विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मालेरकोट्ला संस्थान- पंजाब. जालंदरच्या भागांत कमिशनच्या देखरेखीखालीं हें संस्थान आहे. क्षेत्रफळ १६७ चौरस मैल. लोकसंख्या- ८० हजार. मालेरकोट्ल्याचे नबाब अफगाण जातीचे आहेत. त्यांच्या पूर्वजांनीं मोठया विश्वासाचीं कामें मोठया बादशहांच्या कारकीर्दीत केलीं. येथील नबाबानें १८०५ सालीं इंग्रजांस होळकराशीं लढतांना मदत केली म्हणून १८०५ सालापासून त्यांनीं या संस्थानास आपल्या संरक्षणाखालीं घेतलें. संस्थानांत कापूस, अफू, तंबाखू, लसूण व बडीशेप ही पिकें होतात. संस्थानाचें उत्पन्न सुमारें १४ लाख आहे. संस्थानिकास ११ तोफांची सलामी मिळते. मालेरकोट्ला हें या संस्थानांतील मुख्य गांव असून लोकसंख्या २११२२ आहे. हे गांव मालेर व कोटला हीं दोन गांवें मिळून झालें आहे.