विभाग आठरावा : बडोदें ते मूर
महायान- बौद्धसंप्रदायांतील एक महत्त्वाचा पंथ. बौद्धसंप्रदायांत हीनयान व महायान असे दोन प्रमुख पंथ असून यांतहि पुढें उपपंथ निर्माण झाले. महायान पंथाच्या उदयाच्या कारणाचे बाह्य व अंतस्थ असे दोन भाग करतां येतील. मौर्य साम्राज्याला उतार लागल्यानंतर वायव्येकडून ग्रीक व बॅक्ट्रियन लोकांनीं आर्यावर्तावर स्वाऱ्या करण्यास सुरवात केली व आपली सत्ता आर्यावर्तांतील कांही भागावर प्रस्थापित केली. त्यांनीं आपल्याबरोबर आणलेल्या संस्कृतीचा भारतीय संस्कृतीशीं संबंध येऊं लागून ग्रीक कलेचा प्रसार होऊं लागला. बुद्ध, बोधिसत्त्व इत्यादिकांच्या मूर्ती ग्रीक पद्धतीवर उभारल्या जाऊं लागल्या व ग्रीकांच्या मूर्ती ग्रीक पद्धतीवर उभरल्या जाऊं लागल्या व ग्रीकांच्या अनेकदेवतावादाचा बौद्धधर्मावर परिणाम होऊं लागला. त्याचप्रमाणें उत्तरेकडील मंगोलियन लोकांच्या स्वाऱ्याहि हिंदुस्थानवर होऊं लागून त्यांनींहि पेशावरच्या आसपास आपलें साम्राज्य स्थापन केलें. हे लोक अनेकदेवतावादी होते. त्यांनीं बौद्धधर्मांतील बऱ्याच तत्त्वांचा अंगीकार केला पण हा अंगीकार करतांनां त्यांनीं आपल्या अनेकदेवतातत्त्वाचा बौद्धधर्मामध्यें प्रवेश करविला. खुद्द आर्यावर्तांतहि यावेळी हिंदुधर्म व विशेषतः वैष्णव धर्म बराच जोरांत होता. या सर्व जगाचा उत्पत्तिस्थितिसंहारक असा एकच परमेश्वर असून तो प्रसंग पडला असतां धर्मरक्षणासाठीं अवतार घेतो ही कल्पना हिंदु लोकांच्या मनांत चांगली बिंबली होती.त्यामुळें या हिंदुधर्मीयांशीं बौद्धधर्मीयांचा निकट संबंध येत असल्यामुळें या तत्त्वाचाहि बौद्ध लोकांवर पगडा बसल्याशिवाय राहिला नाहीं. हळू हळू बुद्ध हा परमेश्वराचा अवतार होय अशी कल्पना उदयास येत चालली. त्याचप्रमाणें ईश्वरभक्तीच्याहि तत्त्वानें बौध्दंच्या मनावर पगडा बसविला; पालीच्या ऐवजी तत्कालीन प्रचारांत असलेली संस्कृत भाषा बौद्धधर्मीयांनीं वापरण्यास सुरवात केली. अशा रीतीनें मूळच्या बौद्धधर्मावर तत्कालीन इतर धर्मपंथांचा परिणाम होऊं लागून त्यांत नवीन नवीन तत्त्वें घुसूं लागलीं. सुमारें दुसऱ्या शतकांत कनिष्क नावांच्या महाप्रतापी राजानें हा बौद्धधर्मांतील गोंधळ पाहून, त्याला कांहीं तरी वळण द्यावें या हेतूनें जालंधर येथें मोठी धर्म सभा बोलावली. या सभेंत जुन्या बौद्धधर्मीयांचें कांहीं न चालून नवीन बौद्धधर्माला मान्यता मिळाली व या नवीन पंथाचे अनुयायी आपल्याला महायानपंथी असें म्हणून घेऊं लागले व तदितर बौद्ध लोकांनां हनियान असें नांव पडलें. हीनयानपंथाचा दक्षिण हिंदुस्थान व सीलोनमध्यें प्रसार झाला तर महायानपंथ चीन, जपान, कोरिया या राष्ट्रांत फैलावला. खुद्द उत्तर हिंदुस्थानांत हे दोन्ही पंथ आपापसांत झगडा करीत होते व त्यांतच पुन्हां उपपंथांची भर पडत होती.
