विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मलबार- हा मद्रास इलाख्यांतील श्रीमंत, सुंदर व सुपीक जिल्हा असून याचें प्राचीन नांव केरल होतें. क्षेत्रफळ ५७०५ चौरस मैल. हा जिल्हा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर १५० मैल दक्षिणोत्तर पसरला आहे. पोनानी, बेयपोर व बलर पत्तनम या यांतील महत्त्वाच्या नद्या आहेत. ताल, बांबु, व फणस हीं झाडें व खालच्या भागांत देवदार, पाईन, फणस, शिसू, सागवान इत्यादि इमारतीच्या उपयोगी अशी पुष्कळ झाडें सांपडतात. येथें काळया मिऱ्याचे वेल दिसतात. वाघ, चित्ता, अस्वल, गवा, सांबर, डुक्कर, हत्ती इत्यादि श्वापदे यांत आहेत. हवा दमट असली तरी निरोगी आहे. उष्णता ७००-९०० या अंशांच्या दरम्यान असते. पावसाचें मान ११६ इंच असून दुष्काळ बहुतेक पडत नाहीं.
इ ति हा स.- मलबारच्या व त्रावणकोरच्या इतिहासाचा अगदीं निकट संबंध आहे. येथें नायर व नंबुद्री लोक आहेत. ते बहुधां आर्य लोकांची जी प्राचीन काळीं लाट पसरली, त्यांपैकीं असावेत. मलबारचा इतर परदेशाशीं व्यापारामुळें संबंध जडला होता. इकडील प्राचीन राजांची खरी माहिती अद्यापि आढळली नाहीं. शिलालेखांत कांहीं माहिती सांपडते. तुंपत्तु रामानुज उर्फ रामन एलुयथम यांच्या केरळालाति नांवाच्या ग्रंथांत ही प्राचीन माहिती थोडीशी आली आहे. परशुरामानें हा देश (मल इ = पर्वत + आळ = लाटा) उत्पन्न करून वस्ती करविली अशी कथा आहे. फिनीशियन, सालोमनच्या वेळीं यहुदी, टॉलेमीच्या काळीं ईजिप्त देशांतील लोक, व अरब वगैरे लोक प्राचीन काळीं मलबारशीं व्यापार करीत असत. येथील पेरुमाल राजवंशावळींत पहिला चेरमान (केरळचा) प्रसिद्ध होता. नंतर चोळ, पांडय, दुसरा चोळ, कुलशेखर, बाण, तुळुवन, इंद्र, आर्य, कुंडन, कोट्टि, मात, एरि, र्कोपेन, विजयन, वल्लभ, हरिश्चंद्र, मल्लन वगैरे राजे होऊन गेले. त्यांची माहिती केरलोत्पत्ति व केरलविशेष महात्म्य यांमध्यें आहे. शिवाय 'चेर' पहा. यापुढील कालांत मलबारचे तुकडे होऊन बरींच लहान राज्यें अस्तित्वांत आलीं; त्यांपैकीं उत्तरेकडील कोलत्तिरी अथवा चिराक्कलचा राजा, दक्षिणेंतील झामोरीन व कोचीन राजे, यांचा पुढच्या इतिहासांत पुष्कळ वेळां उल्लेख केलेला आहे. नंतर पोर्तुगीज लोकांचा यांच्याशीं संबंध आला. डच लोक पोर्तुगीजांचा हेवा करूं लागे व त्यांनीं कोचीन व तंगसेरी हीं ठाणीं पोर्तुगीज लोकांपासून १६६३ सालीं घेतली. १७१७ सालीं झामोरीनपासून चेटवाई नांवाचें बेट त्यांनीं मिळविलें. पुढच्या ५० वर्षांत डच लोकांच्या सत्तेचा ऱ्हास होऊं लागला. कनानोर १७७१ सालीं डच लोकांनीं विकलें. १७७६ त चेटवाई हैदरनें जिंकिलें व २९ वर्षांनीं कोचीनवर इंग्रजांनीं आपला ताबा बसविला. १६९८ सालीं कालिकत येथें फ्रेंचांनीं वसाहत केली. स. १८२६ त माहींत आपलें ठाणें बसविलें. इंग्रजांनीं १६६४ त कालिकत येथें पाय ठेविला व पुढें २० वर्षांत तेलेचरी व चेटवाई वगैरे जागीं त्यांनीं आपलीं व्यापाराचीं ठाणीं स्थापन केलीं. येथील राजांचें हैदराशीं वांकडें होतें, म्हणून हैदरानें १७७४ सालीं हा प्रदेश पूर्णपणें आपल्या ताब्यांत घेतला. टिप्पूनें या लोकांचा फार छळ केला, म्हणून येथें बंड झालें व येथील राजे इंग्रजांच्या बाजूला मिळाले. या भांडणाचा निकाल १७९२ सालीं श्रीरंगपट्टणचा तह होऊन झाला. ह्या तहान्वयें हा सर्व मुलूख कंपनी सरकारास मिळाला. वायनाड, टिप्पूच्या मृत्यूनंतर इंग्रजांच्या ताब्यांत आलें.
