विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मासा- सपृष्ठवंश प्राण्यांपैकीं अगदीं खालच्या जातींतील प्राणी. हा नेहमीं पाण्यामध्यें रहातो. याचें डोकें मोठें असतें यास मान अजीबात नसते. याचें शरीर, डोकें व शेंपूट या भागाकडे निमूळतें असतें व त्यामुळें त्याला अडथळयावांचून पाण्यांतून सहज फिरतां येतें. श्वासोच्छ्वासाकरितां कल्ले असणें हें माशाचें मुख्य लक्षण होय. हे कल्ले डोक्याच्या दोहों बाजूंनां खालीं असतात. या कल्ल्यांची रचना लहान लहान पातीं जुळवून झालेली असते. पाण्यामध्यें जो प्राणवायु असतो तो कल्ल्यांतील रक्तवाहिन्यांच्या द्वारां मासे शोषून घेतात. मासें तोंडांत पाणी घेऊन ते कल्ल्यांच्या द्वारांनीं बाहेर सोडून देतात. या कल्ल्यांवर पडदे असून त्यांची नेहमीं उघड-झांक चाललेली असते. माशांच्या कांहीं जातीमध्यें श्वासोच्छ्वासाकरितां हवेच्या पिशव्या असलेल्या आढळतात. माशांचें हृदय जबडयाखालीं असतें व त्याला दोन पोकळया असतात. शरीरांतील रक्त कल्ल्यांच्या द्वारां हृदयाकडे जातें व तेथून सर्व शरीरभर पसरतें. माशाचा मेंदु अगदींच लहान असतो पण डोळे मोठे, बाह्यगोल व पापणीविरहित असतात. नाकपुडीचें छिद्र घशापर्यंत असतें. माशाची बाह्यत्वचा बुळबुळीत असते; शरीरावर आंतल्या त्वचेपासून निघालेले खवले असतात. पाठीवर वाटोळे मणके असून दोन्ही बाजूंनां अंतर्गोल असतात व या मणक्यांच्यामध्यें एक बुळबुळीत पदार्थ असतो. पाण्यांत पोहण्याकरितां पंखांच्या जोडया असतात. याचे पाय वल्ह्याप्रमाणें असतात. पुढचीं दोन वल्हीं कल्ल्याजवळ दोन बाजूंनां असतात व मागच्या बाजूस दोन वल्हीं असतात. कांहीं माशांनां मागचीं वल्हीं नसतातहि. माशाचें रक्त फिकट तांबूस असून थंड असतें. माशाच्या तोंडांत बारीक पण तीक्ष्ण दांत असतात. नरमाशापेक्षां मादीचें पोट मोठें असते. माशाची प्रसवक्षमता फार मोठी असते. मासा एका वेळीं असंख्य अंडीं घालतो. सालोमन मासा एका वेळीं दोन कोटी अंडीं घालतो असें म्हणतात. त्याच्या खालोखाल कॉड हा सुमारें १ कोटी अंडीं घालतो. या अंडयावरील कवच फार पातळ असतें. कांहीं मासे एकदम पिलींच प्रसवतात. माशांच्या सुमारें १२-१३ हजार जाती आहेत. कार्प, कॉड, फाइंडर्स, हेरिंग, पर्च, पाइक, रोच, लॉबस्टर, सोल, इत्यादि महत्त्वाच्या जाती आहेत. या माशांचे प्राणिशास्त्रवेत्त्यांनीं चार वर्ग पाडले आहेत. ते म्हणजे करकुच, फुफ्फुसमत्स्य, अस्थिमत्स्य व होलोरोफॉलिमत्स्य होत. करकुच मत्स्यांनां हाडें व हवेची पिशवी नसते. शार्क, श्वानमत्स्य, स्फेट इत्यादि मासे या वर्गांत मोडतात. फुफ्फुसमत्स्यांनां मोठें फुफ्फुस असतें व त्याचा संबंध अन्ननलिकेशीं असतो. या जातीचे मासे म्हणजे घोडमत्स्य, उडणारे मत्स्य, ब्लेनी मत्स्य हे होत नेहमीं आढळणारे मासे अस्थिमत्स्य जातीचे असतात.
युरोपमध्यें माशांचा व्यापार मोठया प्रमाणावर चालतो. हिंदुस्थानांतहि पूर्व बंगाल, दक्षिण बंगाल, मुंबई, सिंध व मद्रास या भागांत माशांचा व्यापार चालतो. मद्रास प्रांतांत याकरितां एक सरकारी खातेंच उघडलें आहे. कराची येथें शार्क फिन व फिश-मॉ या नांवाच्या माशांचा बराच व्यापार चालतो. ब्रह्मदेशांत मासे धरण्याचे व वाळविण्याचे पुष्कळ कारखाने आहेत. १९०४ सालीं इंग्लंड, नॉर्वे, जर्मनी, डेन्मार्क इत्यादि देशांमध्यें अनुक्रमें ९४८१०००, १६२९०००, ८३६०००, ५७१०००, पौंडांचा माशांचा व्यापार होता.
उ प यो ग.- यूरोप, अमेरिका, वगैरे देशांत सर्व लोक मासे खातात. पण इतर बाबतींतहि माशांचा बराच उपयोग आहे. माशाच्या यकृतापासून व कांहीं जातीच्या माशांच्या शरीरापासून तेल काढतात व तें औषधी असतें. कॉड माशाच्या यकृतापासून काढण्यांत येणारें 'कॉड-लिव्हर ऑइल' हें अनेक रोगांवर औषध म्हणून देण्यांत येतें. याशिवाय माशांपासून इसिंगग्लास, नागपी इत्यादि पदार्थ तयार होतात. माशांच्या खवल्यापासून तावदानें, इसेन्स ऑफ दि ओरिएंट इत्यादि पदार्थ करण्यांत येतात. महसीर नांवाच्या माशाच्या खवल्यापासून शहाबाद येथें खेळण्याचे पत्ते तयार करतात. माशांच्या कांतडयापासून सँडपेपर, झाग्रिन इत्यादि वस्तू तयार होतात. साबण तयार करण्याच्या कामींहि माशाचा उपयोग होतो. रुहु माशाचें पित्त औषधी आहे. तसेंच माशांचे खत जमिनीच्या लागवडीसाठीं व फळझाडासाठीं वापरण्यांत येतें. कांही माशांचीं अंडी फार मौल्यवान असतात. तीं मुद्दाम तयार करून बाजारांत विकावयास आणतात. मलबारचा गार्ड मासा, कोर्सुला, गाशेंग, इत्यादि माशांची अंडीं उन्हांत वाळवून तीं बाजारांत विकतात. मासे बरेच दिवस टिकावेत यासाठीं खारवण्यांत येतात. धूर देऊन मासे टिकविण्याचीहि पध्दत हिंदुस्थानांत आढळते. बंगाल्यांत चिंचेच्या मसाल्यांत ठेवून मासे आंबवितात.