अशा रीतीनें महायानपंथाचा उदय झाला. तात्त्वि दृष्टया हीनयान व महायान या दोन पंथांमध्यें बरेंच सादृश्य व वैदृश्य होतें. मूळचा बौद्धधर्म अगर हीनयानपंथ व महायानपंथ यांच्यामध्यें पहिलें वैदृश्य म्हणजे हीनयानपंथाचें मत असें कीं, मनुष्यानें अर्हतपदाची प्राप्ति करून घेतल्यानें त्याचें परमध्येय जें निर्वाण तें प्राप्त होतें; त्याच्या उलट महायानपंथानें असें प्रतिपादन केलें कीं निर्वाणपदप्राप्तीसाठीं मनुष्यानें अर्हतच बनलें पाहिजे असें नाहीं, तर मनुष्यानें निर्वाणप्राप्तीसाठीं पुढील जन्मांत बोधिसत्त्व होण्यासाठीं झटलें पाहिजे. तात्पर्य, हीनयानपंथांतील अर्हत्तत्वाऐवजीं बोधिसत्वतत्त्व प्रचारांत आणलें. हीनयानपंथांत भिक्षु होणाऱ्यालाच निर्वाणाचा मार्ग खुला असे असे पण महायानपंथांत कुणाहि संसारी मनुष्याला बोधिसत्त्व पद मिळविण्याची आकांक्षा धरण्याला परवानगी असे. दुसरें वैदृश्य तत्त्वज्ञानामधील होय. हीनयानपंथी लोक आत्म्याचें अस्तित्वच तेवढें मानीत नसत पण महायानपंथ हा केवळ तेवढयावरच न थांबता हें सर्वच मुळीं शून्य आहे असें म्हणतो. या तत्त्वाला शून्यवाद असें नांव आहे. तिसरें वैदृश्य म्हणजे महायानपंथांतील भक्तीचें तत्त्व होय. महायानपंथाचे लोक असंख्य बोधिसत्त्वाची देव म्हणून पूजा करतात. हीनयानंपथाचे लोक ध्यान अगर चिंतनानें बुद्धला प्रसन्न करून घ्यावें असें म्हणत, तर महायानपंथी हे ज्ञानी व जगाच्या कल्याणार्थ जगामध्यें अवतरलेल्या अनेकबोधिसत्त्वांची निर्वाणपदासाठीं भाक्ति व पूजा केली पाहिजे असें मानींत. हीं तीन प्रमुख वैदृश्यें सोडून दिल्यास बाकीच्या बाबतींत हे दोन्ही पंथ सदृशच होते असें म्हणण्यास हरकत नाहीं.
महायानपंथाचे माध्यमिक व विज्ञानवादी असे दोन प्रमुख पोटपंथ आहेत. महायानपंथाचें मुख्य वाङ्मय म्हणजे अष्टसहस्त्रिका, प्रज्ञापारमिता, सद्धर्मपुडंरीक, ललिताविस्तर, लंकावतार, सुर्वणप्रभास, गंडव्यूह, तथागतगुह्यक, समधिराज, दशभूमीश्वर इत्यादि होय. या सर्वांनां मिळून वैपुल्यसूत्र असेंहि नांव आहे. या सर्वांत सद्धर्मपुंडरीक हा महत्त्वाचा ग्रंथ आहे. लंकावतार व दशभूमीश्वर यांचेंहि महत्त्व बरेंच आहे. महायानपंथाचा प्रमुख प्रसारक नागार्जुन हा होय. यालाच कांहींनीं महायानपंथाचा जनक म्हटलेलें आहे, तथापि त्यांत विशेषसें तथ्य आढळत नाहीं. पण त्यानें महायानपंथांतील शून्यवाद व पारमिता हीं तत्त्वें शोधून काढलीं व त्याबद्दल महायानपंथामध्यें त्याचें नांव प्रामुख्यानें उल्लेखिलें जातें.