मलबारमध्यें फार ठिकाणीं प्राचीन काळचे अवशेष सांपडतात. येथील देवळांची रचना व घरांची पाखीं पाहिलीं असतां, त्या वेळच्या वास्तुशिल्पावर मंगोलियन संस्कृतीची छाया पडली आहे असें वाटतें.
लखदिव बेटें धरून मलबारची लोकसंख्या (१९२१) ३०९८८७१ आहे. म्हणजे साऱ्या मद्रास इलाख्यांत (त्रावणकोर संस्थान वगळल्यास) या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे. त्यांत शेकडा ६८ हिंदु व ३० मुसुलमान आहेत. यांत कालिकत, तेलिचरी, पालघाट, कोचीन, कनानोर, बडगारा,व पोनानी हीं मोठीं गांवें आहेत. येथील लोकांच्या भाषेस मलयालम् (मल्याळी) असें म्हणतात.
हिंदु लोकांत तामिळ, तेलगु, तिय्यन (ताढी काढणारे), नायर (पूर्वी क्षात्रपंथाचे), चेरूमन (मोलमजुरी करणारे), कम्मालन व नंबुद्रि : वगैरे जातींचा समावेंश होतो. नंबुद्रि ब्राह्मणांचें येथील लोकांत फार वजन आहे. या लोकांत ''मरमकत्तायम्'' कायद्यानें म्हणजे मातृकन्यापरंपरेनें जिंदगीची व्यवस्था व लग्नें होतात. अलीकडे लोकांच्या संमतीनें सुधारणा केली आहे. लग्नाची नोंदणी केली असतां कायद्यानें आईबापांच्या मालमत्तेवर त्यांच्या संततीचा हक्क चालतो. मुसुलमान लोकांचें मोपला किंवा मापला (महापिल्ले; हें नांव पूर्वी अरब लोकांपासून येथल्या किनाऱ्यावर राहणाऱ्या बायकांनां झालेल्या संततीस लावीत असत. पण आतां या नांवावरून पश्चिम किनाऱ्यावर राहाणाऱ्या बायकांनां झालेल्या संततीस लावीत असत. पण आतां या नांवावरून पश्चिम किनाऱ्यावर राहाणाऱ्या मुसुलमानांचा बोध होतो.) आणि लब्बे (ह्यांत मिश्र जातींचा समावेश होतो) असे दोन वर्ग आहेत. या जिल्ह्यांत ख्रिश्र्चन लोकांची वस्ती ५० हजारांवर आहे; त्यांपैकीं बहुतेक मूळचे रहिवाशी वाटे आहेत.
या जिल्ह्यांत पावसाळा दोन वेळां येतो. त्या प्रत्येक वेळीं एक पीक काढतात. कांही उत्तम जमिनींत तिसरें पीक निघतें. भाताची लागवड दोन प्रकारची असते. भात हें येथील लोकांचे मुख्य अन्न होय. याखेरीज सुपारी, केळीं, व मिरी हीं पिकें महत्त्वाची आहेत. फणस, आंबे, विडयाचीं पानें, दालचिनी, व भाजीपाले हे बागायतीचें मुख्य उत्पन्न होय. वेलदोडे वायनाडच्या भागांत होतात. अरनाड, वलन्हनाड व पोनानीच्या कांहीं भागांत आलें होतें. येथें पाण्याची समृद्धि असल्यामुळें कालवे काढण्याची जरूरी भासत नाहीं. वेलदोडे, मध, मेण, मायफळ, रिठा, गोंद, दालचिनी, मिरीं, इमारती लांकूड इत्यांदि या उत्पन्नाच्या बाबी होत. जंगलांतील हत्ती पकडून त्यांचीहि विक्री करतात व ती एक सरकारी उत्पन्नाची बाब आहे. कालिकत येथें पूर्वी मागावर चिटाचें कापड काढीत असत; तें यूरोपांत क्यालिको नांवानें प्रसिद्ध झालें, परंतु आतां तें काढणें अगदीं बंद झालें आहे. काथ्याच्या दोऱ्या करणें, शेती, ताडी काढणें, मासे खारवणें व नारळाचें तेल काढणें, लांकूड कापणें हे धंदे अजून लोक करतात. कौलें व विटा भाजण्याचे कारखाने लोकांनीं सुरू केले आहेत. कालिकत, तेलेचरी