विभाग आठरावा : बडोदें ते मूर                

माधवराव बलजळ पेशवे (१७४५-१७७२)- नानासाहेब पेशवे व गोपिकाबाई यांचा दुसरा मुलगा साबनूर येथें (१६।२।१७४५) जन्मला. मुंज १४।२।१७५२ आणि लग्न ९।१२।१७६१ रोजीं झालें. बायकोचें नांव रमाबाई (जोशी) असून त्याला पेशवाईचीं वस्त्रें २०।७।१७६१ रोजीं मिळालीं. प्रथम राघोबादादा कारभार पहात असे. लवकरच निजामानें स्वारी केली (जानेवारी १७६२). त्याचा पराभव झाला, पण उभयपक्षीं कोणास कांहीं देऊं नये असा तह राघोबानें केला, तो पुष्कळांस पसंत न पडल्यामुळें लवकरच माधवरावानें कारभार स्वतःच्या हातीं घेतला. पण तेव्हांपासून पुणें येथें कारभारांत दोन पक्ष उद्भवले. माधवरावांपुढें तीन मोठी कार्यें होती. पानपतच्या अपयशानंतर उत्तरेकडील व दक्षिणेकडील मराठी साम्राज्यांतील मुलुख शत्रूंनीं हस्तगत केला होता तो परत मिळविणें, आणि घरांतील राघोबाचें बंड मोडणें. याशिवाय शेजारीं निजामाचा बंदोबस्त करणें जरूर होतें. हातचा कारभार गेल्यावर लवकरच राघोबानें निजामाच्या साहाय्यानें लढाई केली, तींत माधवरावाचा पराजय झाला; त्यामुळें त्यानें राघोबाच्या हातीं पुन्हां कारभार दिला. कांहीं सरदार निजामास मिळाले; निजाम-भोसलें यांचा गुप्त तह झाला. तथापि माधवरावानें सखारामबापूंच्या मदतीनें व राघोबास मोठेपणा देऊन फितुरी सरदारांचा बंदोबस्त केला. नंतर हैद्राबादेवर चाल केली व निजामानें पुण्यावर स्वारी केली तेव्हां पुण्याचे लोक पळाले; पेशव्यांची मंडळीहि सिंहगडावर राहिली. बहुतेक पुणें जाळून पोळून व मूर्ती फोडून निजाम परत फिरला. नंतर राक्षसभुवन व औरंगाबाद या दोन ठिकाणीं त्याचा पेशव्यानीं पराभव केला. तेव्हां ८२ लाखांचा मुलुख देऊन निजामानें तह केला; तो खडर्याच्या लढाईपर्यंत टिकला. यापुढें साम्राज्याचा खर्च भागविण्याकरितां सर्व सरदारांपासून जहागिरींतील चौथाई उत्पन्न घेण्याचा करार पेशव्यानीं सक्तीनें अमलांत आणला. माधवरावानें कारभाराचें सुकाणूं राघोबाला न दुखावतां आपल्या हातीं घेतलें.

क र्ना ट कां ती ल दो न यु ध्दें- कृष्णेच्या दक्षिणेकडील मराठी साम्राज्य बुडविण्याचा उद्योग हैदरानें चालविला होता, त्याचा बंदोबस्त करण्याकरितां १७६३-१७७१ पर्यंत कर्नाटकांत मराठयांनीं हैदराबरोबर दोन युध्दें व पांच स्वाऱ्या केल्या; व त्यांकरितां एकंदर पांच मोहिमा झाल्या; त्यांपैकीं चार मोहिमांत स्वतः माधवराव हजर होता व दुसऱ्या मोहिमेस जाण्यापूर्वी सखारामबापूस कारभारी करून व नानांस फडणविशी व दरबारचीं मुख्य कामें सांगून पुणें येथील इतर राजकीय कामांचीहि त्यानें नीट व्यवस्था लावून दिली. तंजावरपर्यंतचा जो मुलुख शिवाजीच्या वेळेपासून मराठी राज्यांत होता तो घेण्यासाठीं त्यावेळीं निजाम, हैदर व इंग्रज यांचे प्रयत्न चालू होते. पहिली मोहिम १७६२ मध्यें व दुसरी निजामाचा बंदोबस्त केल्यावर १७६४-६५ सालीं झाली. यापुढील स्वाऱ्यांत हैदर या बलिष्ट शत्रूचा मोड करण्यांत येऊन १७७२ च्या तहानें शिवाजीच्या वेळचा सर्व मुलुख हैदरच हातून परत घेण्यांत आला. स. १७६४ च्या म्हणजे दुसऱ्या मोहिमेंतच हैदरचा बहुतांशीं मोड करण्यांत आला होता. पण राघोबानें मध्यस्ती करून जरा घाईनें तह घडवून आणला. त्यांत तुंगभद्रेच्या उत्तरेकडील मुलुख मराठयांनां मिळाला; आणि संपूर्ण मुलुख मिळविण्याकरितां दुसरें युद्ध म्हणजे स. १७७२ पर्यंत आणखी तीन मोहिमा कराव्या लागल्या.

अ वां त र प्र क र णें.- मध्यंतरीच्या सर्व काळांत राघोबाचा गृहकलह चालूच होता. कर्नाटकांतील पहिलें युद्ध संपवून परत येतांच राघोबानें निम्में राज्य वाटून द्यावें अशी मागणी केली, पण ती मोडून काढून माधवरावानें त्याला उत्तरेकडे मोहिमेवर पाठविलें. तिकडे त्यानें अपयश घेऊन १७६७ परत येऊन पुन्हां माधवरावाशीं युद्धची तयारी केली, पण पेशव्यांची फौज भारी हें पाहून आनंदवल्‍लांस पेशव्यांच्या अटी कबूल करून राघोबा राहिला. तेथून भोंसले, इंग्रज, गायकवाड, निजाम यांच्याशीं कारस्थान करून त्यानें युद्धची तयारी पुन्हां चालविली. अखेर घोडप येथें पेशव्यांनीं राघोबाचा पराजय करून त्याला शनवारवाडयांत कैदेंत ठेविलें (जून १७६८); त्यानंतर अखेरपर्यंत माधवरावास राघोबाचा फारसा त्रास झाला नाहीं. कोल्हापूरकर संभाजी वारल्यावर औरस संतति नसल्यामुळें सातारा व कोल्हापूर पुन्हां एक करण्याचा नानासाहेब व नंतर माधवराव यांचा विचार होता. पण राघोबास कलहांत कोल्हापूरकरांचें साहाय्य मिळूं नये म्हणून जिजाबाई मागत असलेली दत्तक घेण्याची परवानगी देऊन व पुढें संस्थान शत्रूंपासून संरक्षण करून माधवरावानें कोल्हापूरकरांस अनुकूल ठेविलें. याच कारकीर्दीत भाऊसाहेबांचा तोतया उत्पन्न झाला, पण माधवरावानें त्याची चौकशी करून खोटा ठरल्यावर त्यास पूर्ण बंदोबस्तानें कैदेंत ठेविलें. तसेंच इंग्रजांनीं मद्रास व बंगाल हस्तगत करून मुंबई इलाख्यांत सत्ता स्थापण्याचा प्रयत्न सुरू केला. हें पाहून माधवरावानें दारुगोळा, तोफा, बंदुकी वगैरे शस्त्रास्त्रें तयार करण्याचे कारखाने पुणें, ओतूर, नाशीक, बागलकोट इत्यादि गांवीं काढले; गारदी (यूरोपीय पद्धतीनें कवाइत शिकलेली) फौज, सरंजामी आरमार, किल्ले यांची नवी तयारी केली, आणि इंग्रजांचा वकील मास्टिन याच्याबरोबर मोठया दक्षतेनें बोलणें चालवून माधवरावानें इंग्रजांचा हात मराठी राज्यांत कोठेंहि शिरकू दिला नाहीं.

