विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मायसिनियन संस्कृति- ईजियनसंस्कृति व ग्रीकसंस्कृति यांमध्यें दुव्यासारखी असलेली ही संस्कृति होय. मायसिनियन लोकांचें लीडियन लोकांशीं बरेंच साम्य आहे. तथापि त्यांच्या मूळ उत्पत्तीबद्दल मतभेद आहेत. भाषेच्या मार्फत या राष्ट्राचे आप्तसंबंध काढण्यास पुरेशी ऐतिहासिक माहिती अद्याप मिळाली नाही. मायसिनियन लोक मूळ थ्रेसमधून आले व त्यांचा संबंध डॅन्यूब नदीच्या कांठच्या मोईसियन लोकांशीं आहे असें कित्येक लेखकांचें म्हणणें आहे. ग्रीक लोकांनीं सर्व समुद्रकिनारा व्यापून त्यांनीं मायसिनियन लोकांनां देशाच्या अंतर्भगात हांकून दिलें. मायसिनी हा देश ईजियन समुद्राच्या किनार्याला लागून आहे. डोंगराळ भागांत राहूं लागल्यापासून पुढें मायसिनियन लोकांची सुधारणा झाली नाहीं. होमरच्या ग्रंथांत मायसिनी राष्ट्राचा उल्लेख ट्रॉयच्या पक्षाचा दोस्त म्हणून केला आहे. पुढें लीडिया येथील सत्तेनें त्यांनां जिंकलें, त्यानंतर लीडियाबरोबरच मायसिनी इराणच्या साम्राज्यास जोडले गेलें. अलेक्झांडरच्या मरणानंतर हा देश सीरियाच्या राज्याला जोडला.