विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मार्कंडेयपुराण- सर्व पुराणवाङ्मयांत फार जुन्यांपैकीं, फार महत्त्वाचें व फार मजेदार असें हें पुराण आहे. यांत निरनिराळया योग्यतेचे भाग आहेत, आणि हे भाग निरनिराळया काळीं लिहिलेले असावे. या पुराणाला एका प्राचीन मार्कंडेय नांवाच्या ॠषींचें नांव दिलें आहे. या ॠषीनें अक्षय तारुण्य भोगिलें, आणि महाभारतांतील पुष्कळ गोष्टी यानें सांगितलेल्या आहेत. विश्वोत्पत्ति, विश्वयुग, वंशावळी व इतर पुराणांतील ठराविक विषयासंबंधीं आपला शिष्य कौष्टुकी यास ज्ञान सांगणारा मार्कंडेय ज्या ज्या भागांत आलेला आहे, ते सर्व भाग फार जुने असें मानावे. शिवाय जुन्या पुराणांतील भागांबद्दल विशेष पुरावा म्हणजे असा कीं, त्या भागांत विष्णु किंवा शिव यांनां प्राधान्य दिलें नसून, इंद्र, ब्रह्मन् यांचें विशेष वर्णन आहे; प्राचीन वैदिक देवता, अग्नि, सूर्य यांचें माहात्म्य कांहीं सर्गांमध्यें सूत्रांच्या द्वारें गायिलें आहे; आणि पुष्कळ सूर्यकथा दिलेल्या आहेत. या पुराणाचे पहिले भाग बरेच जुने असावे; कारण त्यांचा महाभारताशीं फार संबंध दिसतो. या पुराणाच्या आरंभीं व्यासांचा शिष्य जैमिनी मार्कंडेयाकडे येऊन व महाभारताची बरीच स्तुति करून नंतर त्या महाकाव्यांत ज्यांची उत्तरें दिलेलीं नाहींत असे चार प्रश्न मार्कंडेयाला विचारतो; पहिला प्रश्न असा कीं, द्रौपदी ही पांच पांडवाची बायको कशी होऊं शकली; आणि शेवटचा प्रश्न असा कीं, द्रौपदीची सर्व मुलें तरुणपणींच कशी मारलीं गेलीं. या प्रश्नांचीं उत्तरें स्वतः न देतां मार्कंडेयानें तीं त्याला चार ज्ञानी पक्ष्यांनां विचारावयास सांगितलें. हे पक्षी म्हणजे मूळ ब्राह्मण असून शापामुळें पक्ष्याच्या जन्मास आले होते. या पक्ष्यांनीं जैमिनीच्या प्रश्नांनां उत्तरें म्हणून पुष्कळ दन्तकथा सांगितल्या. पांचव्या प्रश्नाचें उत्तर म्हणून असें सांगितलें कीं, मागें एकदां पांच विश्वेदेवांनीं महर्षि विश्वामित्राला राजा हरिश्चंद्राला क्रूरपणें त्रास दिल्याबद्दल दोष दिला; त्याबद्दल रागावून विश्वामित्रानें त्यांनां शाप दिला कीं, मानवप्राण्याचा जन्म तुम्हास येईल; व उःशाप देऊन सांगितलें कीं, त्यां जन्मांत तुम्ही तरुणपणीं अविवाहितच मरण पावाल. तेच विश्वेदेव द्रोपदीच्या पोटीं पांच मुलगे जन्माला आले.
याच ठिकाणीं राजा हरिश्चंद्राची हृदयद्रावक पण खरी ब्राह्मणी पध्दतीची कथा सांगितली आहे. त्या चार प्रश्नांचीं उत्तरें झाल्यानंतर पुढें एक नवा भाग सुरू होतो; त्यांत एक पितापुत्र-संवाद दिलेला आहे; नंतर भारतीय दन्तकथांतील रत्न अशी उदारचरित राजा विपश्चिताची गोष्ट दिली आहे.
या कथेंतील उत्कृष्ट संवाद व रचना यांवरून महाभारतांतील सावित्री-आख्यानाची आठवण होते. परंतु ज्याप्रमाणें महाभारतांत अत्यंत सुंदर अशा काव्याबरोबर निरर्थक लिखाणहि आलें आहे, त्याचप्रमाणें या मार्कंडेय पुराणांतहि तसा प्रकार आहे. वर दिलेल्या विपश्चित राजाच्या कथेनंतर एका पतिव्रता ब्राह्मण स्त्रीची कथा दिली आहे. ती सावित्री आख्यानाची नक्कल आहे. महाभारतांतल्याप्रमाणें या पुराणांतहि दंतकथांशिवाय इतर निव्वळ उपदेशपर असे संवाद आहेत; त्यांत गृहस्थाचीं कर्तव्यें, श्राद्धें, नित्यकर्में, नित्ययज्ञ, भोजनें, व्रतें, आणि योगमार्गाचें विवेचन केलेलें आहे. देवीमहात्म्य हा दुर्गादेवीच्या वर्णनपर स्वतंत्र विषय मार्कंडेय-पुराणांत निःसंशय मागाहून सामील केलेला आहे.