विभाग आठरावा : बडोदें ते मूर
महार- एक हिंदु जात. या जातीचे लोक महाराष्ट्र, कोंकण, नागपूर, वर्धा, भंडारा, चांदा इत्यादि ठिकाणीं आढळतात. १९११ सालीं या जातीची संख्या सुमारें ३३ लाख होती. आर्य लोकांनीं हिंदुस्थान जिंकण्यापूर्वी या देशांत ज्या मूळ जाती होत्या त्यांपैकी या महारांची जात असावी असें एक मत आहे. राजारामशास्त्रीं भागवतानीं हे महार म्हणजे प्राचीन नाग होत असें मत दिलें आहे, तथापि द्राविडी शाखेच्या लोकांच्या चेहरेपट्टीमध्यें व यांच्या चेहरेपट्टीमध्यें साम्य आढळून येत नाहीं. कांहींच्या मतें राजस्थानांतील मेहेर व महाराष्ट्रांतील महार यांचे पूर्वज एकच असावेत. महाराष्ट्र हें नांव 'महारांचें राष्ट्र' यांवरून पडलें असेंहि कांही मानतात. डॉ. भांडारकरांच्य मतें मेलेल्या जनावरांनां वाहून नेणारे (मृत + हार) ते महार होतात. इतिहाससंशोधक राजवाडे हे आधींच्या शूद्र जातीपासून चांडाळादि जातींची उत्पत्ति झाली असें म्हणतात. आधींचे महा + अरि म्हणजे मोठे शत्रु ते महार अशीहि कांहीं विद्वानांनी उपपत्ति लावली आहे. महारांचे स्थलपरत्वें अनेक पोटभेद झाले आहेत; त्यांपैकी सोमवंशीय, लाडवण, आधवण, बावने, बारके, कोसरे, लाडशी, सालवे, धार्मिक, पान, बेल, झाडपे, कथिये व डेहरे हे प्रमुख होत. सोमवंशीय जातीच्या महारांची वस्ती दक्षिण, खानदेश व वऱ्हाड या ठिकाणीं आढळते. बाकीच्या महारांची वस्ती मध्यप्रांतांतच प्रामुख्येंकरून आढळते. सोमवंशी महार आपण पांडवांच्या वंशांतले आहोंत असें म्हणवून घेतात. पंधरा वर्षांपूर्वी महारांच्या पोटजातींत परस्परामध्यें अन्नव्यवहारहि होत नसे, पण अलीकडे त्यांच्यांत शिक्षण घेतलेली मंडळी निघूं लागल्यापासून हा निर्बंध शिथिल झाला आहे. मराठे-कुणब्यांच्या आडनांवांसारखीं शिंदे, गायकवाड, भोंसले, पवार, राऊत, तसेंच रजपुतांच्या आडनांवांसारखीं चौहान, परमार, सोळंकी इत्यादि महारांत आडनांवें सांपडतात. महारांनां अतिशूद्र व अस्पृश्य असें लेखण्यांत येतें. तथापि ते हिंदूच आहेत याबद्दल वाद नाहीं. ते हिंदु धर्मांतील देवतांचीच पुजा करतात. त्यांचे विशिष्ट देव म्हणजे विठोबा, म्हसोबा, खंडोबा, ज्ञानोबा, चोखोबा, भवानी, मरीआई, सटवाई इत्यादि होत. वऱ्हाडप्रांतामध्यें ग्रॅबिएल, अझ्रेल, मायकेल, अनांदीन या विचित्र नांवाच्या देवतांची महार लोक पूजा करतात असे रसेल व हिरालाल सांगतात. त्यांचे धार्मिक संस्कार हिंदूंसारखेच आहेत. ग्रामपंचायतींत बाराबलुतेदारांपैकीं महारहि एक हाते. त्यांच्याकडे खेडेगांवच्या सरहद्दी संभाळणें, चौकीदारी व जासुदी इत्यादि कामें असत. त्यांच्यामध्यें वीणकाम करणारेहि लोक आढळतात. अखिल जातीची अशी पंचायत नाहीं. महार लोक आपल्यापेक्षां खालच्या जातींशीं म्हणजे मांग, चांभार, धेड इत्यादिकांशीं अन्नोदकव्यवहारा करीत नाहींत. अलीकडे त्यांच्यामध्यें शिक्षणाचें बीं रुजलें आहे व त्यामुळें ते आपला दर्जा वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ख्रिस्ती अगर मुसुलमान झाल्यास आपला सामाजिक दर्जा वाढतो अशा समजुतीनें कांहीं महारांनीं धर्मांतरहि केलें आहे. तथापि हिंदुधर्मामध्यें त्यांनां अस्पृश्य मानण्याच्या विरुद्ध चळवळ सुरू झाली असून त्यामुळें, त्यांनां सामाजिक दर्जा वाढविण्याच्या कामीं धर्मांतर करण्याचा प्रसंग येणार नाही असें वाटतें. ('अस्पृश्यता' पहा.)