उत्तरेकडील मराठी साम्राज्याचें संरक्षणः- पानपतच्या पराभवानंतर जाट, रोहिले व रजपूत यांनीं मराठयांनीं आक्रमिलेला प्रदेश पुन्हां परत मिळविण्याची खपटपट चालविली, पण सर्वांत बलिष्ट प्रयत्न इंग्रजांचा होता. दिल्‍लीचा बादशाहा आतांपर्यंत बहुतेक मराठयांच्या तंत्रानें वागत होता. पण पानपनानंतर मराठयांच्या ऐवजीं इंग्रजांनीं दिल्‍लीच्या बादशाहाला हस्तगत करण्याचा व आपली सत्ता उत्तरहिंदुस्थानांत वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला. पण इंग्रजांचा आश्रय घेण्याबद्दल बादशहाचा निर्णय अद्याप झाला नव्हता. १७६६ सालीं बादशाहाच्या विनंतीवरून माधवरावानें रघुनाथरावास तिकडे पाठविलें. पण १७६७ सालीं बादशाहानें इंग्रजांशीं समेट केला; आणि राघोबा विशेष कामगिरी न करतां कर्ज करून परत आला. नंतर माधवरावानें शिंदे, होळकर, कानडे वगैरे सरदारांच्या मार्फत राजपुताना, बुंदेलखंड येथें मराठी अम्मल पुन्हां बसविला. १७६९ सालीं दिल्‍लीच्या बादशाहानें पुन्हां मराठयांची मदत मागितल्यावर मराठयांनीं जाट, नजीबखान, रोहिले व अहमंद बंगष यांचा पराभव करून पूर्वीप्रमाणें पानपताच्या अन्तर्वेदींत सत्ता स्थापिली. १७७१ सालीं दिल्‍ली घेतली, तेव्हां बादशाहा इंग्रजांस सोडून मराठयांच्या सर्व अटी मान्य करून दिल्‍लीस राहिला. पण सुजानें इंग्रजांस मिळून बादशाहास पुन्हां आपल्याकडे ओढलें. याच सुमारास माधवराव वारला.

त्यानें ७-८ मोहिमा व ४-५ लहान स्वाऱ्या केल्या. शिवाय राघोबानें त्याला फार त्रास दिला. या सर्वांचा परिणाम होऊन राजयक्ष्म या रोगानें दोन वर्षे आजारी होऊन तो थेऊर येथें मरण पावला (१८-११- १७७३). त्याची बायको रमाबाई सती गेली. माधवरावसाहेब हे अत्यंत तेजस्वी, करारी, मुत्सद्दी, मानी (परंतु राष्ट्रहिताचा नाश होत असल्यास अपमान सहन करणारे), न्यायनिष्ठुर, अढळ वचनाचे, निःपक्षपाति, अप्रतिम सेनानायक (राघोबा दादा म्हणतात ''चिरंजीव आम्हांपेक्षां शिपायीगिरींत अधिक झाले.'' मुरारराव घोरपडयासहि श्रीमंतांनीं पराक्रमांत लाजविल्याचें प्रसिद्ध आहे), कडक शिस्तीचे (मीर रेझा नांवाचा हैदराचा एक सरदार शरण आला असतां, त्याला मुराररावाच्या शिपायांनीं लुटल्यानें त्यांचे हात श्रीमंतांनीं तोडले होतें,) धाडसी (गुलटेंकडीवर अंगावर हत्ति चालून आला असतां त्यांचें आसन डळमळीत झालें नाहीं.), दूरदृष्टि, कर्तव्यनिष्ठ, राष्ट्रीय भावनोत्कट, घरांतील दुहीचा फायदा बाहेरच्या शत्रूंस घेऊं न देणारे, राज्याला झालेल्या एक कोट कर्जाच्या फेडीसाठीं स्वतःच्या खाजगींतून लाखों रुपयांची व जवाहिराची संपत्ति अर्पण करणारे, पानपतचें अपयश घालविणारे, बदललेल्या परिस्थितींत पूर्वीच्या तीन पिढयांतील मराठी राज्याच्या कारभारांतील अपूर्णता व चुक्या काढून टाकून राज्याचा गाडा सुरळीत चालविणारे, राज्य आपलें नसून आपण त्याचे रक्षक आहों ही भावना पदोपदीं वर्तनांत उतरविणारे व ती राष्ट्रास शिकविणारे असे होते. एकंदरींत शिवाजीच्या मागें बर्‍याच अंशीं त्याचें अनुकरण करून राष्ट्रसेवा करणारा असा हा सर्व पेशव्यांत थोर पुरुष होऊन गेला. टेलर हा इंग्रजांचा वकील म्हणतों, ''माधवरावसाहेबांनीं कारभार थोडींच वर्षे केला, पण तेवढया मुदतीत आजूबाजूचे सत्ताधीश त्यांच्या पुढें नमून वागूं लागले.''