विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मॉयसन, हेनरी (१८५२-१९०७)- हा फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ पॅरिसमध्यें जन्मला व तेथेंच त्याचें शिक्षण झालें. तो १८८६ सालीं रसायनशास्त्राचा अध्यापक झाला. स. १८८६ तच त्यानें पालाशप्लविदाचें विद्युत्पृथक्करण करून प्लविन द्रव्य निराळें काढलें. कर्बाचें ग्रॅफाईट व हिरा यांत रूपांतर करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती व त्याचप्रमाणें कृत्रिम हिरा त्यानें तयार केलाच. या शोधामुळेंच त्याला विजेच्या भट्टीचा शोध लागला, व तिच्या साहाय्यानें त्यानें कर्बिदें शैलिदें, इ. अनेक पदार्थ तयार केले. प्लविनचा शोध लावल्याबद्दल त्याला लेकेस प्राइझ ( १८८७) मिळालें व १९०६ सालीं त्याला रसायनशास्त्रांतील नैपुण्याबद्दल नोबल प्राइझ मिळालें.