विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मायकेल, मधुसूदन दत्त (१८२८-१८७३)- एक बंगाली कवि व नाटककार. याचा बाप नारायणदत्त हा बर्यापैकीं वकील होता. पाठशाळेंतील शिक्षण संपल्यानंतर मधुसूधनाला कलकत्ता येथील हिंदुकॉलेजमध्यें पाठविण्यांत आलें. कॉलेजांत असतांनाच मधुसूदनानें ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली. त्यानंतर तो बिशप्स कॉलेजमध्यें जाऊं लागला. या ठिकाणीं त्यानें ग्रीक व लॅटिन भाषाचें अध्ययन केलें. पुढें कॉलेजचें शिक्षण संपल्यानंतर तो मद्रास येथें नोकरी पहाण्यासाठीं आला. मद्रास कॉलेजच्या प्रिन्सिपॉलच्या हेनरी याटा नांवाच्या सुंदर व सुसंस्कृत मुलीचें व त्याचें प्रेम जुळून त्या दोघांचा विवाह झाला. मद्रासमध्यें मधुसूधनाला अथेनियम नांवाच्या वृत्तपत्राच्या सहसंपादकाची नोकरी मिळाली व ती त्यानें आठ दहा वर्षें चांगल्या रीतीनें बजाविली. या अवधींत त्यानें आपल्या आंग्ल कवितांचा संग्रह प्रसिध्द केला. त्यांत 'कॅप्टिव्ह लेडी' हें त्याचें छोटेसें काव्य होतें. या कवितासंग्रहानें त्याची बरीच प्रसिद्धि झाली. तथापि कवित्व अगर संपादकीय नोकरी यानें त्याच्या पोटापाण्याचा कांहींच प्रश्न सुटेना तेव्हां तो आपल्या पत्नीसह पुन्हां कलकत्त्याला आला. तेथें त्यानें मॅजिस्ट्रेट कोर्टांत कारकुनी पत्करली; नंतर तो कोर्टामध्यें 'दुभाषी' झाला. या कामावर असतांनां त्यानें अनेक काव्यें व नाटकें लिहिलीं. या अवधींत त्यानें संस्कृत व बंगाली भाषांचें अध्ययन केलें. बंगाली भाषा म्हणजे गचाळ भाषा अशी जी त्याची पूर्वी समजूत होती. ती बदलली. १८५८ सालीं त्यानें 'रत्नावली' नाटकाचें इंग्रजींत भाषांतर प्रसिध्द केलें. नंतर अवघ्या चार वर्षांच्या अवधींत त्यानें शर्मिष्ठा, पद्मावती, कृष्णाकुमारी हीं नाटकें, तिलोत्तमासंभव, मेघनादवध, वज्रांगना ही महाकाव्यें, अकीएके बले सभ्यता, बुरा सरीकेर घरे रो, हे फार्स इत्यादि अत्यंत सुंदर असें वाङ्मय निर्माण केलें. हें सर्व वाङ्मय बंगाली भाषेंत असून तें त्या भाषेमध्यें अत्यंत प्रसिध्द आहे. याशिवाय त्यानें समाजांत खळबळ उडवून देणार्या नीलदर्पण या नाटकाचें इंग्रजी भाषांतर प्रसिध्द केलें. यानंतर तो आपल्या पत्नीसह व मुलीसह इंग्लंडला बॅरिस्टर होण्याकरितां गेला. व व्हॅर्सेलिस येथें असतांना त्यानें चतुर्दशी पदें लिहिलीं. नंतर तो कलकत्त्यास वकिली करूं लागला. त्याची वकिली फारशी चांगल्या तर्हेनें चालली नाहीं. त्याचा खर्च तर अतिशय असल्याकारणानें त्याला फारच कर्ज झालें. वकिली करीत असतां त्यानें हेक्टरवध नांवाचा गद्य ग्रंथ लिहिला. हाच त्याचा शेवटचा ग्रंथ होय. शेवटीं कर्जाच्या काळजीनें तो आजारी पडून एका इस्पितळांत मरण पावला. अर्वाचीन बंगाली भाषेंतील तो प्रतिभासंपन्न कवि व ग्रंथकार होता.