विभाग आठरावा : बडोदें ते मूर
महाबळेश्वर (मालकमपेठ)- हें मुंबई इलाख्याचें मुख्य सरकारी हवेचें ठिकाण असून सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यांत याचा समावेश होतो. समुद्रसपाटीपासून याची उंची ४५०० फूट व कित्येक ठिकाणी ४७०० फूट देखील भरेल. महाबळेश्वरास जावयाचें असल्यास महाड, पुणें, व वाठार असे तीन मार्ग आहेत; त्यांपैकीं पुण्याहून मोटारीनें जाण्याचा मार्ग विशेष रहदारीचा आहे. हवेच्या उत्तम ठिकाणाला ज्या सोयी अवश्य असतात, त्या सर्व या ठिकाणीं आहेत. सरजॉन मालकम साहेब मुंबइचे गव्हर्नर असतांना १८२८ सालीं साताऱ्याच्या राजाकडून जरूर तेवढीं जागा मिळवून त्यानीं महाबळेश्वर हें हवेचें ठिकाण केलें. माथेरानपेक्षां महाबळेश्वर अधिक उंच असल्यानें जास्त थंड आहे. येथें पाऊस मनस्वी पडत असल्यामुळें पावसाळयांत फार वस्ती नसते. मुंबईचे गव्हर्नर एप्रिल ते जूनपर्यंत या ठिकाणीं सर्व मंत्र्यांसह रहातात. त्यावेळीं सुखवस्तु लोकहि पुष्कळ येतात.
येथील जंगलांत नाग, फूर्से, घोण, मण्यार वगैरे जातींचे विषारी सर्प, आणि वाघ, चित्ता, रानडुक्कर, हरणी, सांबर हीं रानटी जनावरें आहेत. नैर्ॠत्येकडील पावसाळा खेरीजकरून बाकी कोणत्याहि दिवसांत महाबळेश्वरची निसर्गशोभा अवर्णनीय असते. मुख्य प्रेक्षणीय स्थळें (पॉईंट्स) येणेंप्रमाणें आहेतः- आर्थरसीट (४४२१ फूट उंच), एलफिन्स्टन (४१८४), सिडने (४०६७), बाँबे, कॉन्यीक, फॉकलंड, सासून, व बाबिंग्टन (४२४५), इत्यादि. डोंगरांवरील प्रेक्षणीय स्थळांत प्रतापगड, मकरंदकड, कमळगड, चोरांच्या दऱ्या व जुन्या महाबळेश्वराचा कृष्णेचा उगम हीं होत. महाबळेश्वराचें देवालय ४३८५ फूट उंच असून मालकमपेठपासून ३ मैल लांब आहे. ही क्षेत्राची जागा होय. येथील फळफळावळ यूरोपच्या धर्तीवर असते. येथें सिंकोनाची लागवड करण्याचा प्रयत्न सरकारतर्फे करण्यांत आला पण तो यशस्वी झाला नाहीं. येथें बटाटे फार होतात. येथें कॉफी व ओक नांवाचें विलायती झाड यांची लागवड अलीकडे केलेली आहे.
मालकमपेठेंत पासष्ट खेडयांचा समावेश होत असून निश्चित लोकसंख्या सांगतां येत नाहीं. कोळी, धनगर, धावड व कुळवाडी या मूळच्या जाती आहेत. चिनी व मलायांतील कैदी ठेवण्याकरितां येथें १२० कैदी रहातील इतका मोठा कैदखाना बांधण्यांत आला होता. येथील कैद्यांनींच बटाटे व विलायती भाजीपाल्याची लागवड उर्जितावस्थेस आणिली. १८६४ सालीं हा कैदखाना रद्द करण्यांत आला. येथें १८६७ सालीं म्युनिसिपालिटी स्थापन झाली. येथें शाळा, पोस्ट-ऑफिस, इस्पितळ, बगिचे वगैरे सर्व शहरांतल्या सोयी आहेत.