विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मलयालम् (मल्याळी)- मलयालम् भाषा ही द्राविडी शाखेची एक भाषा असून दक्षिण हिंदुस्थानांतील सुमारें ६० लाख लोक ही भाषा बोलतात. सर्वसाधारणतः कसरगोडूपासून ते त्रिवेंद्रम् व दक्षिण कानडाचा थोडासा भाग, मलबार, कोचीन, त्रावणकोरमधील बराच प्रदेश, व म्हैसूर व निलगिरीच्या आसपासचा प्रदेश इत्यादि ठिकाणीं ही भाषा प्रचारांत आहे. मलयालम् याचा अर्थ डोंगराळा प्रदेश असा आहे, पण हें प्रादेशिक नांव भाषेलाहि लावण्यांत आलें आहे. प्राचीन काळीं तामिळ व मलयालम् अशा दोन स्वतंत्र भाषा आहेत अशी कल्पनाच नव्हती व आर्य लोक या दोन्हीं भाषांनां तामिळ हें एकच नांव देत असत; पण अलीकडे या दोन भाषा स्वतंत्र मानण्यांत येऊं लागल्या आहेत. मलयालम् भाषेचे दोन प्रकार आहेत. एक पुस्तकी भाषा व दुसरी व्यावहारिक भाषा. पुस्तकी भाषेंत व तामिळ भाषेंत बरेंच साम्य आहे. तामिळ भाषेपेक्षां मलयालम् उर्फ मल्याळी भाषेंत संस्कृत भाषा अधिक आहेत.
मल्याळी भाषेंतील वर्णोच्चार तामिळ भाषेंतील वर्णोच्चाराप्रमाणेंच आहेत. तामिळ भाषेप्रमाणेंच मल्याळी भाषेंत मृदु व कठोर व्यंजनांची नेहमीं अदलाबदल होते. पुढें स्वर आला असतां मागील व्यंजनाचें द्वित्त्व होतें. उदाहरणार्थ, मातम् याचा मात्तम् असा उच्चार होतो. तामिळप्रमाणेंच शब्दाचें शेवटचें अक्षर उच्चाररहित व्यंजन असावयाचें नाहीं असा मल्याळी भाषेचा नियम आहे. तसें उच्चाररहित व्यंजन शब्दाच्या शेवटीं आल्यास त्याला उ हा स्वर जोडण्यांत येतो. तामिळप्रमाणें नव्या मल्याळीमध्यें पुरुषवाचक क्रियापदाचे प्रत्यय नाहींत. पण जुन्या मल्याळी भाषेमध्यें मात्र ते आढळतात. मल्याळी भाषेंत स्थानिक भाषाभेद बरेच आहेत. कुर्गमधील येरवा भाषा ही मल्याळीचाच एक पोटभेद आहे.
संस्कृत भाषेमध्यें मलयालम् भाषेचा मुळीच उल्लेख आढळत नाहीं. द्राविड भाषा अगर तामिळ या व्यापक नांवाचाच संस्कृमध्यें उल्लेख येतो. स्वतंत्र भाषा या नात्यानें मल्याळी भाषेचा उल्लेख फर्नाझो लोपेझ ड कास्टानहेडाच्या 'हिस्टारिया दो डेसकोब्रिमेंटो ए काँक्विस्टा इंडिया' (१५५१.६१) या ग्रंथांमध्यें सांपडतो. मल्याळी भाषेचीं व्याकरणें व कोश पोर्तुगीज, जर्मन, इंग्लिश इत्यादि भाषांतून झाले आहेत. १८३९-४१ सालीं जुन्या कराराचें मल्याळी भाषेंत भाषांतर झालें.
मल्याळी वाङ्मयाच्या इतिहासाला तेराव्या शतकापासून आरंभ झाला असें म्हणण्यास हरकत नाहीं. या शतकांत मल्याळीमध्यें रामचरित हें पुस्तक लिहिलें गेलें. रामचरिताचा कर्ता तेराव्या शतकांतील त्रावणकोरचा राजा होय. त्याच्या पूर्वी, मल्याळी भाषेंत कांहीं शिलालेख वगैरे होते, तथापि मल्याळीमध्यें ग्रंथ असा कोणताहि नव्हता. 'रामचरित' वगैरे जे थोडेसे ग्रंथ त्या शतकांत लिहिले गेले त्यांवर तामिळ काव्याचा बराचसा पगडा बसलेला दिसतो. पण पुढें आर्यांच्या संस्कृत भाषेचा तिकडे प्रसार झाल्यामुळें मल्याळी भाषेवर संस्कृतचा परिणाम फार झाला व संस्कृत महाकाव्यांचें मल्याळीमध्यें भाषांतर झालें. १५ व्या शतकांत चेरुस्सेरी नंबुरी यानें संस्कृतमिश्र मल्याळीमध्यें कृष्णगाथा नांवाचा ग्रंथ लिहिला. त्रावणकोरच्या कोट्टरकर राजघराण्यांतील एका राजानें 'कथाकाली' म्हणजे मल्याळी नाटकें लिहिण्यास सुरुवात केली. मल्याळीमधील अभिजात - वाङ्मयाच्या युगाला १७ व्या शतकांत सुरवात झाली. १७ व्या शतकांतील तुंजत्तु एंरक्तांछन यानें हल्लींची मल्याळी लिपी बनविली. त्या लिपीला त्यानें आर्य एरुत्तु असें नांव दिलें. त्यापूर्वीच्या दोन लिपींची वत्तेरुत्तु व कोलेरुत्तु अशीं नांवें होतीं. तुंजुत्तूनें महाभारत व कांहीं पुराणांचें त्या लिपींत रुपांतर केलें. १८ व्या शतकाच्या अखेरीस कुंजन नंबियार नांवाच्या ग्रंथकारानें बरींच गाणीं, विनोदी नाटकें रचिलीं, व पंचतंत्र, नलचरित्र इत्यादि संस्कृत ग्रंथांचें रुपांतर केलें. याशिवाय मल्याळीमध्यें कथा, पद्यसंग्रह, केरेलोत्पत्तीसारखे इतिहासग्रंथ, व कांहीं वैद्यकग्रंथ आढळतात.