विभाग आठरावा : बडोदें ते मूर
महाडिक- एक मराठे सरदार घराणें. इतर मराठे घराण्यांप्रमाणेंच महाडिक ह्यांचें घराणें जुने असून तें कोकणांत महाड येथें राहूं लागल्यावर त्यांस महाडिक असें म्हणूं लागले. युसूफ आदिलशहाच्या वेळीं या महाडिकांनीं लुटालूट चालविली होती. त्यांचा एक मूळ पुरुष कृष्णाजीराजे इ. स. १६१४ त मरण पावला. त्याजकडे दाभोळची मोकदमी होती. पुढें त्यांच्या वंशजांस जावळीच्या मोऱ्यांनीं जिंकलें. परंतु शिवाजीनें स्वतंत्र उद्योग सुरू केल्यावर ते शिवाजीस सामील झाले; आणि त्यांचा व शिवाजीचा लोभ जडला. कृष्णाजीचा बंधु कान्होजी स. १६५० त मृत्यु पावला. त्याचा मुलगा परसोजी हा कर्नाटकांत शहाजीस साहाय्य करीत असतां मरण पावला. परसोजीचा मुलगा हरजीराजे ह्याच्यावर शहाजीची मर्जी विशेष होती. शिवाजीनें स. १६६८ च्या सुमारास आपली मुलगी हरजीराजे ह्यास दिली. हा कर्नाटकांत रघुनाथ नारायण हणमंते याच्याजवळ राहून तिकडील प्रांताचा बंदोबस्त करी. हरजी, गणोजी शिर्के व महादजी निंबाळकर हे शिवाजीचे तिन्हीहि जांवई राज्याच्या चांगले उपयोगी पडले. त्यांनीं संभाजीस मदत केली. हरजीराजे कर्नाटकांत जिंजीच्या सुभेदारीवर पुष्कळ वर्षे होता. जिंजीच्या वेढयांत हरजीराजे मृत्यु पावला. (स. १६९४). धाकटया शाहूराजाजवळ दुर्गाजी व कुशाबा नांवाचे महाडिक सरदार होते. (डफ; म. रि. पूर्वार्ध.)