विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मम्मट- अलंकारशास्त्रावरील प्रसिद्ध संस्कृत ग्रंथकार. याच्या संबंधीची जी थोडीफार माहिती उपलब्ध आहे तीवरून तो काश्मीर येथील रहाणारा असून त्याच्या बापाचें नांव जय्यट होतें असें दिसतें. यानें काव्यप्रकाश नांवाचा अलंकारशास्त्रावर सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. यांत त्यानें आपल्या पूर्वी होऊन गेलेल्या अलंकारशास्त्रज्ञांचा व निरनिराळया कवींचा उल्लेख केला आहे, त्यावरून तो ११००० च्या सुमारास उदयास आला असावा असें दिसतें. या काव्यप्रकाशग्रंथाचे १० उलजस आहेत व त्यांत एकंदर १४२ कारिका अगर सूत्रें आहेत. या कारिकांवर त्यानें स्वतःच टीका लिहिली आहे पण ती संपूर्ण नसून ११८ कारिकापर्यंतची आहे. कदाचित् त्याच्या निधनामुळें ती टीका अपुरी राहिली असावी असें दिसतें. या मम्मटाच्या टीकेला 'वृत्ति' असें नांव आहे. बाकीच्या कारिकांवर अल्लट नांवाच्या पंडितानें टीका लिहिली अशी आख्यायिका आहे. हा काव्यप्रकाशग्रंथ अलंकारांवर प्रमाणभूत समजला जातो. त्याच्यावर एकंदरींत ४६ टीका झाल्या आहेत. त्यांपैकीं माणिक्यचंद्राची 'संकेत' टीका, श्रीवत्सलांछनाची 'सारबोधिनी' टीका, भीमसेनाची 'सुधासागर' टीका व नागोजीभट्टाची 'लघु व बृहदुद्योत' टीका या प्रसिद्ध आहेत. शब्दव्यापारविचार नांवाचा दुसराहि एक ग्रंथ मम्मटाच्या नांवावर मोडतो. व्याकरणमहाभाष्य टीकाकार कैयट व चारी वेदांवर भाष्य लिहिणारा उवट हे याचे धाकटे बंधू होते असें भीमसेनानें आपल्या 'सुधासागर' नांवाच्या काव्यप्रकाशावरील टीकेंत लिहिलें आहे.