विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मन- (मन ह्या विषयासंबंधीच्या कांहीं महत्त्वाच माहितीकरितां 'मानसशास्त्र' ज्ञानकोश प्रस्तावनाखंड वि. ५ पृ. ६२७ ते ६४४ पहा). मन हा शब्द 'माइंड', 'सेल्फ', 'कॉन्शस्नेस', ह्या इंग्रजी शब्दांशी समानार्थक म्हणून येथें वापरला आहे. भारतीय तत्त्वज्ञानांत मनाला दुय्यम दर्जा दिलेला आहे. अनुभवजन्य जगाची विभागणी एकीकडे ज्ञेय पदार्थ व दुसरीकडे ज्ञाता आत्मा अशी केली आहे व मन हें इंद्रियगोचर पदार्थांचें ज्ञान करून देणारें मध्यस्थ ''करण'' आहे असें समजलें आहे. यूरोपीय तत्त्वज्ञानांत एकीकडे ज्ञेय जड पदार्थ व दुसरीकडे ज्ञातें मन अशी विभागणी केलेली आहे. ह्या दोन विभागणींतील फरक ध्यानांत ठेवला म्हणजे मन हा शब्द आम्ही यूरोपीय तत्त्वज्ञानाला अनुसरून वापरला आहे हें सहज लक्षांत येईल.
म न व आ त्मा.- आत्म्याला भौतिकशास्त्रांमध्यें स्थान नाहीं, आणि येथें जो या दोहोंत भेद दाखविला आहे तो विचारविषयक भेद म्हणून व्यक्त केला आहे. आत्म्याचें 'वास्तविक' अस्तित्व असतें हें असिद्ध आहे. तथापि सिद्ध असें गृहीत धरून भेद व्यक्त केला आहे. मन आणि आत्मा यांतील भेद खालीलप्रमाणें आहेः - आत्मा स्वयंभू, स्वायत्त, स्थिर, सर्वव्यापी आणि अमर आहे. मन हें शरीराबरोबर उत्पन्न होणारें व म्हणून शरीरतंत्र आहे; त्याचप्रमाणें शरीराबरोबर तें नाश पावतें व प्रत्येक क्षणाला तें बदलत असतें. तें अत्यंत अस्थिर आणि चंचल आहे. ''चंचलंहि मनः कृष्ण'' असें गीतेंत त्याचें वर्णन केलेलें आहे. विकास व क्रमांकित लय हीं मनाला आहेत, आत्म्याला नाहींत. आत्मा आणि मन ह्यांत अशा तऱ्हेचा भेद असल्यामुळें मानसशास्त्र हें आत्म्याचा अभ्यास अध्यात्मशास्त्राकडे सोंपवून फक्त मनाविषयीं विचार करतें. आत्म्याचें अमरत्व आणि सर्वव्यापित्व हें अनुभवाच्या कक्षेबाहेरचें असल्यामुळें मानसशास्त्राला आत्म्याचा विचार सोडून देऊन फक्त मनाचा अभ्यास करावा लागतो.
म ना चें स्व रू प व का र्य.- वैशौषिक दर्शनांत (अ. ३, आन्हिक २ सू. १) ''आत्मेंद्रियार्थसंनिकर्षे ज्ञानस्य भावोऽ भावश्र्च मानसो लिंगम्'' असें मनाचें वर्णन केलें आहे. आत्म्याचा व इंद्रियार्थांचा सन्निकर्ष झाल्यावर ज्ञान उत्पन्न होणें किंवा न होणें हें मनावर अवलंबून आहे.
आत्म्याचा बाह्य वस्तूंशीं संयोग झाल्यानेंच केवळ ज्ञान उत्पन्न होतें असें नाहीं. ज्ञानोत्पत्तीला मनाची मध्यस्थी अवश्यक आहे. मन एका विवक्षित इंद्रियाशीं संयोजित असेल तरच त्या इंद्रियास बाह्य वस्तूचें ज्ञान होईल. उदाहरणार्थ, पुष्कळ वेळां आपणाला असा अनुभव येतो कीं, घडयाळाकडे डोळे लावून आपण नुसतें पहात असतों; पण किती वाजलें याचें ज्ञान होत नाहीं. कारण मन त्यावेळीं दुसरीकडे कोठेंतरी गुंतलेलें असतें. तें परत येऊन दृष्टीशीं संयुक्त झालें कीं, ताबडतोब किती वाजलें हें कळतें. सारांश बाह्य वस्तूंचें ज्ञान आत्म्याला मनाच्या द्वारें होतें.
