विभाग आठरावा : बडोदें ते मूर
महासंघ.- ''ट्रस्ट''. अनेक कंपन्यांच्या संघास महासंघ हें नांव दिलें आहे. याचें सविस्तर वर्णन हिंदुस्थान आणि जग यांतील पृ. ४७१-४७५ येथें आलें आहे. या महासंघाचा परिणाम दोन गोष्टींवरून लक्षांत घेण्याजोगा आहे. एकतर किंमतीवर आणि दुसरा मजुरीवर. महासंघ केल्यामुळें जर धंद्यांत काटकसर उत्पन्न होते तर मजुरांनां जास्त मजुरी देणें हें संघास परवडेल आणि किंमतीहि कमी होतील असें सकृद्दर्शनीं वाटतें. पण तसें झाल्याचें दिसत नाहीं. एवढें खरें कीं कांहीं दिवस मजुरीचे दर वाढले आणि यास कारण असें कीं कामकरी लोकांचे देखील संघ तयार झाले आणि त्यासंबंधानें कामकऱ्यांच्या हिताचें संरक्षण केलें. किंमतीवर मात्र परिणाम होण्यासाठी सर्व ग्राहकांचें एकीकरण व्हावयास पाहिजे. तसें झालें तरच त्यांस या महासंघाविरुद्ध झगडतां येईल. परंतु सर्व जनतेचें एकीकरण होणें शक्य कोठें आहे आणि तें तसें नसल्यामुळें आणि या महासंघास जवळजवळ मक्ता मिळाल्यामुळें त्यांनीं किंमती वाढविण्यास झपाटयानें सुरवात केली. किंमती फार वाढविल्या तर माल कमी खपेल व आपलें नुकसारनच होईल या बुध्दीनें किंमती वाढविण्याच्या प्रवृत्तीस जर आळा बसेल तर बसेल पण एवढाच आळा किंमती वाढविण्याच्या प्रवृत्तीस पुरत नाहीं.