विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मधुमती- हा बंगालमधील गंगा नदीचा एक मोठा प्रवाह असून नडिया जिल्ह्यांत कुष्टिया गांवाजवळ याला गरई हें नांव आहे. हा दक्षिणेकडे असाच वहात गेल्यावर पुढें या प्रवाहाला मधुमती हें नांव देण्यांत येतें. नंतर गोपालगांवाजवळ वायव्य दिशेनें बाकरगंज जिल्ह्यांत शिरून व पुढें जिल्ह्याची पश्चिम सीमा बनून हा दक्षिणेकडे वळतो. तेथून सुंदरबन प्रदेश ओलांडून खुलना व बाकरगंज जिल्ह्यांच्या बरोबर हा मध्यभागांतून वहात जाऊन बंगालच्या उपसागरास मिळतो. एकंदर प्रवाहाची लांबी २३० मैल आहे. मधुमतीला बाकरगंज जिल्ह्यांतून कच्चा, जेसोर जिल्ह्यांतून गंगणी व खुलना जिल्ह्यांतून भैरव या नद्या मिळतात.