देहाला कारखान्याची उपमा दिली तर मालकाच्या वतीनें ज्याप्रमाणें सर्व कामें त्याचा मुनीम करतो व मालकाला कारखान्याची माहिती मुनीमातर्फेंच होत असते त्याप्रमाणें शरीराचा मालक जो आत्मा तो मनातर्फे शरीराचे व्यापार चालवीत असतो असें म्हणतां येईल. किंवा आत्मा हा शरीराचा राजा असून मन हें त्याचा प्रधान आहे असा दाखला घेतला तरी तो चुकीचा होणार नाहीं. वेदान्त, सांख्य वगैरे इतर दर्शनांमध्येंहि मनाचें कार्य सामान्यतः अशाच प्रकारें सांगितलें आहे. फक्त योगामध्यें मनाच्या ऐवजीं चित्त हा शब्द वापरला आहे. आपल्याकडील तत्त्वज्ञानांत मनाच्या स्वरूपासंबंधीं (स्ट्रक्चर) फारसा विचार केलेला दिसत नाहीं.
यूरोपीय तत्त्वज्ञानानें एका बाजूला मन (माइन्ड) व दुसऱ्या बाजूला मन्तव्ये (मॅटर) असे अनुभवजन्य जगाचे दोन स्पष्ट भाग केले आहेत, पण आपल्याकडे मनाच्या बाजूला बुद्धि असें वेगळें भिन्न तत्त्व मानलें आहे. या दोहोंच्यावर आत्मा आहे तो वेगळाच.
म न व बु द्धि.- मन व बुद्धि यांतील भेद अनवश्यक आहे, एवढेंच नव्हे तर तो चुकीचा आणि घोंटाळा करणारा आहे. ''व्यवसायात्मिका बुद्धिर्मनो व्याकरणात्मकम्॥'' म्हणजे बुद्धि हें व्यवसाय करणारें म्हणजे सारासार विचार करून निश्र्चय करणारें आणि मन हें व्याकरण म्हणजे अंमलबजावणी करणारें असा मन आणि बुद्धि यांत भेद केलेला दिसतो. पण या ठिकाणीं मन हा शब्द अत्यंत संकोचित अर्थानें वापरला आहे. वास्तविक मनाचें कार्य तीन प्रकारचें आहेः (१) ज्ञानेंद्रियामार्फत येणाऱ्या बाह्य पदार्थांच्या संवेदनांची संघटना करणें, (२) ह्या संघटनेच्या साहाय्यानें पदार्थाचें योग्य ज्ञान झाल्यावर त्याची ग्राह्याग्राह्यता ठरविणें, व (३) तदनुरूप तो जवळ अगर दूर करण्याची खटपट करणें, हे मनाचे त्रिविध व्यापार आहेत, त्यांपैकीं दुसऱ्या प्रकारच्या व्यापाराचा जो कर्ता त्याला बुद्धि हें निराळें नांव देऊन बराच घोंटाळा उत्पन्न केला आहे. एक मन तीन प्रकारचे व्यापारा करीत असतांना मनाच्या एका भागालाच बुद्धि हें नांव देऊन मनाच्या बरोबरीचा दर्जा त्याला दिला आहे. आपण अशी कल्पना करूं कीं, एकच मनुष्य मास्तर, दुकानदार आणि भिक्षुक आहे. आतां असें जर कोणी म्हणूं लागला कीं, मास्तर व भिक्षुक असलेला मनुष्य निराळा व दुकानदार असलेला मनुष्य निराळा तर त्याचें हें म्हणणें जितकें समंजसपणाचें होईल तितकेंच मन व बुद्धि यांचें स्वतंत्र अस्तित्व मानणें समंजसपणाचें होईल. व्यत्तिच् एकच असून तिचें संबंध निरनिराळें असावे पण संबंधाच्या स्थानीं भिन्न व्यक्तीचें अस्तित्व मानल्यानें जशी अव्यवस्था होईल तशीच अव्यवस्था बुध्दीला मनापासून वेगळे काढल्यापासून झाली आहे.
