विभाग आठरावा : बडोदें ते मूर
महाड, तालुका- मुंबई, कुलाबा जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तालुका. याचें क्षेत्रफळ ४६० चौरस मैल व लोकसंख्या (१९११) ११८५१४ आहे. यांत २४५ खेडीं असून तालुक्याचें मुख्य ठिकाण महाड आहे. तालुक्यांतून सावित्री नदी वहात जाते. पावसाचें मान १३४ इंचांपर्यंत असतें.
गां व.- तालुकयाचें मुख्य ठिकाण. सावित्री नदीच्या उत्तर किनाऱ्यावर असून अलिबागेपासून ५३ मैल दूर आहे. येथील लोकसंख्या सुमारें ७ हजार आहे. मोठी भरती आली म्हणजे नावा महाडपर्यंत येतात. महाडच्या वायव्येस २ मैलांवर बौध्दंचीं लेणीं आहेत. १५३८ सालीं महाड व्यापारी वस्तीचें गांव असून डी कास्ट्रो असें लिहितो कीं येथें गव्हाची फार मोठी घडामोड होत होती. शिवाजीची राजधानी रायगड येथून जवळच (८ कोस) आहे. १७७१ सालीं जॉन फोर्बस याला महाड चांगल्या तटबंदीचें व भरवस्तीचें शहरे आढळलें. दुसरा बाजीराव, नाना फडवणीस व इंग्रज यांच्यामध्यें १७९६ सालीं येथें तह झाल्यावरून बाजीरावाला पेशवाई मिळाली. १८१८ सालीं मराठयांशीं युद्ध सुरू असतां कर्नल प्रोदरनें कांहीं अडथळा न होतां महाड घेतलें.
महाडचा दर्या- व्यापार फार मोठा होता. मलबार व दक्षिण कोंकणकडून खारवलेले मासे येत असत, व मुंबईहून खारीक, साखर, मीठ व रॉकेल तेल व कापड येत असे, व येथून मुंबईला कांदे, बटाटे, हिरडे, साखर वगैरे जिन्नस जात असत. हवा चांगली असली तर सावित्री नदीच्या मुखाशीं मुंबईच्या आगबोटी दासगांवला (महाडपासून ५ मैल) नांगरतात; महाड येथें १८६६ सालीं म्युनिसिपालिटी स्थापन झाली.