विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मदिना- हें अरबस्तानांतील एक शहर असून याला आल मदिना अथवा मदिना रसुलअलज अशीं दुसरीं नांवें आहेत. उत्तर अक्षांश २५० व पूर्व रेखांश ४००. महंमद मक्केहून पळून येथें येऊन राहिला होता. मदिना हें नांव कुराणांत सांपडतें. या शहराचें जुनें नांव यथ्रीब असून टॉलेमीनें याला लथ्रीपा असें नांव दिलें होतें. मदिना शहराच्या उत्तरेस जवळच ओहाद शिखर आहे. येथें एक प्रसिद्ध लढाई झाली. जवळच महंमदाचा चुलता हमजा याची कबर आहे.
या शहरांत जमीनदार व शेतकरी लोकांचा विशेष भरणा आहे. शेतकरी लोकांनां नखाविला असें म्हणतात व ते शियापंथाचे आहेत. मदिनाची शहर व आसमंतांतील खेडीं मिळून एकंदर लोकसंख्या १६ हजार ते २० हजारपर्यंत आहे. मुख्य शहराभोंवतीं दगडी कोट आहे. मदिना शहराचें भूषण म्हणजे महमंदाची कबर होय. ही कबर शहराच्या पूर्व भागांत असून हिचे मनोरे व भव्य घुमट प्रेक्षणीय आहेत. या कबरीभोंवतीं पितळेच्या तारेचें कुंपण आहे.
इ ति हा स - यथ्रीब (जुनें नांव) मधील अमलेफाईट लोक व त्यांनां मोझेसच्या वेळेस जिंकिणारे हिब्रू यांच्या गोष्टी म्हणजे निवळ काल्पनिक होत. महमंद मदिना (इ. स. ६२२) येथें आल्यापासून तों उम्मदांनीं साम्राज्याची राजधानी दमास्कस येथे नेईपर्यंतच्या काळांत मदिना शहराचें ऐतिहासिक रीत्या अतिशय महत्त्व वाढलें. परंतु हरा येथील युद्ध व शहरांची लूट (६८३) झाल्यानंतर मदिना शहराचें राजकीय महत्त्व जें एकदम कमी झालें तें पुन्हां कधींच वाढलें नाहीं. खलिपांच्या सत्तेचा ऱ्हास झाल्यावर मदिना येथील अमीरांनीं कमी अधिक प्रमाणांत स्वतंत्रतेनें राज्य केलें. ईजिप्त जिंकिल्यानंतर मदिना येथें स्थापित झालेली डळमळीत तुर्की सत्ता वहाबी लोकांनीं (१८०४) मदिना घेऊन नाहीशीं केली. परंतु तुर्की-इजिप्त फौजेनें १८१२ त हें शहर पुन्हां काबीज केलें. सीरियांतून हेजाझपर्यंत रेल्वे बांधून तुर्की सरकारनें येथें आपला दरारा चांगला बसविला. दमास्कस व मदिना यांमधील दळणवळण रेल्वेनें १९०८ सालीं सुरू झालें. महायुद्धमध्यें १९१६ सालीं अरब लोकांनीं मदिनाला वेढा दिला. हा वेढा जवळ जवळ तीन वर्षें चालून शेवटीं १९१९ सालीं तुर्कांचा पराजय झाला व तुर्कांनीं मदिना अरबांच्या स्वाधीन केलें. स. १९२४ अम्मनपासून मदिनापर्यंत हेजाझ रेल्वे बांधण्यांत आली. हल्लीं हेजाझबरोबर मदिनाहि वहाबी लोकांच्या ताब्यांत आहे.