विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मद्रास इलाखा- यानें दक्षिण हिंदुस्थानचा बराच भाग व्यापला आहे. याचें क्षेत्रफळ १४१०७५ चौरस मैल असून समुद्रकिनारा पूर्वेस १२०० मैल आणि पश्चिमेस ४५० मैल आहे. पण येवढया समुद्रकिनाऱ्यावर नैसर्गिकरीत्या उपयुक्त असें एकहि महत्त्वाचे बंदर नाहीं. मद्रास आणि कोचीन हीं दोनच बंदरें साधारण सोयीचीं आहेत. पूर्वघाट आणि पश्चिमघाट या पर्वतांच्या ओळी असून त्या निलगिरी पर्वतानें जोडल्या गेल्या आहेत. बऱ्याच नद्या पश्चिमेकडून वहात येऊन पूर्व किनाऱ्याला मिळतात. गोदावरी, कृष्णा व कावेरी या नद्यांच्या कांठचा प्रदेश विशेष सुपीक आहे. इलाख्याची लोकसंख्या १९२१ सालीं ४२७९४१५५ होती, पैकीं शेंकडा ८९ हिंदु, शेंकडा ७ मुसुलमान, शेंकडा ३ ख्रिस्ती आणि शेंकडा १ वन्यधर्मी आहेत. बहुतेक लोक द्राविड मानववंशांतील असून द्राविडी भाषा बोलतात. एक हजार लोकसंख्येंत ४१० लोक तामिळ भाषा, ३७७ लोक तेलगु, ७५ लोक मल्याळम्, ३७ लोक उडिया, ३५ लोक कानडी आणि २३ हिंदुस्थानी भाषा बोलतात.
मद्रास इलाख्याचा राज्यकारभार साधारणतः मुंबई व बंगला या इलाख्यांप्रमाणेंच चालतो. गव्हर्नर हा चार एक्झिक्युटिव्ह कौन्सिलर (राखीव खात्याकरितां), आणि तीन दिवाण (सोंपीक खात्याकरितां) यांच्या मदतीनें राज्यकारभार चालवितो. मद्रास इलाख्याच्या राज्यव्यवस्थेंत एक महत्त्वाचा फरक असा आहे कीं, विभागांचे कमिशनर अधिकारी तिकडे मुळींच नाहींत. या इलाख्याची सुधारणा करणें अलीकडे पैशाच्या अडचणीमुळें फार अवघड झालें होतें. सतत पांच वर्षें तुटीचें बजेट चालू राहून अखेर १९२४ च्या मार्च महिन्यामध्यें जमाखर्चाची तोंडमिळवणी करण्यांत आली. मेस्टनयोजनेप्रमाणें वरिष्ठ सरकारला द्यावी लागणारी वार्षिक खंडणी ही या इलाख्याची मोठी तक्रारीची बाब आहे. याप्रमाणें मद्राससरकार पैशाच्या अडचणींत असलें तरी स्थानिक कारभाराच्या संस्थांनां (लोकलबोर्डें व म्युनिसिपालिटयांनां) पूर्वीपेक्षा अधिक देणग्या सरकारनें दिल्या आहेत. हल्लीं ही देणग्यांची रक्कम सुमारें दीड कोटी असून सदरहू संस्थांची नादारी दूर करण्याचा सरकारचा सतत प्रयत्न चालू आहे.
या इलाख्यांत मुख्य धंदा शेतकीचा असून त्यांत शेंकडा ६८ लोक गुंतलेले आहेत. मुख्य पिकें भात, चोलम्, रागी व कंबू हीं आहेत. शिवाय कापूस, ऊंस, व भुईमूग हीं पिकें होतात. या इलाख्यांतील शेतकरीवर्गासंबंधानें ही विशेष गोष्ट आहे कीं, त्यांनीं आपली 'दि युनायटेड प्लॅन्टर्स असोसिएशन ऑफ साऊथ इंडिया' या नांवाची रजिस्टर्ड संस्था स्थापली असून तिच्यामध्यें कॉफी, चहा, रबर, आणि दसऱ्या कांहीं पदार्थांची लागवड करणाऱ्या लोकांचे प्रतिनिधी आहेत. या इलाख्यांत एकंदर २२ कापसाच्या गिरण्या असून त्यांत ३५००० कामकरी (१९२४ मध्यें) आहेत. याशिवाय तेलाच्या गिरण्या, दोर, रबर व कौलें वगैरेंच मिळून १२० हून अधिक कारखाने आहेत. समुद्रावरून होणारा वार्षिक व्यापार सुमारें ७५ कोट रुपयांचा आहे. इतर प्रांतांप्रमाणें येथेंहि सरकारला जंगलाचें उत्पन्न मिळतें. सुमारें १९ हजार चौरस मैल राखीव जंगल या इलाख्यांत आहे.