बौ द्धं चें म त.- मनाविषयीचें बौद्धंचें मत मानसशास्त्र दृष्टया वैशेषिकांच्या मताहून अधिक महत्त्वाचें आहे. बौद्ध वाङ्मयांत मनाचें स्वरूप व त्याच्या प्रक्रिया ह्याविषयीं अत्यंत सूक्ष्म अभ्यास केलेला दिसतो. मनासंबंधीं बुद्धचें काय मत आहे हें जर बरोबर कळावयाचें असेल तर त्याच्या प्रतिपादनाचा रोख वैदिक व औपनिषदिक आत्मवादाच्या विरुद्ध होता हें पक्कें ध्यानांत ठेविलें पाहिजे. वेदांत व उपनिषदांत आत्मा अमर, सर्वव्यापी, स्थिर आणि अचल असा आहे असें सांगितलें आहे. बुद्धची शिकवण ह्याच्या अगदीं उलट आहे. जगांत सर्व कांहीं क्षणिक म्हणजे क्षणोक्षणीं पालटणारें आहे, ह्या सामान्य नियमाला मन अपवाद असूं शकणार नाहीं. तें अस्थिर व चल आहे. क्षणोक्षणीं उत्पन्न होणाऱ्या व विलयास जाणाऱ्या भावनांची मालिका अथवा क्षणिक मानसीय स्फुंदनाची सांखळी म्हणजेच मन - हें बुद्धच्या मनोविषयक सिध्दंताचें सार आहे. ''शरीर हें एक, दोन, तीन, चार, पांच, दहा, वीस वर्षेपर्यंत एका पिढीपर्यंत किंवा क्वचित शंभराहून अधिक वर्षेपर्यंत टिकतें. परंतु ज्याला मन, चित्त किंवा विज्ञान असें म्हणतात त्याचा अहोरात्र एकसारखा एका भावांत उद्भव व दुसऱ्या भावांत विलय होत असतो'' (संयुक्तनिकाय भा. २ पा. ८७, मिसेस् ऱ्हिस डेव्हिड्स यांच्या बुद्धिस्ट सायकॉलजी ह्या ग्रंथांतून घेतलेला उतारा). आपण ज्याला मन किंवा चित्त म्हणतों त्याचें अस्तित्व सदासर्वदा एकसारखें भासमान होत नाहीं. प्रतिबिंबित वस्तूशिवाय जसा आरसा किंवा लाटेशिवाय जसा पाण्याचा पृष्ठभाग तसें मन हें मूळ सुप्त किंवा अकर्मक स्थितींत असतें. किंबहुना अशा स्थितींत ''मन आहे'' असें सुद्धंम्हणतां येईल किंवा नाहीं याची शंका वाटतें. बुद्धमताप्रमाणेंच जर खरोखर बोलावयाचें असेल तर प्रत्येक वस्तुमात्राच्या आगमनाबरोबर मन 'होतें' असा शब्दप्रयोग करावयास पाहिजे. एक भिक्षु, बुद्धचें मत म्हणून मन क्षणिक नसून शाश्वत आहे व त्याला पुनर्जन्म आहे असें लोकांनां सांगत सुटल्याबद्दल बुद्धनें त्याची चांगली हजेरी घेतल्याचें वर्णन एके ठिकाणीं आलें आहे. नंतर बुद्धभगवान् त्याला उपदेश करतात कीं ''मी तुला परोपरीनें सांगितलें नाहीं का कीं, मनाचा उद्भव करणावांचून होत नाहीं म्हणून ज्ञेयपदार्थ कारण झाला तरच मन विस्फुरित होतें (सर्व भिक्षूंनां उद्देशून). विज्ञानाला कारणापासून निरनिराळया संज्ञा प्राप्त होतात. दृश्य पदार्थ व नेत्र ह्यांच्या संयोगाला दृग्विज्ञान श्राव्यविषय व श्रवणेंद्रिय यांच्या संयोगाला श्रोतृविज्ञान ...; विज्ञान हें कसें आहे व त्याचा उदय अथवा उद्भव कसा होतो तें तुमच्या आतां लक्षांत आलें ना? आणि हा उद्भव बाह्य पदार्थावर अवलंबून असतो असें नव्हे कां? बाह्य पदार्थ नाहींसा झाला कीं त्याच्यामुळें ज्याचा उद्भव झाला तें विज्ञान अथवा मन नाहीसें होतें (मज्झिमनिकाय १.२५६, सदर पुस्तकांतून उध्दृत केलेलें पान १५). मन म्हणजे नित्य, शाश्वत, अमर असें कांहीं तत्त्व नसून फक्त क्षणिक मानस विस्फुरणांचा एक समुच्चय आहे, हा बुद्धच्या व त्याच्या अनुयायांच्या मताचा सारांश आहे.
