विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मार्क्स, हीनरिच कार्ल (१८१८-१८८३)- जर्मन अर्थशास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ता व समाजसत्तावादी आणि सार्वराष्ट्रीय मजूरसंघाचा मुख्य चालक. त्यानें कायद्याचा, नंतर इतिहासविषयाचा व अखेर तत्त्वज्ञानाचा अभ्यास वरून १८४१ सालीं डॉक्टर ऑफ फिलासफी ही पदवी मिळविली. त्यानें एका रॅडिकल पक्षाच्या वर्तमानपत्रांत नोकरी धरली. लवकरच तो सदरहू पत्राचा एक संपादक बनला. पण तें पत्र प्रेससेन्सारच्या तडाक्यांत वरचेवर येऊन तें १८४३ सालीं बंद करण्यांत आलें. त्याच सालीं मार्क्स समाजसत्तावादाचा चांगला अभ्यास करण्याकरतां पॅरिसमध्यें जाऊन राहिला. तेथें फ्रेडरिक एंजल्स या समाजसत्तावाद्याशीं त्याची मैत्री होऊन ते दोघे मासिकांत कडक लेख लिहूं लागले. म्हणून फ्रेंच सरकारनें त्यांस हांकून लावलें. नंतर ब्रुसेल्स, कोलोन व शेवटीं इंग्लंडमध्यें तो राहिला. न्यूयॉर्क ट्रिब्यूनमध्यें तो लेख लिहीत असे. शिवाय त्यानें सार्वराष्ट्रीय मजूरसंघ स्थापला. पण त्याच्या विरुद्ध ओरड झाल्यामुळें संघाचें ऑफिस न्यूयॉर्कमध्यें नेण्यांत आलें व अखेर ती संस्था मोडून टाकण्यांत आली. मजुरांच्या सार्वराष्ट्रीय परिषदा हल्लीं भरू लागल्या आहेत. त्यावरून मार्क्सच्या दूरदर्शीपणाची साक्ष पटते. वरील संस्था मोडल्यावर मार्क्सनें 'डास कॅपिटल' हा अर्थशास्त्रीय ग्रंथ पुरा करण्याकरितां अनेक विषयांचा अभ्यास सुरू केला; पण ते श्रम सहन न होऊन तो वरचेवर आजारी पडून मरण पावला. हल्लीं समाजसत्तावाद्यांची जी चळवळ जगभर चालू आहे तिचा आद्यप्रवर्तक मार्क्स हा होय. तथापि कित्येक समाजवाद्यांनां मार्क्सचें मुख्य प्रमेय मान्य नाहीं श्रम हा किंमत ठरविणारा एकच घटक आहे (लेबर इज दि ओन्ली सोर्स ऑर्फ व्हॅल्यू) असें मार्क्सचें मत होतें तें त्यानें ऍडम स्मिथ व रेकार्डो या अर्थशास्त्रज्ञांपासून घेतलें होतें. पण वास्तविक किंमत ठरविणारे घटक अनेक असतात. मूलभूत प्रमेय चुकीचें असलें तरी मार्क्सचे व इतर समाजसत्तावाद्यांचे अखेरचे सिद्धांत एकच आहेत.