विभाग आठरावा : बडोदें ते मूर
माझिनी (१८०५-१८७२)- प्रसिद्ध इटालियन देशभक्त. हा जिनोआ येथें जन्मला. याचा बापाचा वैद्यकीचा धंदा होता. तो युनिव्हर्सिटींत प्रोफेसर होता. माझिनीची आई बुद्धिमान व प्रेमळ होती. बालवयांतच तो सर्व प्रकारचीं पुस्तकें वाचूं लागला. लवकरच जिनोआ युनिव्हर्सिटीच्या वैद्यकीच्या अभ्यासास त्यानें सुरवात केली; परंतु पुढें प्रेतांच्या फाडाफाडींची त्याला भीति वाटून त्यानें तो अभ्यासक्रम सोडून कायद्याचा अभ्यास सुरू केला. तथापि त्याचा नैसर्गिक कल वाङ्मयाकडे असल्यामुळें नांवाला कायद्याचा अभ्यास करीत असतां, त्यानें खरोखर निबंध व परीक्षणात्मक लेख लिहिण्याचा उद्योग सुरू केला होता. लवकरच त्याचे विचार राजकीय परिस्थितीकडे वळले व राजकारणाचा त्यानें झटून अभ्यास केला. नंतर कार्बोनरी संस्थेमध्यें तो सामील झाला. पण त्या मंडळीच्या वेडगळ गूढ गोष्टींची व मंत्रतंत्रांची निरर्थकता त्याच्या लक्षांत येऊन त्यानें आपली एक नवी संस्था स्थापण्याचा विचार केला; इतक्यांत त्याचें हें कृत्य उघडकीस येऊन त्याला सहा महिन्यांची कैद झाली. तेथून सुटतांनाहि त्याच्यावर व्यक्तिस्वातंत्र्यविषयक इतके निर्बंध घालण्यांत आले कीं, तो देशत्याग करून फ्रान्समधील मार्सेल्सला जाऊन राहिला.
मार्सेल्स येथें असतां, १८३१च्या एप्रिलमध्यें सार्डिनियाच्या गादीवर चार्ल्स अलबर्ट आला. माझिनीनें एका जाहीर पत्रकांत इटलीच्या स्वातंत्र्य-युध्दंत पुढारीपणा घेण्याबद्दल त्या राजाला विनंति केली. त्यामुळें लोकांत मोठी खळबळ उडाली; पण या अपराधाबद्दल सार्डिनियाच्या सरकारनें फ्रेंच सरकारडे तक्रार करून माझिनीला मार्सेल्समधून हांकून देण्यास लाविलें. तेव्हां त्यानें स्वित्झर्लंडमध्यें वस्ती ठेविली. यापुढील वीस वर्षें त्यानें बहुतेक एका लहानशा खोलींत अत्यंत गुप्तपणानें राहून भयंकर गुप्त व गूढ कट करण्यांत घालविलीं. १८३३ सालीं सार्डिनियाच्या लष्करांत बंड उभारण्याचा जो निष्फळ प्रयत्न झाला, त्यांत त्याचें अंग होतें. जिनोवाला असलाच प्रयत्न होऊन फसला. शिवाय त्यानें लेखद्वारां लोकांनां चेतविण्याचा क्रम चालू ठेविला होता. १८३४ सालीं जर्मन, पोलिश व इटालियन हद्दपार इसमांचें एक लढाऊ पथम त्यानें बनवून इटलीवर हल्ला केला; पण त्यांत अन्तःकलहामुळें अपयश आलें. त्याच सालीं 'तरुण यूरोप' नांवाची संस्था त्यानें काढून दुसरी 'तरुण स्वित्झर्लंड' म्हणून संस्था स्थापली. शिवाय एक वर्तमानपत्र सुरू केलें पण सरकारनें तें बंद केलें, व लवकरच स्वितझडाएट सभेनें त्याला हद्दपारीचा हुकूम दिला; तेव्हांशेवटी सन १८३७ मध्यें तो लंडनमध्यें जाऊन राहिला. तेथें कांहीं दिवस अत्यंत दारिद्य्रांत राहून तो इंग्रजी भाषा चांगली शिकला व लवकरच लेखनद्वारां आपला चरितार्थ नीट चालवूं लागला. त्यानें 'जॉर्ज सँड,' 'बायरन व गोएटे,' 'कार्लाइल,' 'डाँटेचे किरकोळ ग्रंथ' वगैरे निबंध लिहिले. याशिवाय 