विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मल्हारराव गायकवाड- बडोद्याचे राजे खंडेराव हे वारल्यानंतर त्यांचा बंधु मल्हारराव, जो खंडेरावाच्या विरुद्ध केलेल्या कटामुळें कैदेंत पडला होता तो सुटला व गादीवर बसला (१८७०). प्रथम यानें खंडेरावाच्या नोकरांवर सूड घेण्यास सुरवात केली. याच्या हेकटपणामुळें व उधळपट्टीमुळें कर वाढवावे लागले व राज्यव्यवस्था बिघडून गेली. म्हणून स. १८६० त हिंदुस्थान-सरकारकडून बडोद्याची देखरेख मुंबई सरकारकडे आली व हिंदुस्थानसरकारकडून एक चौकशीकरितां कमिशनहि नेमिलें गेलें. त्या कमिशननें राज्यांत अव्यवस्था आहे असें ठरवून १८७५ पर्यंत मल्हाररावास मुदत देऊन सुधारणा करण्याविषयीं ताकीद दिली. यावेळीं महाराजाचें व रेसिडेंटचें जमेना म्हणून कर्नल फेअर याच्या जागीं सर लुईस चेली यास ग. ज. चा एजंट व स्पेशल कमिशनर नेमिलें. परंतु तो येण्याच्या पूर्वी (१८७४ नोव्हेंबर) कर्नल फेअर यास मल्हारराव हे वीष घालण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी बातमी पसरली; लुईस आल्यावर त्यानें चौकशी केली; व स. १८७५ च्या जानेवारींत हिंदुस्थानसरकारनें मल्हाररावास अटक करून चौकशीकरितां कमिशन नेमून राज्यकारभार हातीं घेतला. बंगालचा मुख्य न्यायाधीश, सर रिचर्ड काऊच व ३ यूरोपीय व ३ हिंदु संस्थानिक सभासद होते. निकाल एकमतानें झाला नाहीं. यूरोपीय सभासदांनीं ठरविलें कीं, वीष घालण्याच्या कामास मल्हाररावानें चिथविलें, परंतु हिंदी सभासदांनीं त्याच्या उलट निकाल दिला. तेव्हां मल्हाररावाची गैरवर्तुणुक, व गैरराज्यव्यवस्था शाबीत धरून इंग्रजसरकारनें जाहीरनामा काढून त्यास गादीवरून पदच्युत करून मद्रास येथें हद्दपार केलें. तेथेंच तो नजरकैदेंत असतां १८९३ सालीं वारला.