विभाग आठरावा : बडोदें ते मूर
माकड- माकड अगर वानर हा सस्तन प्राण्यांमध्यें जे 'द्विहस्त' वर्गाचे प्राणी आहेत त्यांमध्यें सोडतो. माकडाच्या अनेक जाती आहेत; त्यांपैकीं एप, बॅबून, गोरिला, ओरँग-ओटँग, चिपँझी, इत्यादि प्रमुख होत. माकडाचें दोन प्रकारांनीं वर्गीकरण करतां येतें : (१) सपाट नाकाचें अथवा अरुंद नाकाचें माकड, (२) सपुच्छ माकड अगर पुच्छहीन माकड. सपाट नाकाची माकडें अमेरिकेंत आढळतात, व अरुंद नाकाची माकडं आफ्रिकेत आढळतात. एप, गोरिला, ओरँग-ओटँग, चिपँझी हीं अपुच्छ माकडें आहेत. चिपँझी हें माणसाशीं सर्वांत अधिक सदृश आहे. याची वस्ती मुख्यतः आफ्रिकेतील अत्यंत उष्ण भागांत आढळते. याची उंची जास्तींत जास्ती चार फूट असते. याच्या कातडीवर लांब, काळे केंस असतात. विशेषतः डोक्यावर व पाठीवर दाट केंस असतात. हाताचा अंगठा लहान व किरकोळ असतो, पायाचा मात्र फार मोठा असतो. गोरिला जातीचें माकड पश्चिम आफ्रिकेत आढळतें. याचे कान लहान, डोळे लांबट, हात लांब पण हाताचे अंगठे लहान असतात. नाकाजवळ बरेच केंस असतात. त्याचा रंग काळा असून खांद्यावरील केंस पिंगट असतात. त्याचा रंग काळा असून खांद्यावरील केंस पिंगट असतात. गोरिला माकड अत्यंत क्रूर व भयंकर असतें व त्याला धरण्याला अतिशय त्रास पडतो. ओरँग-ओटँग माकड लहानपणीं माणसासारखें दिसतें पण मोठेपणीं कुरूप दिसूं लागतें. हें मोठया पोटाचें अवजड माकड आहे. याचा ओठ जाड, चेहरा दुर्मुखलेला व हात लांब असतात. अपुच्छ माकडें दोन पायांवर उभीं रहातात, व काठी धरून चालूं शकतात. त्यांनां तोंडांत अन्न साठविण्याच्या पिशव्या नसतात. याशिवायहि माकडाच्या बऱ्याच जाती आहेत. बॅबून माकडाला खुरटें शेंपूट असतें. सपजो नांवाची माकडाची जात विशेषतः दक्षिण अमेरिकेंत आढळते. हीं माकडें फारच चपळ असतात व आपल्या लांब शेपटीच्या साहाय्यानें एका झाडावरून दुसऱ्या झाडावर सहज जाऊं शकतात. सपजोच्या अनेक उपजाती आहेत. मार्मासेट नांवाची एक माकडाची जात आहे. त्यांच्या शेपटीला वलयें असतात. साकी जातीच्या माकडाचें शेंपूट लांब असतें तथापि धरण्याच्या कामीं त्याचा कांही उपयोग होत नाहीं. या जातीच्या माकडांच्या नाकावर पांढरा रंग असतो. या जातींतल्या कांहीं उपजातींच्या माकडांनां दाढीहि असते. खार नांवाची माकडांची एक जात आहे. त्यांचे डोकें मोठें असतें व दुःख झाल्यास त्यांच्या डोळयांतून आंसवें गळतात. चिनी माकड कुत्र्यासारखे दिसतें व त्याचें शेंपुट आंखुड असतें. आफ्रिकन माकडाचें नाक सरळ असतें व त्याला दाढी असते. हिंदुस्थानांत जी माकडांची जात आहे तिचे कान लहान असतात व ती हातानें पुष्कळ कामें करूं शकते. ताम्रमुखी माकडें सेनेगॉलमध्यें आढळतात. या माकडांच्या शरीराची लांबी दीड फूट असते व शेंपूट तितकेंच लांब असतें. सुमात्रा व जावा बेटांत नीग्रो नांवाची माकडाची जात आढळते. या जातीच्या माकडाच्या शरीराची व शेंपटीची लांबी अडीच फूट असते. सिंपाइ नांवाचीं माकडेंहि सुमात्रा व जावा या बेटांत आढळतात. या जातीच्या माकडांचा चेहरा चपटा व रुंद असतो.
माकड अगर वानरपूजेचा प्रकार पूर्वीपासूनच हिंदुसथान, सीलोन, जपान, आफ्रिका इत्यादि देशांत प्रचलित होता व हल्लीं देखील तो हिंदुस्थान, जपान आफ्रिकेतील कांही भागांत आढळतो. प्राचीन काळीं सीलोनमध्यें माकडाचा दांत एका देवालयांत ठेवून त्यांची पूजा करण्यांत येत असे; त्या देवळाला मोठमोठया देणग्या मिळत असत.
माकडापासून मनुष्याची उत्क्रांति झाली असें डार्विननें प्रतिपादन केलें व तेंच मत अद्यापि बऱ्याच अंशीं प्रचलित आहे. तथापि हा सिध्दंत बरोबर नाहीं असें कांही शास्त्रज्ञ अलीकडे प्रतिपादन करूं लागले आहेत.