विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मादण्णा उर्फ मदनपंत- हा अबू हसन कुत्बशहा (१६५७-१६८७) चा मुख्य प्रधान ('आकण्णा' पहा). रघुनाथपंत हणमंते यानें मादण्णाच्या मध्यस्थीनें कुत्बशहा व शिवाजी यांची मैत्री घडवून आणली. पुढें कुत्बशानें तर शिवाजीस खंडणी दिली त्यामुळें मोंगलातर्फे दिलेखानानें शिवाजी कर्नाटकांत असतां गोवळकोंडयावर स्वारी केलीं; परंतु मादण्णानें मोंगल व विजापूरकर या दोन्ही फौजांचा पराभव केला. याच्या कारकीर्दीत गोवळकोंडयास मनुष्यबळ व द्रव्यबळ यांची वाण नव्हती. हा न्यायी व दानशूर होता. औरंगझेबानें गोवळकोंडयावर स्वारी केली त्यावेळीं मादण्णानें दक्षिणेंतील सर्व राज्यें औरंगझेबाच्या उलट उठविण्याचा प्रयत्न केला पण तो फसला (१६८३). औरंगझेबानें गोवळकोंडयावर स्वारी केली (१६८६), तेव्हां मादण्णानें त्याला अडविण्यास जो इब्राहिम नांवाचा सरदार पाठविला, तोच औरंगझेबास फितूर झाला व औरंगझेब थेट हैदराबादेवर आला. तेव्हां स्वतः मादण्णा त्याच्यावर चालून गेला परंतु या गडबडींत त्याच्या विरुद्ध असलेल्या पक्षानें त्याचा व आकण्णाचाहि खून केला. मादण्णाला मदरस व आकण्णास अकरस असें म्हणत. (डफ; म. रि; भा. इ. मं. अहवाल १८३८)