विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मथुरा, जि ल्हा.– संयुक्तप्रांत, आग्रा विभागांतील वायव्येकडील जिल्हा. क्षेत्रफळ १४४५ चौरस मैल व लोकसंख्या (१९२१) ६१९१३८ होती. उत्तरेस पंजाबांतील गुरगांव जिल्हा व अलिगड; पूर्वेस अलिगड व इटाह; दक्षिणेस आग्रा व पश्चिमेस भरतपुर संस्थान. यांत यमुनाखेरीजकरून महत्त्वाची नदी एकहि नाही. जिल्ह्याचा बराच भाग जरी सुपीक आहे तरी पश्चिमेच्या बाजूस पहाड असून कांहीं भागांत चुन्याचा दगड सांपडतो. पश्चिमेच्या भागांत बरेंच जंगल आहे. येथील हवा पश्चिमेकडे वाळवंट असल्यामुळें कोरडी व उष्ण आहे. पाऊस सरासरी २६ इंच पडतो.
इतिहासः- मथुरा पूर्वी शूरसेनाची राजधानी होती. येथील फार जुन्या नाण्यांवरून येथें ख्रिस्ती शकापूर्वी १०० वर्षांपासून हिंदु राजे राज्य करीत होते असें दिसतें. त्यानंतर शक-मत्रप राजे येथें राज्य करीत होते. जुन्या लेखांवरून येथें कुशल राजांचें सार्वभौमत्व सिद्ध होतें (इ. स. १-२ ऱ्या शतकांत). इसवी सनाच्या ६ व्या शतकांत या ठिकाणीं जैन लोकांचें प्रस्थ होतें व ह्युएनत्संग जेव्हां येथें आला तेव्हां त्याला येथें एक मोठें शहर दिसलें व त्यावेळेस येथें २० मठ होते. शहराच्या पश्चिम भागाला ब्रिजमंडळ (कृष्णाचा प्रदेश) असें म्हणतात. व या ठिकाणीं प्रत्येक जागेशीं कृष्णाच्या आयुष्यांतील कोणत्याना कोणत्या प्रसंगाचा संबंध दाखवितात. मोंगल अमदानींत औरंगझेबानें येथें धर्मभ्रष्टता आरंभिली होती. मोंगल सत्तेच्या लयानंतर मथुरेचा रजपुत जाठ लोकांशीं संबंध आला. इ. स. १७५७ मध्यें जेव्हां अहमदशहा दुराणी हिंदुस्थानावर चालून आला तेव्हां सरदार जहानखानानें मथुरेवर कर लादण्याचा प्रयत्न केला परंतु लोक किल्ल्यांत जाऊ दडले. तेव्हां त्यानें मथुरा शहर लुटलें. पानिपतच्या युद्धनंतर सुरजमल्ल जाटाच्या घराण्याकडे मथुरा राहिलें. पण जाट राजानें होळकराला आश्रय दिल्यानें ते त्याच्या हातून गेलें. १८०३ च्या सुमारास बहुतेक जिल्हा इंग्रजाकडे गेला. स. १८५७ च्या बंडापर्यंत मथुरेंत शांतता होती. मथुरा जिल्ह्याचा पूर्व भाग बहुतेक बंडांत सामील झाला होता. या जिल्ह्यात वृंदावन, महावन, गोवर्धन वगैरे प्रेक्षणीय स्थळें आहेत. कंकाली येथील जैन स्तूपावरून कुशान राजांची बरीच हकीकत कळते.
येथें शेंकडा ८९ हिंदु आहेत. इतर हिंदूमध्यें ब्राह्मण, रजपूत, जाठ, कोरी, गदरिया, गुजर वगैरे बऱ्याच जातींचे लोक आहेत. पूर्वेकडील भाग पश्चिमेकडील भागापेक्षां जास्त सुपीक आहे. मुख्य पिके ज्वारी, जव, हरभरा, गहूं, बाजरी, ऊंस, तंबाखू वगैरे होत. जिल्ह्यांत कापडावर छापील काम (रामनाम) किंवा गोपाळकृष्ण नांवाचा छाप उठवून धोतरें छापणें) चांगलें होतें. दगडी इमारती बांधणारे फार कुशल कारागीर आहेत. चांदीचीं चित्रविचित्र खेळणीं होतात. थोडीसा नीळहि उत्पन्न होतो. निर्गत माल धान्य व कापूस व आयात माल साखर, धातु, लोखंडी सामान हा आहे. शेंकडा ४.३ लोकांनां लिहितांवाचतां येतें.
त ह शी ल.- जिल्ह्यांतील नैर्ॠत्येकडील तहशील. क्षेत्रफळ ४०० चौरस मैल. लोकसंख्या (१९११) २०१३७२. हींत २१४ खेडीं व ५ शहरें आहेत; पैकीं मथुरा (जिल्ह्याचें व तालुक्याचें मुख्य ठिकाण), वृंदावन व गोवर्धन हीं मोठीं आहेत. हींत गिरिराज नांवाचा पवित्र पर्वत आहे. मुख्य पिकें ज्वारी, बाजरी, गहूं, हरभरा हीं आहेत.
श ह र.- मथुरा जिल्ह्याचें मुख्य शहर. येथें छावणी आहे. हें यमुना नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलें असून आग्रयाहून दिल्लीला जाणाऱ्या वाटेवर आहे. क्षेत्रफळ १११ चौरस मैल. लोकसंख्या (१९११) ५८१८३. शहराचा बराचसा इतिहास जिल्हा या लेखाखालीं आला आहे. हें शहर श्रीकृष्णाचें जन्मस्थान म्हणून फार पवित्र मानलें जाते. रावणाची बहीण कुंभीनसी हिचा नवरा मधु यानें हें शहर वसविलें असें म्हणतात. म्हणून याला मधुपुर असेंहि नांव आहे. वराहमिहिर, प्लिनी, टॉलेमी वगैरे प्राचीन ग्रंथकारांनीं या शहराचा उल्लेख केला आहे. एरियन यानेंहि ही शूरसेनाची राजधानी म्हणून म्हटलें आहे. सातव्या शतकांत ही एका मोठया राज्याची राजधानी होती. या शहरावर पूर्वीपासून फार स्वाऱ्या झाल्या. इतर बाबतींतहि हें शहर ऐतिहासिक महत्त्वाचें आहे. १७८९ सालीं महादजी शिंद्यानें या क्षेत्राची सनद मोंगल बादशहापासून मिळविली होती. स. १८०३ त हें ब्रिटिशांकडे गेलें. या शहराचा देखावा रेल्वेपुलावरून किंवा नदीच्या दुसऱ्या तीरावरून फारच मनोहर दिसतो. येथील मंदिरें फार प्रेक्षणीय असून त्यांचे दरवाजे वगैरें बरेच शृंगारलेले असतात. एका घाटावर जयपुरच्या राणीचें ''सती बुरूज'' नांवाचें स्मारक आहे.
मथुरा जिल्ह्याचें हें मुख्य शहर असल्यामुळें सर्व जिल्हाअधिकारी येथें राहातात. येथें इ. स. १८६६ त म्युनिसिपालिटी स्थापन झाली. येथील व्यापारहि वाढत्या प्रमाणावर आहे. येथें मुख्यत्वेंकरून जमाखर्ची वह्यांचा कागद व पितळी मूर्ती फार तयार होतात.