जै नां चें म त.- जीव अथवा आत्मा हा 'देहपरिणाम' आहे असें जैन मानतात. देहाची जी व्याप्ति तीच आत्म्याची व्याप्ति. आत्मा देहाहून लहान असेल तर त्याला सर्व देहाचें ज्ञान होणार नाहीं. गर्भावस्थेंत आत्मा अगदीं लहान असतो. देहाच्या वाढीबरोबर आत्म्याची वाढ होते. मरणानंतर आत्मा पुन्हां संकुचित होतो. आत्म्याची सर्व शरीरभर व्याप्ति कशा प्रकारची असते ह्याला बाह्यसृष्टींत दाखला मिळणें कठिण. ह्या मतावर शंकराचार्यांनीं टीका केली आहे ती अशीः - आत्मा देहपरिणाम आहे असें म्हणतां येत नाहीं, कारण तसें मानल्यास आत्मा देहाप्रमाणेंच अनित्य होईल. शिवाय एक देह सोडून दुसऱ्या देहांत प्रवेश करतांना आत्म्याला अडचण उत्पन्न होणार. उदाहरणार्थ हत्तीचा आत्मा घोडयाच्या शरीरांत कसा समाविष्य होणार? आत्मा शरीराबरोबर वाढूं लागल्यास बाहेरचे नवीन परमाणू त्यांत येऊन मिळाले पाहिजेत. पण यांचें प्रमाण मूळच्या परमाणूहून अधिक झालें म्हणजे पूर्वीच्या आत्म्याची सरूपता ती कोठें राहिली?
एका व्यक्तीच्या आयुष्यामध्येंच मनाची कशी वाढ होते याचें आतां दिग्दर्शनं करूं. मूल जन्मास येतांनाच कांहीं आनुवंशिक संस्कार बीजरूपानें आपल्याबरोबर आणीत असतें व हें संस्कार बीजरूपानें आपल्याबरोबर आणीत असतें व हे संस्कार बाह्य जगाच्या संसर्गानें प्रभावी होतात; अर्थात् बीजसंस्काराच्या विकासाला परिस्थितीचें आनुकूल्य आवशयक आहे. ज्या संस्कारांनां परिस्थिति अनुकूल सांपडेल तेच प्रभावी होता, बाकीचे तसेच जिरून जातात. हा सिध्दंत वनस्पतिबीजाला व मानवीबीजाला सामान्यतः सारखाच लागू पडतो. परंतु दोहोंमध्यें एक महत्त्वाचा भेद आहे. खडकावर पडलेलें वनस्पतिबीज उन्हानें करपून जातें पण मनुष्यप्राणी अत्यंत विरुद्ध परिस्थितीशीं झगडून तिच्यावर पूर्ण मात करूं शकतो. खडकाचें रम्य उपवनांत रूपान्तर करण्याचें सामर्थ्य मानवी मनांत आहे. हें सामर्थ्य सर्वांच्या ठिकाणीं सारखंच दिसून येत नाहीं. म्हणून ज्यांच्या ठिकाणीं तें दिसून येतें त्यांनां अलौकिक पुरूष असें म्हणतात. जन्मानंतर प्रथमच श्वासोच्छ्वास व रुधिराभिसरण ह्या क्रिया सुरू होतात व तदनंतर डोळे, त्वचा, कान इत्यादि अवयवांकडून संवेदना येण्यास सुरवात होते. प्रथमारंभीं ह्या संवेदना शुद्ध स्वरूपाच्या असतात, त्यांचें प्रज्ञांत रूपांतर होत नाहीं. ह्या ठिकाणीं संवेदना (सेन्सेशन) व (पर्सेप्शन) प्रज्ञा यांतील भेद स्पष्ट करणें जरूर आहे. इंद्रियाचा बाह्य वस्तूंशीं संयोग झाला म्हणजे त्या संयोगाचा संदेश मज्जातंतुद्वारां मेंदूला जाऊन पोंचतो, व मेंदूवर संस्कार करतो. इंद्रियवस्तुसंयोगापासून मेंदूवर होणाऱ्या संस्कारापर्यंत जी क्रिया ती संवेदना होय. येथपर्यंत संवेदना शुद्ध असते. परंतु ही नूतन संवेदना पूर्वीच्या संवेदनासंस्कारांनां जागृत करते व त्यांच्याशीं संमीलित होते. नूतन संवेदनेचे पूर्वसंवेदनासंस्काराशीं संमीलन होतांच तिचें प्रज्ञेंत रूपान्तर हातें व वस्तूचें ज्ञान मनाला होतें. केवळ शुद्ध संवेदना निरर्थक असते ती सार्थ झाली म्हणजेच वस्तूचें ज्ञान होतें. समजा कीं, आपण घरांत बसलों असतां मोटारीच्या शिंगाचा आवाज ऐकला; म्हणजे श्रवणेंद्रियाच्या द्वारें आपल्याला एक संवेदना मिळाली. ह्या संवेदनेचा किमान अर्थ रस्त्यावर एक मोटारीचें शिंग आहे किंवा आलें एवढाच होई, परंतु तो आवाज ऐकल्याबरोबर मोटारीचे शिंग आलें असें न समजतां मोटार आली असें आपण समजतो. एवढेंच नव्हें तर आपल्याकडे कोणी भेटावयास येणार आहेत अशी पूर्वसूचना मिळाली असल्यास ते गृहस्थ आले आहेत इतकाहि त्या संवेदनेपासून अर्थ उत्पन्न होईल. संवेदना व त्यांचा नित्यसंबंधित अर्थ यांचें उत्तम उदाहरण म्हणजे मोटारीचें शिंग सायकलला लावलें असतों पुढें चाललेल्या माणसांची त्या शिंगाचा आवाज ऐकून जी विलक्षण धांदल उडते ती होय. सारांश, सार्थ संवेदना म्हणजेच प्रज्ञा होय. अर्थशून्य संवेदना मनुष्याच्या आयुष्यांत पहिल्या थोडया दिवसांत शक्य असतात. असें प्रो. जेम्स यानें म्हटलें आहे. त्यानंतर पुढें प्रत्येक संवेदनांचें प्रज्ञेंत रूपान्तर होतें. लहान मुलाच्या हस्तसंचारादि क्रियांच्या मागें मानसिक प्रेरणा नसते. लहान मुलें हातपाय हलवतात तें स्नायूंच्या अनैच्छिक क्रियांचें द्योतक असतें. तसेंच लहान मुलांचें हंसणें किंवा आरडणें त्याला पूर्वजन्मीच्या सुखदुःखाची अठवण कारण आहे असें प्राचीन शास्त्रज्ञ स्पष्टीकरण करीत, पण अर्वाचीन मानसशास्त्रज्ञ ह्याहि क्रिया अनैच्छिकच व स्नायुधर्मप्रेरित आहेत असें म्हणतात.
मीचा उदय व त्याची वाढः- अनैच्छिक व अर्थशून्य क्रियांच्या पुनरावर्तनामध्येंच ऐच्छिक व सार्थ क्रियांचा हळू हळू उद्भव होतो, त्याचप्रमाणें सार्थ क्रिया करतां करतांच कर्त्याच्या स्वरूपाची क्रमाक्रमानेंच अधिकाधिक जाणीव होत जाते. ''मला खावयास पाहिजे, भूक लागली,'' ''मला तहान लागली, पाणी पाहिजे,'' ''मला झोंप आली, अंथरूण घालून पाहिजे'' म्हणून आईच्याकडे मूल मागण्या करतें. पण ह्या ''मला'' मध्यें मी कोण याची त्याला बरोबर कल्पना आलेली नसते. ''मी'' ची अस्तिस्वरूपांत ओळख होण्यास नास्तिस्वरूपांतच प्रारंभ होतो. ''मी'' कोण आहे हें कळण्यास अगोदर ''मी'' कोण नाहीं हें प्रथम मुलाला समजूं लागतें. आई मी काहीं, बाप नाहीं, बहिण किंवा भाऊहि मी नाहीं, इतर बाह्य वस्तूहि मीपासून निराळया आहेत किंबहुना ''मी'' बाह्य वस्तूपासून निराळा आहे हें म्हणणें अधिक बरोबर होईल. अशा प्रकारें ''तू'' तून ''मी'' वेगळा काढतां काढतांच ''मी'' च्या केंद्राचा उद्भव होत असतो, एखाद्या मुलाचें नांव घेऊन त्याला तूं कोणता तें दाखीव असें विचारतात. त्याचें नांव नारायण असलें तर ''नारायण कोणता दाखीव पाहूं?'' असें विचारिलें तर नारायण पोटावर हात ठेवून सांगतो कीं ''हा नारायण.'' बहुतेक सर्व मुलें पोटावर हात ठेवून ''हा मी'' म्हणून सांगतात त्यांत एक महत्त्वाचा मुद्दा असतो. पोट म्हणजे सर्व शरीर असा त्याचा अर्थ असतो. सर्व शरीर ज्याचें तो मी. मीच्या मालकीच्या मालमत्तेची यादी करूं लागलों तर शरीरापासून सुरवात केली पाहिजे. ''मी'' चा गाभा जर कोणता असेल तर तो देहिक संकलित संवेदना हा होय. ''मी'' च्या भावनेंतून शरीराची भावना वजा केली तर बाकी काय राहील? ही मीमांसा अर्थात् मानसशास्त्राच्या भूमिकेवर उभें राहून केलेली आहे हें ध्यानांत ठेविलें पाहिजे. वेदांती अथवा अध्यात्मशास्त्रवादी असें म्हणतील कीं, आत्मा देहाहून निराळा, सुखदुःखाची तत्संबंधानें देहभावना वजा केली तरी आत्म्याचें कांहींच कमी झालें नाहीं.
