विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मलिकअंबर- हा हवशी गुलाम आरंभी पहिला मूर्तिझा निझामशहाचा कारभारी चंगीझखान याच्या पदरी होता. हा बुद्धिमान असून तो निझामशाहींतील हवशी सरदारांच्या तटाचा पुढारी होता. अकबरानें वऱ्हाड व अहमदनगर घेऊन बहादुर निझामशहास ग्वाल्हेरच्या किल्ल्यांत कैदेंत टाकल्यावर, यानें मूर्तिझा निझामशहा (दुसरा) असें नांव देऊन एका अल्पवयी राजास गादीवर बसविलें, व दिल्लीस चाललेल्या त्या वेळच्या अंदाधुंदीचा फायदा घेऊन मोंगलांच्या लाटेस शहाजीराजाच्या मदतीनें २० पेक्षांहि अधिक वर्षेपर्यंत थोपवून धरिलें. यानें १६०६ च्या सुमारास मोंगलांच्या हातीं पूर्णपणें न गेलेल्या निजामशाही राज्याच्या सर्व भागास आपल्या ताब्यांत घेऊन, जमीनमहसुलाच्या पध्दतींत सुधारणा केली, नंतर (१६१०) यानें दौलताबादेजवळ खडकी (औरंगाबाद) नांवाचें शहर बसविलें, व कित्येक भव्य राजवाडे बांधून तेथें निजामशाहीची राजधानी नेली. पुढें मोंगल सैन्याचा कित्येक लढायांत पराभव करून कांहीं काळपर्यंत वऱ्हाड व अहमदनगर हींहि मोंगलांपासून त्यानें परत मिळविलीं. परंतु मलिकअंबरचें नांव या विजयांपेक्षां त्याच्या जमाबंदीच्या पद्धतीमुळें प्रसिध्दीस आलें. त्यानें गांवें इजाऱ्यानें देण्याची पद्धत मोडली. व जमिनीचें दरवर्षी जें उत्पन्न येत होतें त्याचा ठराविक हिस्सा (ऐनजिनसी) सारा म्हणून घेण्यास सुरवात केली (मराठी कागदपत्रांत हा हिस्सा २/५ होता असें आढळतें, परंतु ग्रँटडफ त्या काळच्या दंतकथावरून तो १/३ होता असें म्हणतो). याप्रमाणें कित्येक वर्षेंपर्यंत धान्यांत महसूल गोळा केल्यावर, त्या अनुभवावरून मग तो पैशांत ठरविण्यांत आला (१६१०); परंतु ही रक्कम पीक चांगलें आलें नाहीं तर त्यामानानें कमी करण्यांत येत असे. त्यानें जुन्या ग्रामसंस्थेस पुन्हां उर्जितावस्थेस आणलें, व वसूल गोळा करण्याकरितां मुसुलमान अधिकाऱ्यांच्या देखरेखेखालीं ब्राह्मण अंमलदारांचीं योजना केली. इ. स. १६२१ च्या सुमारास लुखजी जाधवराव वगैरे कांहीं मराठे सरदारांनां मोंगलांनीं आपल्याकडे वळवून घेतल्यामुळें ते निजामशाही राज्यास सोडून गेले. परंतु राजपुत्र शहाजहानानें बंड केल्याकारणानें बादशहास दक्षिणेकडे लक्ष पुरविण्यास फुरसत राहिली नाहीं, म्हणून मरणापूर्वी कांही दिवस मलिकअंबराची दक्षिणेंत पुन्हां सरशी झाली. तो इ. स. १६२६ च्या मे महिन्यांत ८० वर्षांचा होऊन मरण पावला. याच्याच तालमींत तयार झालेल्या शहाजी भोंसल्यानें पुढें निजामशाही काहीं दिवस तगविली. अंबराची कबर अंबरापूर (जि. नगर) येथें आहे. (डफ; बील)