व फरोके या गांवीं यूरोपीय लोकांनीं कॉफी, सिंकोनो व आलें साफ करून वाळविण्याचे कारखाने काढिले आहेत. मोठा व्यापार जलमार्गानें चालत असल्यामुळें खुष्कीच्या मार्गानें होणाऱ्या व्यापाराचें महत्त्व कमी आहे. किनाऱ्यावरील मुख्य बंदरें कोचीन, कालिकत, तेलेचरी, कानानोर, बेयपुर, बडगारा व पोनोनी हीं असून येथील कॉफी, काथ्या व काथ्याच्या दोऱ्या, मिरीं (हे मुख्य व्यापाराचे जिन्नस आहेत.) चहा, सिंकोना, आलें, वेलदोडे, खोबरें (वाळलेलें), खोबऱ्याचें तेल, खारवलेले मासे, लांकूड यांची निर्गत होते, आणि मीठ, तांदूळ, कापड, तंबाखू, धातूचीं भांडीं, गळिताचीं धान्यें, यांत्रिक सामान, कांचेचें सामान, रंग, कांतडी, औषधें, रॉकेल तेल व गोणपाटयांची आयात होते. आल्याचा व्यापार विलायतेशीं चालतो; मिरी फ्रान्स, इटली व जर्मनी या देशांस पाठवितात. कॉफी फ्रान्स व आस्ट्रेलिया देशांत जाते. काथ्या व खोबऱ्यांचें तेल, जर्मनी, अमेरिका व फ्रान्स या राष्ट्रांत पाठवितात, व चंदन फ्रान्स, जर्मनी, व अमेरिका या देशांत धाडतात. ब्रह्मदेश व बंगाल या भागांतून येथें तांदूळ येतो. कांहीं तांदूळ रत्नागिरीकडून जातो. किनाऱ्यावरील अर्धाअधिक व्यापार मुंबईशीं चालतो. मोठे गुन्हे या भागांत घडत नाहींत, पण १८३६ सालापासून मोपले लोक मधून मधून शांततेचा भंग दंगाधोपा करून करतात. या दंग्याचा प्रतिकार करण्यासाठीं एक विशिष्ट कायदा पसार केला आहे. त्यास मोपला-ॲक्ट असें नांव दिलें आहे. याच कारणासाठीं मलपुरम् येथें एक सैन्याची तुकडी नेहमीं जय्यत तयारींत ठेविलेली असते. मशीद बांधण्यास जागा न देणें, मुसुलमान रयतेकडून जमीन काढून घेणें वगैरे दंग्याचीं कारणें फार क्षुल्लक असतात. दंगा करण्यांत हलक्या जातीचे पुरुष व मुलें प्रमुख असतात. १९२३ सालीं या लोकांनीं खिलाफतच्या नांवाखालीं मोठें बंड केलें. त्यांत कांही दिवस इंग्रज सरकारचा अंमल जणूंकाय त्यांनी उखडून टाकला होता. हिंदु लोकांवर त्यांनी फार जुलूम केला. पुष्कळ स्त्रीपुरुषांवर आत्याचार करून त्यांनां जुलुमानें बाटविलें. पुष्कळ हिंदूंची कत्तल केली, त्यांच्या मालमत्तेचा नायनाट केला व शेवटीं लष्कराच्या साहाय्यानें सरकारनें बंड मोडून बऱ्याच मोपल्यांनां अंदमानांत काळयापाण्यावर पाठविलें. हे लोक धर्मवेडे आहेत. त्यांची स्थिति सुधारण्यासाठीं सरकारनें यांच्यांत शिक्षणप्रसारासाठीं व हे रहातात त्या भागांत दळणवळण वाढविण्यासाठीं पुष्कळ प्रयत्न केले, पण त्यांत यावें तसें यश आलें नाहीं.
कालिकत, कोचीन, कननोर, पालघाट व तेलेचरी येथें म्युनिसिपालिटया आहेत. इतर ठिकाणी डिस्ट्रिक्ट व तालुका बोर्डें आहेत. इकडील प्रांतांत शें. १० लोकांनां लिहितां वाचतां येतें. साक्षरतेचें प्रमाण लक्षांत घेतां या जिल्ह्याचें मद्रास इलाख्यांत चवथें स्थान पडतें. (इं. गॅ; बर्नेल-५सा. इं. पॅलिऑग्राफी; डिनॅ. सा. इंडिया; लोगनचें मलबार, विग्रामचें मलबार, लॉ ॲन्ड कस्टम.)