विभाग आठरावा : बडोदें ते मूर
माल्डा- हा जिल्हा बंगाल इलाख्यांत राजशाही भागांत असून याचें क्षेत्रफळ १८९९ चौरस मैल आहे. महानंदा नदीच्या प्रवाहानें या जिल्ह्याचे सारखे दोन भाग झालेले आहेत. या जिल्ह्यांत तळीं व सरोवरें नाहींत. पण दलदलीचा प्रदेश फार आहे. या जिल्ह्यांतून गंगेस मिळणारे प्रवाह बरेच आहेत. त्यांनां पावसाळयांत पाणी फार असल्यामुळें त्यांत नावा चालतात. येथें सरकारी जंगल नाहीं.
इ ति हा स.- या जिल्ह्यांत गौर व पदुआ या दोन प्राचीन राजधान्या आहेत. यास प्राचीन काळीं पौंड्र देश असें म्हणत असत. १६७६ सालीं ईस्टइंडिया कंपनीची वखार माल्डा येथें स्थापन झाली. १८१३ सालीं हा जिल्हा अस्तित्वांत आला व १८७५ सालीं या जिल्ह्याच्या राज्यकारभाराची पूर्णपणें व्यवस्था करण्यांत आली.
जिल्ह्याची लोकसंख्या (१९२१) ९८५६६५. यांत खेडीं ३५५५ व मोठीं गांवें ३ आहेत. इंग्लिश बाजार हें जिल्ह्याचें मुख्य ठिकाण होय. या जिल्ह्यांत हिंदु व मुसुलमान यांचें प्रमाण अनुक्रमें शें. ५० व ४८ आहे. शें. ७४ लोक बंगाली भाषा बोलतात व शें. २१ बिहारी बोलतात. संताळ, जैन व गंगै जातीचे रानटी लोक येथें आहेत. शें. ५७ लोक शेतीवर उपजीविका करतात. शें. १९ लोक उद्योगधंदे करतात. जिल्ह्यांत मुख्य रेशमाचा धंदा चालतो. २५ ते ३० लाख रुपयांचे रेशमाचे कोश तयार होतात. सुमारें १० ते ११ लाख रुपयांचें रेशीम बाहेर पाठवितात. दुसरा मोठा व्यापार म्हणजे पितळेची भांडीं तयार करणें हा होय बहुतेक व्यापार महानंदा नदींतून चालतो. शिक्षणाच्या बाबतींत हा जिल्हा मागसलेला आहे.