विभाग आठरावा : बडोदें ते मूर
महबूबनगर, जि ल्हा.- हैदराबाद संस्थान. उत्तरेस मेदक व अन्नाफ-इ-वालडा हे जिल्हे; पूर्वेस नलगोंडा; पश्चिमेस रायचूर; वायव्येस गुलबर्गा; दक्षिणेस कृष्णा नदी व आग्नेयीस एक टेंकडयांची रांग आहे. उत्तरेस व पश्चिमेस या जिल्ह्याचा पृष्ठभाग बराच उंचवटयाचा आहे. व या जिल्ह्याच्या पृष्ठभागास वायव्येकडून आग्नेयीकडे उतरण लागलेली दिसते. कृष्णा व भीमा या मुख्य नद्या आहेत. या जिल्ह्यांत मोठें जंगल आहे.दोन तीन तालुके सोडून इतर ठिकाणची हवा उष्ण, दमट व रोगट आहे. पाऊण सरासरी ३४ इंच पडतो.
इतिहासः- या जिल्ह्याच्या इतिहासाविषयीं फारच थोडीं माहिती उपलब्ध आहे. एके काळीं हा मुलूख वरंगळच्या राजांच्या ताब्यांत होता; पुढें तो बहामनी राज्यांत मोडत असे. त्या राज्यांचा नाश झाल्यावर त्याचा कांहीं भाग कुतुबशाहीच्या राज्यास जोडला जाऊन बाकीचा विजापुरच्या राज्यांत मोडूं लागला. औरंगझेबानें जेव्हां विजापुरच्या बादशाहीचा नायनाट केला, तेव्हां त्यानें हा मुलुख आपल्या साम्राज्यास जोडिला. १८ व्या शतकांत जेव्हां निजामशाहीची स्थापना झाली, तेव्हां त्याच्या राज्यांत या जिल्ह्याचा अंतर्भाव होऊं लागला. गोवळकोंडयाचा किल्ला इब्राहिम कुतुबशहानें बांधिला. त्यांत चांगल्या इमारती आहेत. अगरवाद तालुक्यांत प्रतापरुद्रकोट नांवाचा किल्ला आहे पण तो सध्यां अगदीं मोडकळीस आलेला आहे. याशिवाय येथें बरेच किल्ले आहेत. त्यांत पांगल नांवाचा किल्ला बराच मोठा आहे. त्याची लांबी दीड मैल व रुंदी एक मैल आहे. त्यास सात तट असून मध्यें एक बालेकिल्ला आहे.
जिल्ह्याची लोकसंख्या (१९११) ७४७१७८ असून ११८३ गांवें आहेत. मुख्य गांवें नारायणपेठ व महबूबनगर एकंदर वस्तींत शेंकडा ६७ हिंदु व आठ मुसुलमान आहेत. शेंकडा ८६ लोक तेलगु, ५ कानडी व ६ उडदु भाषा बोलतात. या जिल्ह्यांत सध्यां सहा तालुके व ३ जहागिऱ्या आहेत. ज्वारी, हरभरा, जवस, भात, तीळ, एरंडी हीं मुख्य पिकें असून या जिल्ह्यात रयतवारी पद्धत सुरूं आहे. नारायणपेठची लुगडीं, साडया व धोतरें पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. निर्गत माल धान्यें, कपाशी व एरंडी व आयात कापड, चीट, गहूं, हरभरा, साखर, मीठ, राकेल, तांब्याचीं व पितळेची भांडीं, वगैरे. महबुबनगर व नारायणपेठ येथें म्युनिसिपालिट्या आहेत. या जिल्ह्यांतील शेंकडा ३.३ लोकांस लिहितांवाचतां येतें.
तालका- क्षेत्रफळ ६७६ चौरस मैल. एकंदर लोकसंख्या (१९११) १५४७८४. या तालुक्याचें व जिल्ह्याचें मुख्य ठिकाण महबूबनगर (८७५१) आहे. तालुक्यांत २११ खेडीं आहेत.