विभाग आठरावा : बडोदें ते मूर
माँटेग्यू, एडबिन सॅम्युअल (१८७९-१९२४)- एक इंग्लिश मुत्सद्दी. याचें शिक्षण क्लिफ्टन येथील सिटी ऑफ लंडन स्कूल व केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजमध्यें झालें. १९०६ सालीं पार्लमेंटमध्यें तो निवडून आला. तेथें असतांना ॲस्क्किथचा खाजगी चिटणीस या नात्यानें त्यानें काम केलें. १९१० सालीं त्याला हिंदुस्थानचा दुय्यम सेक्रेटरी नेमण्यांत आलें. हाऊस ऑफ कॉमन्समध्यें हिंदुस्थानच्या राज्यकारभाराच्या प्रश्र्नासंबंधी तो नेहमीं पुढाकार घेत असे. १९१४ सालीं त्याला फायनॅन्शियल सेक्रेटरी नेमण्यांत आलें. १९१५ सालीं डची ऑफ लँकॅस्टरचा तो चॅन्सेलर झाला. १९१६ सालीं युद्धसाहित्यखात्याचा तो मुख्य झाला. लाईड जॉर्जच्या साम्राज्यविषयक युद्धमंडळामध्यें त्याला जागा मिळाली होती. नंतर तो हिंदुस्थानचा स्टेटसेक्रेटरी झाला. हिंदुस्थानच्या राजकीय चळवळीची माहिती व्हावी या उद्देशानें त्यानें हिंदुस्थानांत येऊन निरनिराळया राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या व १९१८ सालीं हिंदुस्थानला द्यावयाच्या सुधारणांचा मसुदा त्यानें व्हाइसराय लॉर्ड चेम्सफर्डच्या साहाय्यानें तयार केला. १९१९ सालीं हाऊस ऑफ कॉमन्सनें हा मसुदा पास केला. त्यायोगानें हिंदुस्थानला वसाहतीच्या स्वराज्याबाबतचे कांहीं हक्क मिळाले.