विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मॉम्सेन (१८१७-१९०३)- थिओडोर मॉम्सेन हा जर्मन इतिहासकार व प्राचीन वस्तुसंशोधक श्लेस्विगमधील गार्डिन्ज येथें जन्मला. कीलच्या विश्वविद्यालयांत त्याचा शिक्षणक्रम पुरा झाल्यावर रोमचा कायदा व प्राचीन अवशेष यांकडे त्याचें लक्ष लागलें. इटलींतील पूर्वीच्या उपभाषांचें पुनरुज्जीवन करण्याकडे प्रथम त्यानें आपला वेळ खर्चिला. बर्लिन ऍकेडमीनें रोममधील शिलालेख जमविण्याचा विचार केला. व हें मोठें काम मॉम्सेन याच्यावर सोंपविण्यांत आलें. सबब त्यानें इटलीत आपलें काम अव्याहत चालू ठेविलें. त्यानें श्लेस्विग येथें एक वृत्तपत्र सुरू केलें. १८४८ सालीं लिप्झिग येथें कांही दिवस तो दिवाणी कायद्याचा अध्यापक होता. नंतर मॉम्सेन हा स्वित्सर्लंडमध्यें झूरिक (च) येथें अध्यापक झाला. स. १८५८मध्यें पुन्हां त्याला बर्लिन येथें अध्यापकाची जागा मिळाली.
जर्मनींतील सर्वांत वजनदार असें जें बातमीपत्र तें यानेंच अस्तित्वांत आणिलें. त्याची राजकीय मतें ठाम होती. परंतु ती चांगली व्यवस्थित नव्हतीं. त्यानें रोमचा इतिहास व रोमन नाण्यांचा इतिहास लिहिला आहे.