परन्तु मानसशास्त्राच्या दृष्टीनेंच केवळ विचार करावयाचा असेल तर शरीराला 'मी' च्या भावनेंत प्रमुख स्थान दिलें पाहिजे. शरीरानन्तर आईबाप, बायकोमुलें, बहिणभाऊ हे येतात. ह्यांपैकीं कोणाला जर लोकांनीं नांवें ठेविलीं तर आपणांस खपत नाहीं. त्यांनां चांगलें म्हटलें तर आपणांस बरें वाटतें. जर कोणी वारलें तर स्वतःला भरून न काढतां येण्याजोगा तोटा झाला असें आपणांस वाटतें. शरीर आणि कुटुंबांतील माणसें येवढयानेंच 'मी' चे सर्व घटक संपत नाहींत, तर कपडे, सामान, घरदार, सायकल इत्यादींचा त्यांत समावेश होतो. ज्याला ज्याला म्हणून 'माझें' म्हणतां येईल अशा सर्व ''माझ्यांचा'' समूह म्हणजे 'मी' असें प्रो. जेम्सनें (प्रिन्सिपल्स ऑ सायकॉलजी भा. २. पान २९१) म्हटलें आहे तें अगदीं यथार्थ आहे. परंतु आपल्याकडील ध्येयांची मर्यादा ह्याच्या पुढें गेली आहे हें ध्यानांत ठेविलें पाहिजे. सर्व मानवी प्राण्यांच्या ठिकाणीं आत्मभावानें पहातों त्याला आपण ''महामन:'' अथवा महात्मा म्हणतो. श्री ज्ञानेश्वरमहाराज यांनीं म्हटल्याप्रमाणें ''हें विश्वचि माझें घर। ऐशी मति जयाची स्थिर। किंबहुना चराचर। आपण झाला॥'' अशा प्रकारचें ''वसुधैव कुटुम्बकम्'' चें उदात्त व अत्युच्य ध्येय गांठीपर्यंत मनाची अखंडित प्रगति करण्याची जबाबदारी आपल्याकडील तत्त्वज्ञानानें प्रत्येकावर ठेविलेली आहे.
मनाच्या स्वरूपाविषयीं भारतीयांच्या निरनिराळया दर्शनातील मतें येथवर सांगितलीं. आतां यूरोपीय मानसशास्त्रांतील कांहीं मतें पुढें देतों. सामान्यतः विकासवादाचा पगडा यूरोपांतील सर्व शास्त्रीय विचारावर पडल्यामुळें मानसशास्त्रांतहि त्याची छटा स्पष्ट दिसते. मन हें प्राणिसृष्टीच्या निरनिराळया पायऱ्यांतून विकास पावत आहे हा सामान्य सिध्दंत सर्वत्र गृहीत धरतात. विकासवाद्यांच्या मतें वैयक्तिक मन हे परिस्थितीशीं झगडण्याकरितां प्राण्यांजवळ दिलेलें एक साधन आहे. निरनिराळया परिस्थितींत प्राण्यांकडून होणाऱ्या प्रतिक्रियांचें नियमन करणें हें मनाचें मुख्य काम आहे. जीवसृष्टींत सर्वांत खालच्या पायरीवर असणाऱ्या प्राण्यांची प्रतिक्रिया अगदीं साध्या स्वरूपाची असते. त्या प्राण्यांत ज्ञानकर्मेंद्रियभेद झालेला नसतो. ह्याच्या वरच्या पायरीवरील प्राण्यांत ज्ञानेंद्रियभेदानें येणाऱ्या संवेदनांवर भिन्न प्रतिक्रिया होते परंतु त्यांनां पदार्थांचें ज्ञान नसतें. त्याहून वरच्या वर्गांतील प्राण्यांनां पदार्थांचें स्पष्ट ज्ञान होतें व त्यांच्या इष्टानिष्टतेनुरूप ते संपादन करण्याचे त्यांच्याकडून संघटित भावनायुक्त प्रयत्न होतात. ह्या वर्गांत साधारणतः सर्व पशूंची गणना करतां येईल. सर्वांत उच्च कोटींतील प्राण्यांची म्हणजे मनुष्यप्राण्यची प्रतिक्रिया याहूनहि अधिक संघटित व त्याच्या मानसिक क्रिया अधिक उच्च दर्जाच्या व अधिक गुंतागुंतीच्या असतात.
