विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मारवाडी- यांची हिंदुस्थानांतील एकूण लोकसंख्या (१९११) ४५४१२ असून त्यांत निम्मे निमश्रावक व वैष्णव आहेत. यांची विशेष वस्ती मारवाड, व मुंबई हैद्राबाद संस्थानांत आहे. हे मूळचे मारवाडप्रांतांतील असून धंदा व्यापाराचा असल्यानें ते सर्व हिंदुस्थानांत पसरले आहेत. यांचा स्वभाव मेहनती, थंड, अत्यंत मितव्ययी, घामट रहाणीचा व धनलोभी असल्यानें ते बरेच श्रीमंत होतात. विद्येकडे यांचा ओढा पूर्वी फारच कमी होता. हल्लीं तिकडे त्यांचें लक्ष थोडें लागत चाललें आहे. मुंबईसारख्या शहरीं कांहीं मारवाडी सट्टयाचा व दलालीचा धंदा करतात. यांची भाषा मारवाडी (राजस्थानी पहा) असते. हे शाकाहारी आहेत. त्यांत तूप, डाळरोटी हें त्याचें मुख्य अन्न होय. यांचें मुख्य दैवत बालाजी हें आहे. यांच्यांतील ब्राह्मण आपल्यास छज्ञाति ब्राह्मण म्हणवितात. कारण प्राचीन ६ ॠषींपासून आपली उत्पत्ति आहे असें ते समजतात. या सहा वर्गांस दध्यवस, गुजरगौड, खंडेवाल, खंडे (ल) वाल पारीख, शिखळ व सारस्वत म्हणतात. यांचा एकमेकांत शरीर संबंध होत नाहीं. मात्र त्यांच्या रीतीभाती, भाषा, धर्म वगैरेंवरून ते मूळचे एकाच वर्गाचे असावेत असें दिसतें. यांचा वेद यजुर्वेद असून, शाखा माध्यंदिन आहे. यांच्यांत जोशी, सोती, त्वाडी, उपाध्ये अशीं आडनावें आढळतात.
महाराष्ट्रांत मारवाडयांची वसाहत पेशवाईपासून सुरू झाली, त्यांत इंग्रजी झाल्यापासून वाणी मात्र इकडे जास्त येऊं लागले. वाण्यांत ओसवाल, आगरवाल, मेश्री, ठाकूर, खंडेवाल, पोरवाल असे भेद आहेत (अगरवाल व खंडेलवाल पहा). ते एकमेकांच्या हातचें खातात पण सोयरीक करीत नाहींत. मात्र यांच्या चालीरीतींत कांहीं फरक नाहीं. चव्हाण, परमार, पोहणाचव्हाण, सकरुजु इत्यादि आडनांवें आढळतात. यांच्या राहणीचा खर्च फारच थोडा असतो. लग्न व और्ध्वदेहिक या कामीं मात्र हे बराच पैसा खर्चतात. यांच्यांत श्रावक जैनहि आहेत. अबूपर्वताजवळील क्षेत्रपाल व जैन पारसनाथ हे यांचे कुलदेव आहेत व उपाध्ये जती व श्रीमाळी ब्राह्मण आहेत. वैष्णवांचा देव गिरीचा बालाजी; त्याच्यासाठी बहुतेक मारवाडयांच्या जमाखर्चांत एक सदर असतें. यांचीं लग्नें गौड ब्राह्मण लावतात. या वाण्यांत आगरवाल आपल्यास श्रेष्ठ समजतात. जैन मारवाडी बरेचसे श्वेतांबर आहेत. देवळें, धर्मशाला, अन्नसत्रें वगैरे धार्मिक कृत्यांत यांचा पैसा फार थोडा खर्च होतो. जाट मारवाडी म्हणून यांच्यांत एक वर्ग आहे. तो मद्यमांसाहारी आहे. हे शेती करतात व यांच्यांत पहिला नवरा जिवंत असतां पंचांच्या संमतीनें दुसरा नवरा करण्याची चाल आहे. (खानदेश गॅझे. ६१)