील राजघराण्यांतील पुरुषांत यादवी माजली. तेव्हां इंग्रज सरकारला तींत ढवळाढवळ करावी लागली. शेवटीं इसवी सन १८९० त सुरचंद्रसिंग पळून गेला व त्याचा भाऊ कुलचंद्रसिंग राजा झाला. तरी पण खरी सत्ता त्याच्या तिकेंद्रजितसिंग नामक सेनापतीच्याच हातांत होती. हा सेनापति बेकायदेशीर वर्तन करीत असल्यामुळें त्याला पकडण्याकरितां इंग्रज सरकारनें १८९१ सालीं क्विंटन नांवाच्या चीफकमिशनरास फौजेनिशीं तेथें पाठविलें परंतु त्या सेनापतीच्या लोकांनीं कमिशनरास कपटानें ठार केलें; पण लवकरच तिकेंद्रसिंग सेनापति इंग्रज सैन्याच्या हातीं लागला. पुढें सेनापतीस फांशीं देण्यांत आलें व त्याला कुलचंद्र राजाची फूस होती म्हणून कुलचंद्रास पदच्युत करून चूडाचंद्र नांवाच्या त्याच कुलांतील मुलास गादीवर बसविण्यांत आलें. सन १८९१-१९०७ पर्यंत संस्थानचा कारभार पोलिटिकल एजंट पहात असे. स. १९०८ मध्यें चूडाचंद्राच्या हातीं कारभार देण्यांत आला. गेल्या महायुध्दंतील या संस्थानिकाच्या मदतीमुळें त्याला महाराजा ही वंशपरंपरा पदवी आणि ११ तोफांच्या सलामीचा मान देण्यांत आला.
संस्थानची लोकसंख्या इ. स. १९२१ त ३८४०१६ होती. तींत हिंदूचें प्रमाण शे. ६० व मूळच्या रहिवाश्यांचें शें. ३४ आहे. या संस्थानांत पुरुषांपेक्षां बायकांची संख्या जास्त आहे. येथील लोक मणिपुरी भाषा बोलतात. यांत १४७७ खेडीं व इम्फल नांवाचें एक गांव आहे. येथील मूळच्या रहिवाश्यांच्या नाग व कूकी अशा दोन राष्ट्रजाती आहेत.
शे त की.- येथें मुख्य उत्पन्न भाताचें आहे. तरी येथील जमिनींत खसखस, गहूं, नारिंग, लिंबु, अननस, केळीं, आंबे, मिरीं, तंबाखू, व थोडा कापूस हे जिन्नस पिकतात.
व्या पा र व द ळ ण व ळ णः- या संस्थानांत रेशमी किडे मलबेरी वेलीवर पोसले जातात. तो धंदा येथील लोई लोकांच्या हातांत आहे. याशिवाय, पितळेचीं भांडीं तयार करण्याचे व इतर धातूंचें, शेतकीस उपयुक्त असें सामान करण्याचे, टोपल्या, चटया वगैरे विणण्याचे किरकोळ धंदेहि चालतात. येथील निर्गत माल तांदूळ, जंगलांत उत्पन्न होणारे जिन्नस व गुरें, व आयात माल रॉकेल, तेल, सुपारी, मासे, मीठ व सुती कापड हे होत.
रा ज्य व्य व स्था.- महाराजांच्या मदतीला एक दरबार (मंत्रिमंडळ) असतो. त्याचा अध्यक्ष आय्. सी. एस्. एस्. असून तो ब्रिटिश नोकरींतून संस्थान-नोकरींत तात्पुरता आलेला असतो. दरबारांत ३ साधारण व ३ जादा सभासद असतात. हे सर्वं मणिपुरीच असतात. संस्थानांत साक्षर लोकांचें प्रमाण शेंकडा दोन आहे.