डॉ. मॅकडूगलनें मानवी मनाचें स्वरूप पुढें सांगितलें आहे. त्याच्या मताप्रमाणें सहजप्रवृत्ति (इंन्स्टिक्ट) हा मानवी मनाचा पाया होय. सहजप्रवृत्तीवर मानवी मनाची सर्व इमारत उभारलेली आहे. त्याच्याच शब्दांत सांगावयाचें तर ''जन्मप्राप्तप्रवृत्ती ह्या सर्व मानवी क्रियांच्या मूलउत्पादक होत. प्रत्येक विचारपरंपरा प्रवृत्तीच्या प्रेरणाशक्तीनेंच शेवटास जाते व प्रत्येक शारीरिक क्रियेचा उगम व तिचें सामर्थ्य प्रवृत्तीवर अवलंबून आहे. पूर्ण विकसित मनाची श्रेष्ठ बुद्धि हें, प्रवृत्तींनां आपले हेतू प्राप्त करतां यावेत म्हणून त्यांच्या हातांत दिलेलें एक साधनच आहे. ह्या प्रेरक प्रवृत्ती जर नाहींशा केल्या तर शारीरिक जीवाला कोणतेंहि कार्य करतां यावयाचें नाहीं. तो निष्क्रिय व सुंध होऊन बसेल आणि स्प्रिंग तुटलेल्या घडयाळासारखी किंवा कोळशाच्या अभावी बंद पडलेल्या एंजिनासारखी त्याची अवस्था होईल. व्यक्तीच्या अगर समाजाच्या जीविताचें नियंत्रण करणाऱ्या मानसिक शक्ती जर कोणत्या असतील तर त्या प्रवृत्ती होत. इच्छा, मन आणि जीव यांचें गूढ रहस्य प्रवृतींतच सांठविलेलें आहे'' (सोशल सायकॉलजी, चवदावी आवृत्ति, पान ४४)
डॉ. फ्रॉइडयूंग ह्यांच्यासारख्या अगदीं अलीकडील मानसशास्त्रज्ञांनीं स्वप्नांच्या व विकृत मनांच्या अभ्यासावरून ठरविलेलें मनाचें स्वरूप पुढें देत आहे. प्रत्यक्ष आपण ज्या कामांत गुंतलेलों आहोंत त्या कामाशीं कांहीं संबंध नसलेला अथवा मनांतील सद्यःविचारपरंपरेला सोडून असलेला असा एखादा स्फुट विचार एकदम एखाद्या वेळेला मनांतून चमकून जातो याचा अनुभव सर्वांनां आहेच. हा स्फुट विचार एकाएकीं अनपेक्षित कां व कोठून येतो, तसेंच स्वप्नामध्यें इंद्रियांचे दरवाजे बंद झाल्यावर मनाचे व्यापार कसे चालतात. या प्रश्र्नांचा विचार करूं लागल्यास जागृत ज्ञात मनःप्रवाहाखालीं अज्ञात मनःप्रवाहाचें अस्तित्व गृहीत धरण्याची डॉ. फॉइडला जरूर वाटूं लागली. ज्ञातमन (कान्शस माइंड) आणि अज्ञातमन (अन्कान्शस माइंड) अशीं दोन अगदीं पृथक मनें मानवींत कीं काय हा कठिण प्रश्र्न आहे. साधारणतः एकाच मनाचे ज्ञात आणि अज्ञात असे दोन थर आहेत असें मानण्यास हरकत नाहीं. अज्ञात मनाचें अस्तित्व गृहीत धरून त्याच्या साहाय्यानें मानवी मनोरचनेचें स्वरूप काय दिसतें हें आपणांस येथें पाहावयाचें आहे.