'मानवी कर्तव्यें' हा मोठा निबंध त्यानें लिहिला. त्यानें लंडनमध्यें इटालियन मुलांकरतां एक शाळा चालविली होती, तींतून शेंकडों लोक इटालियन भाषा शिकून बाहेर पडले. शिवाय इटलींतून लहान मुलांनां पळवून आणून इंग्लंडमध्यें वाद्यें वगैरे घांसून पॉलिश करण्याचें काम जुलूमानें करून घेतल्यामुळें तीं अल्पायुषी होत; तेव्हां याविरुद्ध ओरड करून हा अमानुष व्यापार त्यानें बंद करविला. पुढें चार्लस अल्बर्टनें ऑस्ट्रियाविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध सुरू केलें; त्यावेळीं मॉझिनी इटलींत जाऊन गॅरिबॉल्डीच्या सैन्यांत दाखल झाला. त्या युद्धकाळांत टस्कनींत स्वराज्य स्थापलें व त्यांत माझिनीला प्रधान नेमलें. ती स्थिति थोडा काळच टिकली, पण तेवढया धांदलींतहि त्यानें त्या शहरांत चांगली शांतता व व्यवस्था राखली. लवकरच अल्बर्टचा पराभाव झाल्यामुळें माझिनीचा अधिकार जाऊन त्याला गुप्तपणें स्वितझर्लंडमधून लंडनमध्यें पळून जावें लागलें. तेथें १८५० सालीं राष्ट्रीय इटालियन कमिटीचा तो प्रेसिडेंट झाला. राजक्रांतीचे प्रयत्न गुप्तकटांच्या द्वारें त्यानें चालविले होतेच. १८५२ सालीं मँच्युयांत व १८५३ सालीं मिलनमध्यें त्यानें बंडें उपस्थित करविलीं; पण तीं सर्व व्यर्थ गेलीं, व त्यामुळें त्याचें इंग्लंडांतील वजन मात्र कमी झालें. १८५७ सालीं पुन्हां इटलींत जाऊन जिनोआ, नेपल्स येथील बंडांत तो सामील झाला, व ते प्रयत्न निरर्थक झाल्यामुळें परत लंडनला आला. १८५९-६० सालीं व्हिक्टर इमॅन्युअलनें इटलीला स्वातंत्र्य देण्याचा जो यशस्वी प्रयत्न केला, त्यांतहि माझिनी होता. स्वातंत्र्यप्राप्तीच्या एकंदर प्रयत्नांत माझिनी हा केवळ स्फूर्तीने बोलणारा भविष्यवादी होता, तर गॅरिबॉल्डी केवळ समशेर बहाद्दर लढवय्या होता. पण अपूर्व करामत करून स्वातंत्र्य प्राप्तीसारखें असाध्य धेय प्रत्यक्ष कृतीत आणून दाखविणारा असामान्य बुद्धिमान व कर्तुत्ववान् मुत्सद्दी काव्हून हा होय. व्हिक्टर इम्यॅन्युअलनें रिपब्लिक स्थापना न करतां राजशाहीच इटलींत सुरू केली; तीमुळें माझिनीचें समधान झालें नाहीं. १८६५ सालीं इटालियन पार्लमेंटचा सभासद म्हणून त्याला मेसिनाच्या मतदारांनीं निवडून दिलें; परंतु राजनिष्ठेची शपथ घेणें त्याच्या रिपब्लिकच्या ध्येयाच्या विरुद्ध असल्यामुळें त्यानें ती नामदारी पत्करली नाहीं. मागें त्याला झालेली मरणाची शिक्षा सररहा माफीचा कायदा पास होऊन त्याअन्वयें रद्द करण्यांत आली. पण पुढें स्वित्झर्लंडमध्यें राहून त्यानें गॅरिबॉल्डीबरोबर पुन्हां गुप्त कट सुरू केले. तेव्हां त्याला कैद करून दोन महिने तुरुंगात टाकण्यांत आलें. पण त्याच्यापासून फारसा धोका नाहीं असें पाहून त्याला मुक्त करण्यांत आलें, नंतर कांहीं दिवस लंडनला व कांहीं लुगॅनो येथें राहून त्यानें आपलें बाकीचें आयुष्य आक्रमिलें. शेवटीं तो प्लूरसीच्या विकारानें मरण पावला.