विभाग आठरावा : बडोदें ते मूर
महावस्तु- हा महत्त्वाचा ग्रंथ हीनयानपंथाचा आहे. त्यांतल्यात्यांत हीनयानामध्यें जो लोकोत्तरवाद्यांचा पंथ आहे त्या पंथाचें हें पुस्तक आहे. लोकोत्तरवाद्यांच्या मतें बुद्ध अतिमानुष होता व या सिध्दंताला अनुसरून महावस्तु ग्रंथामध्यें बुद्धचें समग्र चरित्र आलें आहे. या भागाला अवदान अशी संज्ञा आहे. पण या ग्रहांचें खरें महत्त्व म्हणजे बुद्धसंबंधीच्या व त्याच्या धर्माबद्दलच्या सर्व दंतकथांचा यांत संग्रह करण्यांत आला आहे हें होय. यांतील अर्धा अधिक भाग जातक कथांनीं युक्त आहे. या निरनिराळया कथांच्या आधारें तत्कालीन समाजस्थितीविषयीं बरीच माहिती मिळते. महावस्तु-ग्रंथ वाचला असतां तो, हीनयान व महायान या दोन महत्त्वाच्या बौद्धधर्मपंथंमधला दुवा आहे असें आढळून येतें. त्यांतल्यात्यांत महायानपंथाशीं त्याचें अधिक साम्य दिसतें. कारण महायानपंथाचें बोधिसत्त्वता हें जे मुख्य तत्त्व त्याचा या ग्रंथांत थोडयाफार अंशानें अंगीकार केलेला आढळतो. दशभूमिका म्हणजे बोद्धिसत्त्वाला बौद्धपद प्राप्त होण्याकरितां ज्या निरनिराळया दहा अवस्थांमधून जावें लागतें त्यासंबंधीचें यांत वर्णन आहे. त्याचप्रमाणें महायानांच्या भक्तितत्त्वाचाहि यांत अनुवाद केलेला आढळतो. महावस्तु ग्रंथावर हिंदु पुराणांचीहि छाप बसलेली आपल्याला दिसून येते. या ग्रंथाच्या कालनिर्णयासंबंधीं विचार करूं लागल्यास मुख्यतः दोन गोष्टीं लक्षांत घेतल्या पाहिजेत. एक तर यांमध्यें निरनिराळया काळीं भर पडलेली दिसते व दुसरी गोष्ट म्हणजे त्यांतील भाषेचा धेडगुजरीपणा होय. महावस्तु-ग्रंथांतील मुख्य कथाभाग हा ख्रि. पू. २ ऱ्या शतकांत लिहिला गेला असावा व त्यानंतर खिस्तोत्तर चवथ्या पांचव्या शतकापर्यंत याच्यांत भर पडली असावी असें वाटतें. कारण या ग्रंथांत योगाचारांचा, हूण लोकांचा व होरापाठकांचा उल्लेख व चिनी भाषा व त्यांतील ग्रंथांचाहि उल्लेख आढळतो. यांतील भाषहि पाली, प्राकृत व संस्कृत यांनीं मिश्र असलेली आढळते.