इंद्रियाकडून क्षणोक्षणीं येणाऱ्या संवेदनांनी सूचित केलेले व पूर्वानुभूत विचारांचे स्मृत्यवशेष ह्या घटकांनीं बनलेल्या भागास मनाचा पृष्ठभाग असें म्हणतां येईल. ह्या पृष्ठभागावरील सर्व घडामोडीचें आपणास जागृतींत पूर्ण ज्ञान असतें. पृष्ठभागाखालील पातळींत जुने स्मृत्यवशो संगृहित झालेले असतात. हे स्मृत्यवशेष अल्पशा प्रबोधकांनीं उत्तेजित होऊं शकतात येथपर्यंत ज्ञात मनाची हद्द आहे. ह्याच्याहि खालच्या पातळींत जे स्मृत्यवशेष असतात, ते नित्याच्या प्रबोधकांनीं प्रबोधित होत नाहींत. ते स्वप्नामध्यें जागृंतींतील व्यापाराचें दडपण नाहींसें झाल्यावर मनाच्या पृष्ठभागावर येतात. तसेच मोहनिद्रेच्या (हिप्नॉटिक ट्रान्स) किंवा मनोव्यवच्छेदक पद्धतीच्या (सायको अनॅलिटिक) उपायांनीं ज्ञात मनाच्या आवारांत आणतां येतात. कांहीं स्मृत्यवशेष पृष्ठभागाच्या खालीं खोल दडपून ठेवण्यांत मनाचें संरक्षण करण्याचा हेतु असतो. अज्ञात मनाचें अस्तित्व गृहीत धरून त्यावरून मनाचें स्वरूप कोणत्या प्रकारचें दिसतें हें समण्यास पुढें दिलेल्या आकृतीचा चांगला उपयोग होईल (ही आकृति टॅन्सलेच्या 'न्यू सायकॉलजी ॲन्ड् इट्स रिलेशन् टू लाइफ, ' पा. ५४ वरून घेतली आहे.
या आकृतींत ज्ञातमनोप्रवाहाची रेषा मनाचा पृष्ठभाग दाखविते. हा पृष्ठभाग म्हणजे क्षणोक्षणीं पालटणाऱ्या मनोभावांचा जणुं काय एक चलच्चित्रपटच होय! अ१ अ२ इत्यादि प्रज्ञांनीं व त्यांनी उत्तेजित केलेल्या ब१ ब२ इत्यादि स्मृत्यवशेषांनं ज्ञातमनःप्रवाहाचे घटक बनत असतात. ब३ सारख्या कांहीं प्रज्ञांचे स्मृत्यवशेष पार्श्वभागापर्यंत पोंचतात, पण त्यांतले कांही ड१ ड२ प्रमाणें दडपून टाकले जातात. ते जागृतावस्थेंत क्वचित्, परंतु स्वप्नामधून वारंवार प्रच्छन्न अथवा विकृत स्वरूपांत पृष्ठभागावर येतात. अज्ञात भागांतील क१ क२ स्मृत्यवशेष अधिक खोल गेलेले म्हणून वर आणण्यास अधिक अवघड असल्यामुळें त्यांपासून मनाच्या स्वास्थ्यास फार धोका असतो व त्यापासूनच निरनिराळया मानसिक विकारांची उत्पत्ति होते. मनाच्या स्वरूपाविषयीं व कार्याविषयीं सांगितलेल्या भारतीय तत्त्वज्ञानांतील व यूरोपीय तत्त्वज्ञानांतील भिन्न मतांचा साकल्यानें विचार केल्यास 'मन हें काय गूढ आहे' या मूळ प्रश्र्नास आतांपर्यंत कितपत समाधानकारक उत्तर मिळालें आहे याविषयीं शंका शिल्लक राहतेच. पुढें तरी या रहस्याचा उलगडा होणार काय अशा प्रकारच्या संशयवादाचें, क्षणभर मनांत प्राबल्य होतें. परंतु संशयवादाची वावटळ शांत झाल्यावर दोन मार्ग अजूनहि पुढें खुले आहेत असें आढळून येतें. पहिला मार्ग म्हटला म्हणजे मनाचें स्थान जो मेंदु त्याचें सूक्ष्मतर व सूक्ष्मतम ज्ञान प्राप्त करून घेणें हा होय व दुसरा मार्ग 'मन काय आहे' हें कळण्याकरितां 'मन काय करतें' ह्याचा अधिकाधिक अभ्यास करणें हा होय. थोडक्यांत सांगावयाचें तर, मस्तिष्कविज्ञान (ब्रेन फिजिऑलजी) आणि वर्तनविज्ञान (बिहेव्हियर स्टडी) ह्या दोन मार्गांनीं प्रगति केल्यास ज्या मानवी मनानें बाह्या जगाचीं गूढें उकललीं त्याला स्वतःविषयीं अधिक निश्चित माहिती मिळेल अशी आशा करण्यास जागा आहे येवढें शेंवटी नमूद केलें पाहिजे. (लेखक प्रो. द. ग. लोंढे).