विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मदनपल्ली, ता लु का.- मद्रास, चित्तूर जिल्ह्यांतील एक तालुका. क्षेत्रफळ ८३६ चौरस मैल व लोकसंख्या (१९२१) १४१३१०. तालुक्यांचें मुख्य गांव मदनपल्ली असून खेडीं ९९ आहेत. तालुक्यांत पापघ्नी व बहुधा या दोन मोठया नद्या वहात जातात. तालुक्याचा बराच भाग डोंगराळ आहे.
श ह र.- मदनपल्ली पोटविभाग, तालुक्याचें मुख्य ठिकाण. लोकसंख्या सुमारें १५००० पूर्वी हें एका स्थानिक सरदाराचें रहाण्याचें ठिकाण होतें. मदनपल्ली समुद्रसपाटीपासून २२५० फूट उंच असल्यामुळें एकंदर जिल्ह्यांत हें शहर अधिक थंड असतें. हें शहर फार रमणीय असून चोहों बाजूंनीं डोंगरी रांगा व हिरवेगार जंगल आहे. येथें आठवडयाचा बाजार भरत असून त्यांत उत्तर अर्काट जिल्हा व दुसऱ्या पुष्कळ ठिकाणाहून जिन्नस विक्रीस येतात.