विभाग आठरावा : बडोदें ते मूर
महीकांठा- हा एक मुंबई इलाख्यांत संस्थानांचा समूह आहे. यावर एक पोलिटिकल एजंट नेमिलेला असतो. क्षेत्रफळ ३१२५ चौरस मैल. लोकसंख्या (१९२१) ४५०४७८. उत्पन्न सुमारें १४ लाख रुपये आहे. ईदरच्या संस्थानानें जवळ जवळ याचा अर्धा भाग व्यापिला आहे. याखेरी दुसरीं अकरा संस्थानें साधारण महत्त्वाचीं आहेत. बाकीचा भाग रजपूत व कोळी ठाकुरांच्या ताब्यांत आहे.
इ ति हा स.– भिल्ल व कोळी हे येथील मूळचे रहिवासी होत. त्यांच्या मागून रजपूत लोक येथें आले, मुसुलमान लोकांनीं जेव्हां सिंधप्रांत काबीज केला, तेव्हां तेथील रजपूत घराण्यांनीं या डोंगराळ मुलुखांत वसाहत केली. १५ व्या शतकांत महीकांठा अमदाबादच्या सुलतानाच्या ताब्यांत गेला, व पुढें मोंगलाच्या राज्यांत त्याचा अंतर्भाव होऊ लागला. मोंगल सत्तेचा नाश झाल्यावर मराठे लोकांनीं दोन तीन वर्षांतून एकदां खंडणी वसूल करण्याचा क्रम सुरू केला. मराठयांच्या सत्तेस उतरती कळा लागल्यावर १८१० सालापासून ही खंडणी वसूल करून ती गायकवाडास देण्याचा जिम्मा ब्रिटिश सरकारनें घेतला. १८२० सालीं महीकांठयाची सर्व व्यवस्था इंग्रजांच्या हातीं गेली.