या इलाख्यांत शिक्षणाची सतत वाढ चालू आहे. हल्लीं एकंदर ४० हजार सार्वजनिक शिक्षणसंस्था असून त्यांत २० लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्राथमिक शाळांपासून कलाकौशल्य आणि धंदे यांचीं कॉलेजें वगैरे सर्व प्रकारच्या शिक्षणसंस्था आहेत. मागासेल्या जातीच्या मुलांनां शिक्षण देण्याचे विशेष प्रयत्न चालू आहेत. शिक्षणखात्याचा एकंदर खर्च सुमारें ३४०००००० रुपये आहे. प्रेसिडेन्सी कॉलेज, ख्रिश्र्चन कॉलेज व पच्चैयप्पा कॉलेज (मद्रास). सेन्ट जोसेफ कॉलेज (त्रिचनापल्ली), गव्हर्मेंट कॉलेज (कुंभकोणम्), गव्हर्मेंट कॉलेज (राजमहेंद्री), महाराजा कॉलेज (त्रिवेंद्रम्), ॲग्रिकल्चर कॉलेज (कोईमतूर) आणि मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेज (मद्रास) या प्रमुख शिक्षणसंस्था आहेत.
दिवाणी व फौजदारी काम पहाणारें सर्वांत वरिष्ठ कोर्ट किंवा हायकोर्ट मद्रास येथें असून त्यांत एक ची जस्टिस व अकरा दुय्यम जज्ज आहेत. फौजदारी खटले चालविण्याकरतां २५ सेशन जज्ज असून त्यांच्या मदतीला ॲडिशनल व असिस्टंट सेशन जज्ज आहेत. याशिवाय डिस्ट्रिक्ट व म्याजिस्ट्रेट, सब्ऑर्डिनेट म्याजिस्ट्रेट आणि ऑनररी म्याजिस्ट्रेट आहेत. दिवाणी खटले चालविण्याचें काम २४ डिस्ट्रिक्ट जज्ज, २९ सब्ऑर्डिनेट जज्ज आणि डिस्ट्रिक्ट मुन्सफ हे करतात. मद्रास हा मोठा भांडखोर इलाखा आहे. येथें ८५ माणसांस एक फिर्यादी असें प्रमाण पडतें. पोलीसखात्याचा मुख्य इन्स्पेक्टर जनरल असून त्याच्या हाताखालीं इलाख्याच्या चार भागांत चार डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल आहेत, आणि प्रत्येक जिल्ह्याला एक एक पोलीस सुपरिंटेंडेंट आहे. कायम पोलिसांची संख्या तीस हजार आहे. इ. स. १९२४-२५ सालच्या अंदाजपत्रकांत इलाख्याचें एकंदर उत्पन्न १७७६१८००० रुपये असून एकंदर खर्च रुपये १६६२०४४०० होता. मद्रासच्य प्रांतिक कायदेकौन्सिलांत एकंदर १२७ सभासद असून त्यांपैकीं ९८ लोकनियुक्त आणि २९ सरकारनियुक्त (पैकीं २३ अधिकारी आणि ६ बिन अधिकारी) आहेत.
म द्रा स इ ला ख्यां ती ल सं स्था नें.- या इलाख्यांत पांच हिंदी संस्थानें असून त्यांचें एकंदर क्षेत्रफळ १००८७ चौरस मैल आहे. त्यापैकीं त्रावणकोर आणि कोचीन येथें प्राचीन हिंदु घराणीं राज्य करीत आहेत. पदुकोट्टई येथें तोंडीमन नांवाच्या सरदाराचे वंशज राज्य करीत आहेत. बंगनपल्ले येथें एक नबाब राज्य करतो. सोंडूर येथें शिवाजीच्या भोंसले घराण्यांतील एक शाखा राज्य करीत आहे. सदरहू संस्थानांचें प्रत्येकी क्षेत्रफळ, लोकसंख्या व उत्पन्न पुढीलप्रमाणेंः -
संस्थान | क्षेत्रफळ | लोकसंख्या | सुमारें उत्पन्न |
त्रावणकोर | ७६२५ | ४००६०६२ | २ कोटी |
कोचीन | १४१७ | ९७९०१९ | ७० लक्ष |
पदुकोट्टई | ११७९ | ४२६८१३ | २४ लक्ष |
बंगनपल्ले | २५५ | ३६६९२ | ३ लक्ष |
सोंडूर | १६७ | १२६८४ | १ लक्ष |
या संस्थानांची माहिती त्या त्या नांवाखालीं स्वतंत्र आलेली आहेच.